महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-१६ (२० जुन २०२४)
२८ ऑक्टोबर १९५४ रोजी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, बुद्ध, कबीर आणि फुले हे माझे तीन गुरु आहेत. माझे पहिले गुरु आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होय.
बाबासाहेब म्हणतात, बुद्ध धम्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण, तो धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे. बाबासाहेबांनी विद्या, विनय आणि शील या ती गोष्टींना विशेष महत्व दिले आहे. या तिन्ही गोष्टींना बुद्धाच्या तत्वज्ञानात फार महत्व असल्याचे आढळून येते. बुद्धाचा धम्म हा केवळ धर्म आहे, असे बाबासाहेबांना वाटत नव्हते, तर बुद्ध धम्म एक क्रांति आहे, असे त्यांना वाटत होते. ही क्रांती फ्रेंच राज्यक्रांती इतकीच मोठी होती. जरी त्याचा प्रारंभ धार्मिक क्रांति म्हणून झालेला असला तरी त्याचे स्वरूप हे धार्मिक क्रांतीपेक्षाही व्यापक बनले होते. ही एक सामाजिक व राजकीय क्रांती आहे. Buddhism was a revolution. It was a great revolution as the French revolution. Though, it was began as a religious revolution, it became more than religious revolution. It became a social and political revolution.
यावरुन, बाबासाहेब बौद्ध धम्माकडे कोणत्या दृष्टीकोणातून बघत होते, यांची कल्पना स्पष्ट होते. बुद्धाचा धम्म म्हणजे ही एक सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक क्रांती होती, ज्या क्रांतीमुळे वेद प्रणीत चतुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज रचनेला प्रचंड हादरा बसला होता. बुद्धापूर्वी सामाजिक समता, स्वातंत्र्य, न्याय या गोष्टींचा कोणीही पुरस्कार केला नव्हता. परंतु, बुद्ध हे असे एक क्रांतिकारी तत्ववेत्ते होते की, त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरुद्ध समतेच्या धम्माचे प्रतिपादन केले होते. म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केले की, “समता, स्वातंत्र आणि बंधुत्व ही तत्वे तथागत बुद्धापासून मी स्वीकारली आहेत”.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाला आपले गुरु माणूनच थांबले नाहीत, तर बुद्धाच्या तत्वांना अनुसरून त्यांनी आपले सामाजिक, राजकीय, आर्थिक विचार मांडलेत. म्हणूनच, बुद्धाच्या विचारांचे प्रतिबिंब बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आढळते.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (४०-४१) या ग्रंथातून)