देशात डिमॅट अकाउंटची संख्या २० कोटींना स्पर्श करत आहे. शेयर बाजारातील समग्र रिटेल मार्केट मधील आकडेवारी घेतली तर चित्र अजून गडद होईल. सध्या फक्त म्युच्युअल फंडाची आकडेवारी बघू.
जून २०२५ अखेरीस भारतातील सर्व म्युच्युअल फंडांकडे असणाऱ्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा आकडा ७५ लाख कोटी झाला आहे. कोविड नंतरच्या गेल्या फक्त पाच वर्षात तो अडीच पटींनी वाढला आहे. पुढच्या दोन तीन वर्षात तो १०० लाख कोटी पर्यंत जाईल असे अंदाज आहेत.
_______
आकडेवारीतून समोर येणाऱ्या दोन घडामोडी दखल पात्र आहेत.
एक, देशातील उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार फारसे नव्हते. आता उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील शहरांमधून मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडात गुंतवणुकी होत आहेत. देशातील छोट्या आणि मध्यम शहरांचा एकूण वाटा २० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
दोन, देशातील ३० वर्षाखालील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणुकी करत आहे. देशातील एकूण म्युच्युअल फंडांमध्ये या वयोगटाचा वाटा पाच वर्षांपूर्वी फक्त २२ टक्के होता तो आता ४० टक्के झाला आहे; ज्यावेळी एकूण कॉर्पस काही पटींनी वाढला आहे. हे सारे तरुण शिक्षित, स्मार्ट फोन, इंटरनेट वापरणारे आहेत.
______
ही पोस्ट फक्त आकडेवारी देण्यासाठी नाही. ही पोस्ट फक्त तुम्हा वाचकांसाठी नाही. ही पोस्ट माझ्यासाठी देखील आहे.
मी जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीचा आणि विशेषतः वित्त भांडवलाचा राजकीय टीकाकार राहिलो आहे. अनेक दशके. अजूनही आहे. भविष्यात देखील राहीन.
वरील आकडेवारीच्या उजेडात मी स्वतःला प्रश्न विचारत असतो. की माझी कॉर्पोरेट भांडवलशाही आणि वित्त भांडवलावरील टीका मी, वित्त भांडवलशाहीमध्ये नव्याने स्टेकहोल्डर्स बनत असणाऱ्या या तरुण पिढीपर्यन्त कशी पोहोचवणार आहे.
मला आत्मविश्वास आहे. कारण मी २२ ते २५ वयोगटातील मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट फायनान्स आणि अनुषंगिक विषय १७ वर्षे शिकवत होतो. शिकवताना या प्रणालीवर धारदार राजकीय टीका करून. मी विद्यार्थ्यांना हे आवर्जून सांगत होतो की मी स्वतः कॉर्पोरेट, बँकिंग आणि शेअर मार्केटच्या डिलिंग रूम मध्ये काम केले आहे. माझ्या देखील शेअर्स मध्ये जुजबी गुंतवणुकी आहेत.
तरी देखील मी या प्रणालीचा राजकीय टीकाकार आहे. आणि भविष्यात राहीन. तुम्ही संकुचित गुंतवणूकदार म्हणून वित्त क्षेत्राकडे बघू नका. नागरिक म्हणून, होणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे आईबाप म्हणून बघा. राजकीय अर्थव्यवस्था स्वयंभू असते. ती तुम्हाला उध्वस्त करते.
तुम्ही विशिष्ट धर्मात जन्माला आलात म्हणून दरवेळी तुम्हाला त्या धर्मच्या नावावर चाललेल्या धर्मांधपणाचे पाठीराखे व्हायची गरज नाही. तसेच तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करता म्हणून कॉर्पोरेट क्षेत्राचे आणि शेयर्स मध्ये गुंतवणूक करता म्हणून वित्त भांडवलाचे राजकीय समर्थक व्हायची गरज नसते. यात नीती , अनीती आणू नका. ओरिजिनल , राजकीय विचार करायला शिका
_________
कॉर्पोरेट भांडवलशाही आणि वित्त भांडवलावरील टीका नैतिक, जजमेंटल नाही तर फॅक्टस, विश्वसनीय आकडेवारी, लॉजिक घेऊन केली, चिरंतन मानवी मूल्ये समजावत केली की तरुण पिढीला त्या टीकेत तथ्य आहे हे पटते. हे मी त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर बघत होतो. तरुण शिक्षित पिढीला जागतिक कॉर्पोरेट / वित्त भांडवलाच्या विरोधी राजकीय आंदोलनात (इथे राजकीय हा शब्द महत्त्वाचा आहे) उभे करणे मी महत्वाचे मानतो.
विद्यार्थी अनेक प्रश्न विचारायचे. उदा चीन आणि व्हियेतनाम देशात कम्युनिस्ट पक्षांची एकहाती सत्ता असताना ते देश शेयर मार्केट सारख्या संस्थां का स्थापन करतात ? अशा प्रश्नांना तार्किक उत्तरे दिल्याशिवाय तरुणापर्यंत आपली टीका पोचवता येणार नाही हे नक्की.
संजीव चांदोरकर (१८ ऑगस्ट २०२५)