- 27
- 1 minute read
भारतीय संविधानात उदात्त जीवनमुल्ये
भारतीय संविधानात उदात्त जीवनमुल्ये
प्रभाकर सोमकुवर
नागपूर
09595255952
———————————————————————————–——————————————————————————–
भारतीय संविधानकर्त्यांना देशातील पारंपारिक विषमता मुलक मानसिकतेचे चांगलेच ज्ञान व भान होते. म्हणुनच त्यांनी संविधानामध्ये मूलभूत हक्काची तरतूद केली आहे. त्यानुसार प्रत्येक भारतीयास जिवीत राहणे आणि व्यक्तीगत स्वातंत्र्य यांच्या संरक्षणाची हमी देते, ते कलम 21 होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान समाज सुधारक, जागतिक थोर व्यक्तिपैकी एक जगातील कायदे पंडीतांनी स्वाभिमान बाळगावा इतके विद्वान घटनाकार होते. त्यांच्यात विद्वत्ता, शालीनंता, उदारता आणि साधेपणाने भाराऊन टाकणारे प्रभावी व्यक्तिमत्वातील भारदस्तपणा व निर्भीड टिकाकार म्हणून या देशाला त्यांची दखल घ्यावी लागली म्हणुनच की काय देशाचे संविधान लिहिण्याची जवाबदारी त्यांना सोपविण्यात आली. देश कोणत्या कलमानुसार चालेल या संबंधीची राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजेच जवळपास 3 वर्षाच्या परिश्रमानंतर भारतीय राज्यघटना परिषदेने तयार केल्यानुसार भारतीय राज्यघटनेच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. भी. रा. आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेच्या संपूर्ण चर्चेनंतर घटना परिषदेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद व पंडीत जवाहरलाल नेहरु यांना सादर केली आणि आज ही भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून स्वातंत्र्य सार्वभौम लोकशाही प्रथान भारतात मोठ्या दिमाखाने वाटचाल करीत आहे, अशी घटना जगातील कोणत्याही देशाची नाही ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
राष्ट्र कोणते ही असो, राष्ट्र सुरक्षित चालविण्यासाठी तेथील घटना परिषद आपापल्या राष्ट्राची घटना बनवीत असते. फ्रांस, जर्मनी, रशिया, कॅनडा, द. अफ्रिका व अमेरिका वगैरे राष्ट्रांनी आपापल्या घटना याच पध्दतीने तयार केल्या. परतंत्र राष्ट्रक्रांती करुनच घटना परिषद बोलावतात व घटना तयार करतात, असा एक समज आहे. तो बरोबर नाही आणि घटना परिषदेला क्रांती आवश्यक असते असेही नाही. भिन्न-भिन्न परिस्थितीत भिन्न-भिन्न राष्ट्रांनी आपापल्या घटना बनविल्या व त्या कार्यक्षम केल्या. राज्य चालविण्याकरिता जी तत्वे अगर नियम देशातील ज्ञानी तयार करतात, तिला घटना म्हणतात. ही घटना मुक्त वातावरणात अनिर्बंध स्थितीत तयार केली, तर ती जास्त परिणाम सक्षम होत असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मसूदा समितीचे अध्यक्ष असुनही घटनात्मक विधी नियमाचे रुप देऊ शकले नाहीत. उलट डॉ आंबेडकरांच्या विद्वत्तेचा तत्कालीन राज्यकर्त्या वर्गाने त्यांच्या वर्गीय हिताच्या समर्थनार्थ बाबासाहेबांचा उपयोग करुन घेतला तेव्हा हा देश तगू शकला.
