अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यात आजपासून बौद्ध समाज संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या संवाद यात्रेची अकोल्यातील सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली.
सत्ताधारी तसेच प्रस्थापित आरक्षणाच्या मुद्द्यावर कशा प्रकारे राजकारण करत आहेत याबाबत जागृती केली. आपले आरक्षण धोक्यात आणणारे निर्णय सत्ताधारी घेत आहेत. संविधान आणि आरक्षण धोक्यात आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी हा बौद्ध समाज यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले.
एससी, एसटी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा, भटके विमुक्त चेतना यात्रा, बौद्ध समाज संवाद यात्रा याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची मूठ बांधताना दिसत आहे. काही दिवसांतच आदिवासी अधिकार दौरा सुद्धा काढण्यात येणार आहे.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने, राजेंद्र पातोडे, अमित भुईगळ, भारतीय बौद्ध महासभेचे पी. जी. वानखेडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.