- 78
- 2 minutes read
भाजपचे ब्लॅकमेलिंग व ऑपरेशन लोटस झारखंडमध्ये सहाव्यांदा फेल…!
झारखंड टायगर चंपाई सोरेन अब ना घर के ना घाट के रहे…!
गेल्या 5 वर्षात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील लोकनियुक्त सरकार पाडण्याचा प्रयत्न ” ऑपरेशन लोटस ” म्हणजे ब्लॅकमेलिंगचे राजकारण करून भाजपने अनेक वेळा केला. अन् हे ऑपरेशन प्रत्येक वेळी फेल झाले. आमदारांना आमिषे, धमक्या देण्याचा प्रयत्न झाला. हेमंत सोरेन यांना ईडी, सीबीआयच्या सापळ्यात अडकवून अटक केली. जेलमध्ये टाकले. तरी ही केंद्रीय ऑपरेशन लोटस मंत्री अमित शहा यांना झारखंडमधील सरकार पाडून भाजपचे सरकार स्थापन करता आले नाही. आता आपल्या कार्यकालाच्या शेवटच्या टप्प्यात हेमंत सोरेनचे सरकार असताना ही झारखंड टायगर म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना हाताशी धरून शेवटचा प्रयत्न केला गेला. पण झारखंड मुक्ती मोर्चाच्या एका ही आमदारांनी त्यांना साथ देवून गद्दारी केली नाही. समय, काळ कुठलाही असला तरी गद्दारांना समाजात मान सन्मान मिळत नाही, हे या आमदारांना माहित असल्यानेच ते अमित शहाच्या धमक्यांना व अमिषाला बळी पडले नाहीत. अजित पवार व एकनाथ शिंदे अन् त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारासारखे ते गद्दार झाले नाहीत. ज्या पक्षाने, नेत्याने मानसन्मान, पद दिली, त्याच्याशी गद्दारी करण्याची हिंमत झारखंडमधील आमदारांची झाली नाही.
झारखंड विधानसभेचा कार्यकाल ५ जानेवारी २०२५ रोजी संपत असल्याने केव्हाही विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. पण त्या निवडणुका भाजपची सत्ता व मुख्यमंत्री असताना झाल्या तर गडबड करता येवू शकते. पोलिस यंत्रणा हातात असली तर मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करून निवडणूक जिंकता येवू शकते. यामुळेच भाजपने चंपाई सोरेनला हाताशी धरून हेमंत सोरेन सरकार पाडण्याचा व आपले सरकार स्थापन करण्याच्या सहाव्यांदा अखेरचा प्रयत्न विधानसभेचा कार्यकाल संपण्यास काहीच दिवस उरले असताना ही केला. यावरून भाजप सत्तेसाठी कुठल्याही स्थराला जावू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
भ्रष्ट्राचार व घोटाळ्याचे आरोप व त्यानंतर अटक होताच हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून आपले विश्वासू चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री बनविले. खरे तर आरोप सिद्ध झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी राजीनामा ही द्यायला नको होता. पण नैतिकतेचे राजकारण हेमंत सोरेनने केले व तेच त्यांच्या अंगलट आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमधून कारभार करीत आहेत. ते आपल्या कुठल्याच सहकाऱ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. राजकारणात असे नैतिक राजकारण करीत विश्वास ठेवला तर त्याची किंमत मोजावी लागते. याची अनेक उदाहरणे भारतीय राजकारणात आहेत. नितीश कुमार यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आपले विश्वासू जतीनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले. त्याची किंमत नितिशकुमार यांना मोजावी लागली आहे. पण लालू प्रसाद यांनी अशा प्रसंगी आपली पत्नी राबडी देवीला किचनमधून आणून डायरेक्ट मुख्यमंत्रीपदावर बसविले व ते त्यात यशस्वी झाले. राजकारणात कोण किती ही विश्र्वासातील असला तरी संधी मिळताच तो धोका देणार, हे भारतीय राजकारणाच्या चरित्राचा भाग झालेला आहे. त्यामुळे कुणी कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही. हेमंत सोरेनने ठेवला. त्याची किंमत ते मोजत आहेत. या अशा घटना घडत असल्याने खरेच इमानदार असलेल्या विश्वासू अनुयायाला यापुढे अशी संधी मिळणे कठीण होईल.
झारखंड मुक्ती मोर्चात नाराज असलेल्या चंपाई सोरेनवर जाळे टाकले. त्यांच्या मुलाचे घोटाळे बाहेर काढले. ब्लॅकमेलिंग सुरु झाले. पक्षात नाराज असलेले चंपाई गळाला लागले. त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन विरोधात ऑपरेशन लोटसच्या प्लॅनिंगनुसार बंड पुकारले. पण एकाही आमदाराने चंपाईला साथ दिली नाही. त्यामुळे बंड आपोआप थंड झाले. चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामूळेच त्यांना हेमंत सोरेनने आपल्या गैर हजेरीत मुख्यमंत्रीपदावर बसविले होते. पण मुख्यमंत्रीपद जाताच ते नाराज झाले. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजप व अमित शहाने केला. आमिष व धमक्या ही दिल्या. त्यास बळी पडून ज्या पक्षाने आपणाला मानसन्मान, मुख्यमंत्रीपद दिले त्या पक्षाशी गद्दारी करायचा प्लान तयार केला. आपल्यावर पक्षात अन्याय होत असल्याचे त्यांनी मिडीयाला जाहिरपणे सांगितले. गोदी मिडियाने मग ऑपरेशन लोटस , मास्टर stroke या खाली ब्रेकिंग न्युज सुरु केल्या. चंपाई सोरेनला झारखंडचा हिरो बनविले. कुठल्याही क्षणी हेमंत सोरेनचे सरकार पडेल व भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल, असे वातावरण मिडियाने तयार केले. पण चंपाईच्या गद्दारीला झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांनी साथ दिली नाही. त्यामुळे भाजपच्या नादी लागून चंपाई सोरेन तोंडावर पडले. भाजपच्या नादी लागून आपली राजकीय करियर स्वतःच संपवून टाकले. यामध्ये भाजप अन् खास करून आमित शहाची नाचक्की झाली आहे. पण याची त्यांना सवय आहे.