घटना ही राज्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्या राज्याच्या घटकांना व देशातील व्यक्तींना स्वातंत्र्य देत असते. व्यक्तीच्या किंवा घटकांच्या स्वातंत्र्यामुळे तर राज्यच धोक्यात येत असेल तर त्या स्वातंत्र्याला मुरड घालणे अपरिहार्य होते. राष्ट्राचे स्थैर्य नुसत्या लष्करी सत्तेवर अवलंबून नसते. आर्थिक स्थैर्य नसलेली घटना ही केव्हा कोलमडून पडेल हे सांगता येत नाही. तेव्हा ज्या घटनेत आर्थिक स्थैर्याची तरतूद नसते ती घटना कितीही प्रगतीपर वाटली तरी शेवटी ती क्षीण होत जाते. सामाजिक समता ही देखील असावी लागते. समाज जर भेदा-भेदांनी पोखरला गेला तर त्यात आपलेपणाची भावना उरत नाही आणि राज्य दुर्बल होत जाते. तेव्हा राज्याच्या स्थैर्यला बाधा येऊ न देता राजकीय, आर्थिक, सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक वगैरे प्रश्नांचा विचार करावा लागतो. कोणतीही घटना चांगली वा वाईट हे ठरविण्याचा प्रयत्न सुरुवातीला कोणी करु नये, कारण घटना ही मुलतः अचेतन असते. तिच्यातील परिणाम क्षमताही व्यक्ती तिचा वापर ज्या प्रमाणे करतील त्यावर अवलंबून असते. चांगली घटना वाईट कारभारामुळे भ्रष्ट होते आणि बाहयतः वाईट दिसणारी घटना चांगल्या व्यक्तीच्या हातात गेली तर ती चांगली ठरते.
घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बी. आर. आंबेडकर आपल्या उत्तरादाखल सविस्तर विचार मांडतांना म्हणतात की, मसुदा समितीने केलेल्या कामाची घटना परिषदेच्या सर्व सभासदांना एकमुखाने प्रशंसा केली आहे, हे पाहून मला अत्यंत आनंद वाटतो. मसुदा समितीने घेतलेल्या परिश्रमाचे इतक्या और्यायाने व मनःपूर्वक गुणग्रहण होत आहे. याबदल मसुदा समितीला धन्यता वाटेल, अशी माझी खात्री आहे. घटना परिषदेच्या सभासद व मसुदा समितीतील माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जो स्तुतीचा वर्षाव केला आहे, त्यामुळे मी इतका दडपून गेलो आहे की, त्यांच्यासंबंधी योग्य शब्दात व पूर्णपणे कृतज्ञता व्यक्त करता येणे मला अशक्य वाटते. कोणतीही घटना परिणामकारक होण्याकरता तिच्यात पुरेसा लवचिकपणा असावा लागतो. राज्यावर संकटे आले म्हणजे सारी सत्ता मध्यवती सत्तेला आपल्या हातात घेता आली पाहिजे. त्याशिवाय देशाचे रक्षण होत नाही, हा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे.
ते पुढे म्हणतात की, मी फक्त अनुसुचित जातीच्या हितसंबंधाचे रक्षण करण्याची आकांक्षा धरुन मी घटना परिषदेत आलो, त्यावेळी जास्त जबाबदारीची कार्ये माझ्यावर सोपविली जातील अशी मला किंचितही कल्पना नव्हती. म्हणून घटना परिषदेने मसुदा समितीवर मला जेव्हा निवडले तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटले आणि मसुदा समितीच्या संभासदांनी समितीचा अध्यक्ष म्हणून माझी जेव्हा घोषणा केली तेव्हा माझ्या आश्चर्यास पारावार राहिला नाही. आपल्या मसुदा समितीत माझ्यापेक्षा अधिक मोठे विद्वान अधिक तोलाचे व अधिक लायक लोक होते, तरी देखील मसुदा समितीने माझ्यावर जो विश्वास टाकला व माझ्याकडून हे काम करवून घेऊन देशाची सेवा करण्याची मला जी संधी दिली, त्याबद्दल मी त्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे.
