- 83
- 1 minute read
मनुवादी ‘जगीरा’ संस्कृती
‘चाईना गेट’ या चित्रपटात जगीरा नामक खलनायक आहे. तो आपल्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजे नायकाला म्हणतो,
“हमसे लड़ने की हिम्मत तो जुटा लोगे, पर कमीनापन कहाँ से लाओगे?”
अर्थात :
आमच्याशी लढण्यासाठीचं धाडस तुम्ही दाखवू शकाल, पण आमच्यासारखा कमीनापणा कुठून आणणार? नीचपणाचा कळस कसा गाठणार?
जगीराने आपल्या या डायलॉगद्वारे जगातल्या आजवरच्या तमाम नायकांच्या मर्यादा आणि खलनायकांच्या क्षमता व विजयाचे मर्मच अधोरेखित केले आहे.
दुर्जनांचं सामर्थ्य शौर्यात नव्हे, तर त्यांच्या क्रौर्यात आणि नीचपणात असते. सज्जन माणसं शूर बनू शकतात, पण क्रूर व नीच बनू शकत नाहीत. सज्जनांची ही मर्यादा दुर्जन पुरेपूर ओळखून असतात.
जगीरा तेच म्हणतोहे माझा मुकाबला तुम्ही ताकदीने नाही करु शकणार. कारण कमीनापन हीच माझी ताकद आहे. आणि कमीनापनाची तर तुम्हाला सक्त नफरत आहे. कमीनापणाचा मुकाबला नफरतीने नव्हे, तर कमीनापणानेच होऊ शकतो. माझा पराभव करण्यासाठी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कमीना व्हावं लागेल. आहे का तुमच्यात ती हिंमत?
कसलीही बांधिलकी व विधीनिषेधाची पर्वा बाळगत नसल्यामुळे जगीराच्या मनात ‘टू बी नॉट टू बी’ चं द्वंद्व नसतं. पाहणाऱ्याला लाज वाटते, पण हागणाऱ्याला लाज वाटत नसते!’ ही म्हण जगीराचं ब्रीदवाक्य असते.
परिणामी नीचपणाच्या बाबतीत जगीरा कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांचा मुकाबला शौर्याने करता येऊ शकत नाही, तो अतिनीचपणानेच करता येऊ शकतो. तर सज्जन कोणत्याही परिस्थितीत नीच बनू शकत नाहीत. नीच बनण्यापेक्षा सज्जन हार वा बलिदान पत्करतात. शपांनी (कॉम्रेड शरद् पाटलांनी) यामुळेच म्हटले आहे, “महामानवांची महत्तमता हीच त्यांची मर्यादा असते.” सज्जनांच्या या मर्यादा जगीरा ओळखून असतो.
जगीराची जी विचारसरणी तीच मनुवादी संघाचीही विचारसरणी आहे. म्हणूनच त्यांच्या छावणीत जगीराच जन्माला येत असतात. जगीरांचं उदात्तीकरण करुन ते त्यांना महानायक म्हणून प्रोजेक्ट करतात. त्याने काम भागले नाही, तर बहुजन छावणीतले महानायक ते हायजॅक करतात. ‘मुख में रामनाम और बगल में छुरी’ या (अ)नीतीचा सदैव अवलंब करतात. परिणामी प्रत्येक मनुवाद्याच्या नेणीवेत जगीरा लपलेला असतो.
‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात सावरकरांच्या मुखातून त्यांच्या नेणीवेत दडलेला जगीराच बोलताना दिसतो. म्हणूनच ते शिवरायांच्या कर्तबगारीला ‘काकतालीय योग’ आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला सन्मानाने परत पाठविण्याच्या शिवरायांच्या सज्जनपणाला ‘सदगुण विकृती’ म्हणातात.
‘उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका’ हा उपदेश फक्त बहुजनांसाठी असतो. स्वतः मात्र नीचपणावर आले, तर ते भरल्या डेगीतही मूतायला कमी करत नसतात. पंढरपूरच्या कुंडात मूतणारा बडवा जगीराच होता.
