बुद्धांनी शिकवले की उपोसथ दिवस म्हणजे “अशुद्ध मनाची शुद्धता” करण्याचा दिवस होय, उपोसथ किंवा उपोस्थ या शब्दाचा अर्थ उप+स्था म्हणजे एकत्र बसणे होय, भिक्षुसंघाची एकसंघपणा टिकवून राहण्यासाठी उपोसथ विधी खूप महत्त्वाचा मानला गेला. उपोसथ विधी बुद्ध काळापासून अस्तित्वात आहे आणि बौद्ध देशांमध्ये उपोसथ विधी श्रद्धापूर्वक पाळला जातो. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिख्खू पटिमोक्खा (आचारसंहितेचे नियम) यांचे पाक्षिक कबुलीजबाब आणि पाठ होते. या दिवशी बौद्ध उपासक आणि भन्ते धम्म अध्ययन आणि ध्यानाची तीव्रता आणखीन वाढवतात. विनयासंबधी जर आचारात काही दोष आला असेल तर उपोसथ दिनी भन्ते सर्वांसमोर कबुलीजबाब देत असत व संघ नियमानुसार त्यांना पुढील कारवाईस समोर जावे लागत. हा विधी खूप पवित्र मानला जाई, आजही त्याचे पालन केले जाते.
धम्माप्रती वचनबद्ध उपासक गृहस्थ पंचशील, दहा परिमिता, अष्टांगिक मार्गाचे पालन करतात धम्म आचरणात उत्साह जागृत होण्याकरिता समाधी मार्गाचे, ध्यानाचे अवलंबन करतात. जेव्हा शक्य असेल तेव्हा उपासक या दिवसाचा उपयोग स्थानिक विहारात जाण्याची संधी म्हणून करतात. या दिनी संघाला विशेष दान अर्पण केले जाते, धम्म प्रवचन ऐकले जाते आणि रात्री उशिरापर्यंत धम्म बांधवा सोबत ध्यान-धारणा केली जाते. जे उपासक विहारात जाऊ शकत नाहीत अशांना ही उपोसथ दिन संधी देतो कि, आपले ध्यान करण्याचे प्रयत्न वाढवावे कारण या पवित्र दिनी जगातील हजारो उपासक ध्यान धारणेचा अभ्यासात वुद्धी होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात.
तथागत बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खुसंघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत, या तिन्ही ऋतुत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे, नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार-प्रसार करीत असत. हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिख्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत, एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्मज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणुन तेव्हापासुन संपन्न होऊ लागला (वर्षावास म्हणजे पावसाळयातील निवास) वर्षावास काळात श्रध्दावान उपासक विहारात जावून धम्म-श्रवण करतात, विहारात भिख्खूंना श्रध्दाभावनेने भोजनदान करतात व आजही सातत्याने सुरु असतात. फार महत्व आहे या पोर्णिमेचे….. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे.