- 737
- 1 minute read
भ्रष्टाचारी, दलाल, लुटारू, गुन्हेगार अन् देशद्रोही शक्तींच्या आधिपत्याखालील सत्ता व सरकार म्हणजेच रामराज्य….!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 737
पाशवी बहुमताच्या जोरावर चार गुजरात्यांनी देशाची पार वाट लावली आहे. दोन गुजराती देश विकत आहेत अन् दोन कवडीच्या भावाने तो विकत घेत आहेत. नागरिकांच्या हक्काची सनद असलेले संविधान, सवैधानिक संस्था, न्याय व्यवस्था या सर्वांसमोर याच चार गुजरात्यांनीं संकट उभे केले आहे. देशाची शान अन् गौरव लिलावात काढला आहे. आणीबाणी पेक्षाही भयानक परिस्थिती देशात सुरु असून जनविरोधी, देश विरोधी, संविधान विरोधी अन् देशद्रोही सरकारचा संसदीय मार्गाने विरोध करणे हा घटनात्मक अधिकारच आता गुन्हा ठरू लागला आहे. दिवसा ढवळ्या बँका विकल्या व लुटल्या जात आहेत. त्या लुटीतून दलाली मिळविली जात आहे. त्या दलालीतून विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारं पाडली जात आहेत. आमदार व खासदारांचा घोडेबाजार सुरु आहे. भ्रष्टाचारी व गुन्हेगारांना राज्य मान्यता देवून त्यांच्याच हातात सत्तेच्या चाव्या देवून लूटमार सुरु आहे. अन् यास राम राज्य हे गोंडस नाव देण्यात या देशद्रोही शक्तींना यश आले असून धर्म सत्तेचे भूत मानगुटीवर बसलेली जनता या राम राज्याचा जयजयकार करीत आहे.
आयेगा तो मोदी ही…… हा नारा आज ही देशात दिला जात आहे. देशातील सारे सार्वजनिक उद्योग व बँका विकून जनतेला बेरोजगार करणारा व देशाला दिवाळखोरीत ढकलणारा मोदीचा या देशात जयजयकार होत असेल तर या देशाला बरबाद होण्यापासून वाचविणे फारच कठीण आहे. दोन कोटी रोजगार देण्याचा वादा करुन सत्तेवर आलेल्या मोदीने वर्षाला करोडो रोजगार गायब केले आहेत. याची कबुली स्वतः सरकारच देत आहे. तरी ही आयेगा तो मोदी ही, या तालावर धर्म सत्तेची झापडे घातलेली जनता झुम नाच करीत असेल तर देश एका भयान संकटाचा सामना करीत आहे, हे उघड सत्य आहे.
देश विरोधी एका षढयंत्रातून २०१४ मध्ये संघ व भाजपची सत्ता आली. अन् गुजरात दंगलीचा अनुभव गाठी असलेल्या आदमखोर मोदी व शहाच्या गळ्यात त्या सत्तेची सुत्र आपसूक आली. हिंदू – मुस्लिम राजकारण व हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची प्रयोगशाळा म्हणून त्या अगोदर दोन दशक गुजरातमध्ये संघाचे काम मोदीच्याच नेतृत्वात सुरु होते. त्यामुळे सत्तेवर मोदीच आला. अन् सर्व देशभर हिंदू – मुस्लिम राजकारण, त्यातुन दंगली, सामाजिक तणाव निर्माण झालेला दिसतो. आज या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात हिंदू अन मुस्लिम अशी दोन राष्ट्र निर्माण करण्यात संघाला यश आले असून दुसऱ्या राष्ट्रातील मुस्लिम समाज देशाचा राजकीय, सामजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्राच्या विकासाच्या परिघा बाहेर फेकला गेला आहे. संघाचा हाच अजेंडा असून गेल्या दहा वर्षात अजेंड्याची अंमलबजावणी करण्यात बरीच मजल या शक्तींनी मारली आहे.
लोकशाही व्यवस्था अन संविधानाचे राज्य संपवून मनुस्मृतीच्या कायद्याचे राज्य आणणे, हा हिंदू राष्ट्र निर्मितीचा मुख्य अजेंडा आहे. यावेळी भाजपला सत्ता मिळाली त्या दिशेने पावले टाकली जातील. त्यामूळेच देशात होत असलेली लोकसभेची निवडणूक ही शेवटचीच आहे, अशी भिती अनेक विचारवंतांनी व्यक्त केली आहे. यामध्ये देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांच्या पतीचा ही समावेश आहे. त्यांना ही वाटते ही शेवटचीच निवडणूक आहे. अन ही भीती काही अनाठायी नाही. गेल्या दहा वर्षाच्या सत्ताकाळात याची प्रचिती भाजपने अनेक वेळा दिली आहे. अगदी जगभरने ही भारतीय लोकशाही बद्दल चिंता व्यक्त केली आहे. अन् म्हणून ही निवडणूक अतिशय महत्त्वाची व देशाचे भवितव्य ठरविणारी आहे.
गेल्या दहा वर्षाच्या सत्ताकाळात भाजप सरकारने अनेक जनविरोधी घोरणे राबविली. कायदे केले. पण कृषि व नागरिकता विधेयकांची अंमलबजावणी करण्यात जन आंदोलनामुळे सरकारला अपयश आले. यावेळी पुन्हा या शक्तींना सरकार स्थापन करण्याची संधी आपण दिली तर या आंदोलन व आंदोलकांना चिरडून या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकता कायदा लागू करण्याची घोषणा निवडणुकींच्या तोंडावर करुन त्याची चुणूक ही या शक्तींनी दाखवून दिली आहे. यासाठी भाजपला पुन्हा सत्ता हवी आहे. ” लोकशाही व संविधानावर निष्ठा असलेले आपण भारतीय नागरीक भाजपला रोखण्यासाठी काय करणार आहोत का ? हा खरा प्रश्न आहे.
……………..
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश
0Shares