‘जगीरा’ हा मनुवाद्यांचा तारणहार असल्यामुळे सत्ता हाती आली, की सर्व क्षेत्रातले झाडून सारे ‘जगीरा’ ते आपल्या छावणीत गोळा करतात. सर्व महत्त्वाच्या प्रशासकिय पदी जगीरांची प्रतिष्ठापना करतात. व त्यांच्या छत्रछायेखाली आपला अजेंडा राबवतात. जननायकांवर खोटे आरोप लादून त्यांना देशद्रोही ठरवून बंदिवान बनवितात. सर्वत्र भयाचं वातावरण निर्माण करतात.
तथापि मूठभर विरोधकांची तुरुंगात रवानगी करणे सोपे असते. पण सर्वसामान्य प्रजा विरोधक बनली तर तिची तुरुंगात रवानगी करण्याएवढे तुरुंग, आजवर कोणीही जगीरा उभारु शकलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही सदैव धाकात असली पाहिजे, यावर जगीराचा कटाक्ष असतो. कवी गोरख पांडेय लिहितात,
वे डरते हैं
किस बात से डरते हैं वे
तमाम धन-दौलत, गोला-बारुद
पुलिस फौज के बावजूद?
वे डरते हैं कि
एक दिन
निहत्थे और गरीब लोग
उनसे डरना बंद कर देंगे!!
जगीरा लोकप्रिय नव्हे तर ‘धाकप्रिय’ असतो. त्याचं साम्राज्य धाकावर आधारित असतं. पण कोणतीही गोष्ट नित्याची झाली की तीची परिणामकारकता कमी कमी होत जाते, धाकही त्याला अपवाद नसतो. हे मदांध जगीराला कळत नसते.
रोमन सम्राट विरोधकांना सर्वांगावर खिळे ठोकून क्रॉसवर टांगण्याची भयंकर शिक्षा देत. व त्या शिक्षेच्या धाकाने जनतेला धाकात ठेवत. पण लोकांना धाकात ठेवण्याच्या नादात त्यांनी प्रभू येशूंनाही क्रॉसवर टांगले. तीच गोष्ट रोमन साम्राज्याच्या पतनास कारणीभूत ठरली. सत्तांधळेपणामुळे त्यांना कळले नाही, की महामानवाच्या हत्येने लोकांच्या मनातल्या भयाची जागा असंतोष घेतो आणि दुबळ्यांच्या अंगीही हत्तीचं बळ येतं नि ते गरजतात,
सितमगर! तुझसे उम्मीदे करम, होंगी जिन्हें होंगी,
हमें तो देखना ये है, कि तू जालिम कहां तक है!
– एस. एच. बिहारी
अर्थात :
दुष्ट माणसा! तुझ्याकडून सज्जनपणाची आशा ज्यांना वाटत असेल, त्यांना वाटू देत. आम्हाला तर तुझ्या दुष्टपणाचीच परीक्षा पहावयाची आहे, की तू किती दुष्ट बनू शकतोस.
आणि खरोखर आजवर क्रॉसची भीती बाळगणारी रोमन जनता गळ्यात क्रासची लॉकेट्स घालून, रोमन सम्राटांना वाकुल्या दाखवू लागली. चर्चेसच्या महाद्वारांवर क्रॉस झळकू लागले. रोमन सम्राटांच्या क्रॉस नामक भयाच्या प्रतीकाचा लोकांना धाक वाटेणासा झाला. क्रॉस हे हौतात्म्याच्या प्रेरणेचं महत्तम प्रतीक बनले.
जगीराला महाजगीराने उत्तर ही काट्याने काटा काढण्याची रणनीती, ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी ठरु शकते. या इलाजाचा अवलंब करणाऱ्यांवर शेवटी, पहिला जगीरा बरा होता, असं म्हणण्याची पाळी येते. म्हणून वार करुन नव्हे, तर सत्याग्रही बनून हसत हसत, जगीराचे वार झेलत, त्याचं कमीनापणाचं हत्यार बोथट करतच, जगीराचा पराभव करता येतो. भगवान बुद्धांनीही म्हटले आहे, “आगीने आग विझत नसते, ती पाण्यानेच विझत असते.”
मंगळवार : – सुभाषचंद्र सोनार,
दि. १७.०८.२०२१ : राजगुरुनगर.
***