झारखंड राज्याच्या निर्मितीत झारखंड मुक्ती मोर्चाचे योग्यदन सर्वात अधिक आहे. या पक्षाचे संस्थापक शिबू सोरेन उर्फ गुरुजी हेच झारखंड राज्याच्या निर्मातीचे महानायक आहेत. त्यांच्यामुळेच चंपाई राज्याच्या राजकारणात आले. मंत्री व मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचू शकले. असे असताना चंपाईची गद्दारी व बंड झारखंडमधील जनतेला पचनी पडणारे नव्हते व नाही. त्यामुळे ते फसले. झारखंड मुक्ती मोर्चाशी गद्दारी करुन जे नेते भाजपसोबत गेले ते राजकारणातून संपले आहेत. तीच गत आता चंपाई सोरेनची झाली आहे. हे बंड फसल्याने आता चंपाई सोरेनची राजकीय कार्यकिर्त धोक्यात आली असून ऑपरेशन लोटस फसल्याने भाजपने त्यांना आता वाऱ्यावर ही सोडून दिले आहे. त्यामुळे झारखंडचा टायगर म्हणून ओळख असलेले चंपाई यापुढे गद्दार म्हणून ओळखले जाणार आहेत.
ज्यांना राजधर्म कळत नाही, अशा मोदींच्या हातात देशातील केंद्रीय सत्तेची सूत्र आहेत व एक मोस्ट वॉन्टेड तडीपार त्यांच्या सोबत देशाचा गृहमंत्री म्हणून काम करीत आहे. अन् त्याला गोदी मिडियाने चाणक्य हे नाव दिले असून तोच ” ऑपरेशन लोटस ” या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे राजकरण करीत आहे. हाताशी गृह मंत्रालय असल्याने सर्व तपास यंत्रणाचा वापर या ऑपरेशन लोटसच्या वेळी करण्यात येतो. म्हणजे ज्या राज्यात विरोधकांचे लोकनियुक्त सरकार आहे, त्या सरकारला अस्थिर करण्यासाठी आमदारांना ईडी, सीबीआयच्या नोटीसा पाठविलेल्या जातात. अटक वॉरंट काढली जातात. धमक्या दिल्या जातात. घाबरून ते स्वपक्षाशी व निवडूण दिलेल्या जनतेशी गद्दारी करून भाजपात सामिल होतात. यास ऑपरेशन नाहीतर ब्लॅकमेलिंग म्हणतात, अन् हे करणाऱ्याला राजकीय दलाल, एजेंड म्हणतात. चाणक्य म्हणत नाहीत. पण राजकीय ब्लॅकमेलिंगच्या या आपल्या धंद्यात मोदी, शहाने मिडियालाही सामिल करून घेतले असल्याने तो मिडिया ही या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणातील भाजपचा एक सहयोगी आहे.
भाजप देशातीलच नव्हेतर जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे, हा दावा भाजपचा आहे. तो खरा आहे. पण या मागचा इतिहास भाजपच्या पुढील पिढ्यांना अपमानित करणारा आहे. जसे आज सावरकरांच्या बाबतीत साऱ्या हिंदुत्ववाद्यांना अपमान सहन करावा लागत आहे. नेमक्या त्याच पद्धतीने ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाची उत्पती करून आपल्या पुढील वारसांचे अतित कलंकित करुन टाकले आहे. अन् त्याचा कर्ताधर्ता एक तडीपार आहे. मोदींच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात किमान १२ पेक्षा अधिक वेळा लोकनियुक्त सरकारे या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात बळी पडली आहेत. तर देशातील विविध राजकीय पक्षांच्या सुमारें ४५० ते ५०० आमदारांना व काही डझन खासदारांना भाजपने सत्तेची आमिषे व जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देवून आपल्या पक्षात घेतलें आहे. त्यामुळे भाजप सर्वात मोठा पक्ष बनला आहे. पण या मोठेपणाचा इतिहास मात्र काळाकुट्ट आहे. तोच इतिहास या पुढील राजकारणात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे. अन् याची चाहूल आता संघाच्या शीर्ष नेतृत्वाला ही लागली आहे.
एखाद दुसऱ्या प्रयत्नात ऑपरेशन लोटस यशस्वी होऊन भाजपने आपली सत्ता अनेक राज्यात स्थापन केली. महाराष्ट्रात तर नैसर्गिक मित्र असलेल्या कडव्या शिवसेनेची पूर्ण वाताहत करून तुकडे केले. पण भाजपचे लोटस ऑपरेशन झारखंडमध्ये सतत फेल होत गेले. हे शल्य मोदी व शहाला असून त्यांचा अहंकार यामुळे दुखवला आहे. झारखंडमध्ये आपले सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून जेलमध्ये टाकले. खोट्या गुह्यात अडकवले. पण हेमंत सोरेनने पक्षावरील आपली पकड कायम ठेवत मोदी, शहाला भीक घातली नाही. त्यामुळे अहंकार दुखावलेल्या भाजपने झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते , हेमंत सोरनचे विश्वासू माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना हाताशी धरून अगदी शेवटचा प्रयत्न केला. पण तो ही फेल झाला.
——————————-
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)