भारतीय जनतेच्या हाती घटना सोपवितांना आणि 1954 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठासमोर भाषण करतांना बाबासाहेबांनी विचार मांडले होते. देशाहाती घटना देतांना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेवून राजकारण केले जाईल, त्यावेळी पहिल्यांदा लोकशाही धोक्यात येईल व त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल. बाबासाहेबांपुढे उभ्या ठाकणाऱ्या सामाजिक संघर्षाची जाणीव होती म्हणूनच विशेष करुन जी मंडळी वैदीक परंपरा मानतात त्यांच्या साठीच बाबासाहेबांनी ही भूमिका मांडली होती. वैदिक धर्म पाळणाऱ्यांना मनुस्मृती मधील सामाजिक व्यवस्था अभिप्रेत आहे, तिला ते मानतात ही मनुची विचार सरणी आणि भारतीय राज्य घटनेची सामाजिक विचार सरणी या एकमेकांच्या विरोधी आहेत. भारतीय राज्य घटनेचा सामाजिक रस्ता उत्तरेकडे चालला असेल तर वैदिक धर्मातील मनुने सांगितलेल्या सामाजिक व्यवस्थेचा रस्ता हा दक्षिणेकडे चाललेला आहे. या दोन विरोधी रस्त्यांपैकी वैदीक परंपरा सोडून भारतीय राज्य घटनेत मांडलेला सामाजिक समतेचा रस्ताच तुम्ही स्विकारला पाहिजे, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. पूर्वी लोक मागासवर्गीय लोकांना शिवत नव्हते, आता तीच लोकं मागासवर्गीय होण्यासाठी आंदोलन करतात ! खरंच बाबासाहेब तुम्ही ग्रेट आहात !
एक लक्षात ठेवावे लागेल, अविष्कार स्वातंत्र्याच तत्व ज्या राज्य घटनेत समाविष्ट आहेत. तीचे शिल्पकार डॉ आंबेडकर आहेत. या देशाच्या इतिहासात आपल्या पूर्वजांना हजारो वर्ष अभिव्यक्ति आणि अविष्कार स्वातंत्र्य नाकारण्यात आलं होतं आणि आपल्या वंशजांनाही ते सहजासहजी मिळणार नाही याची पूर्व कल्पना डॉ बाबासाहेबांना होती. तेव्हा त्यांनी वंचितांच्या हातात एक शस्त्र दिलं, ते केव्हा उगारायचं त्याचा मान न ठेवता शस्त्रच जर पार बोथड केले तर शोषकच पुन्हा मुजोर होतील असा सावधतेचा इशारा सुध्दा त्यांनी दिला होता. बाबासाहेबांच्या अस्मितेचा साक्षात्कार या दुर्देवी देशाला झाला नाही, हीच खरी शोकांतीका म्हणावी लागेल. परंतू बाबासाहेब मात्र घटनाकार त्याचप्रमाणे भाष्यकार म्हणुन भारतातच नव्हे तर जगात विख्यात झालेत त्यांची दिगंत र्किती अशीच अविचलित आणि अविस्मरणिय आहे व राहील.
डॉ बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीत व लिखाणात एकच ध्यास होता, तो म्हणजे जातिविरहित व वर्णविरहित समाज निर्माण करण्याचा व त्यासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या सामरिक विचारांची मुळे भारतीय राज्यघटनेत परिवर्तित होतात. त्यामुळे भारतीय राज्यघटना जगात सर्वात श्रेष्ठ म्हणून मान्यता पावली. डॉ आंबेडकर दृष्टया युगपुरुषाचे या देशावर फार मोठे उपकार आहेत, ते केवळ विशिष्ट समाजाचे नेते नव्हते तर ते या देशाचेच खरे आधारस्तंभ होते. हा देश राष्ट्र म्हणुन भक्कमपणे उभा करण्यासाठी त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षा, लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, आर्थकि न्याय, राजकिय न्याय, संधीची समानता आम्हाला ही उदात्त जीवनमुल्ये दिली, ती आपण सर्वांनी जोपासली पाहिजे. संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
*****
(प्रभाकर सोमकुवर)
Cell No. 09595255952