• 24
  • 3 minutes read

मनुस्मृती आणि महिला

मनुस्मृती आणि महिला

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश असावा का ? या विषयावर सध्या महाराष्ट्रात मोठे घमासान सुरु आहे. जर अभ्यासक्रमात मनुस्मृतीसारख्या विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या ग्रंथाचा समावेश केला गेला तर संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे. आपल्या देशातील अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. या महिला समाज जीवनातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत आहेत. मनुस्मृतीची शिकवण जर समाजात लागू झाली तर या महिलांची अवस्था काय होईल ? मनुस्मृती महिलांविषयी काय म्हणते याचा संक्षिप्त आढाव्या या लेखात घेण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वपूर्ण निवाडा दिला होता. पत्नी जणूकाही पतीची मालमत्ता आहे, ही मध्ययुगीन धारणा समाजात अद्याप कायम आहे, असे निरीक्षण नोंदवित पत्नीची हत्या करणा-या आरोपीला दया दाखविण्यास नकार दिला. अशाप्रकारची हीन मनोवृत्ती भारतात रुजण्यामागे मनुस्मृतीसारखे हिंदू धर्माचे तथाकथित धर्म ग्रंथ कारणीभूत असल्याचे भारताच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास लक्षात येते.
भारताच्या प्रचीन इतिहासाचा आढावा घेतल्यास असे निदर्शनास येते की आर्यांच्या भारतावरील आक्रमणापूर्वी येथे स्त्रियांना सन्मानाची वागणूक, बरोबरीचा दर्जा आणि समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी बजावण्याची समान संधी उपलब्ध होती. आर्यांच्या पूर्वी भारतात सिंधू संस्कृती अस्तित्वात होती. दास राजांची अतिशय प्रगत व बलाढ्य साम्राज्ये होते. यापैकी नमुची नावाच्या दास राजाकडे महिला सेनेची बटालियन होती, जिने युद्धात इंद्राच्या नेतृत्त्वाखालील सैन्याचा मुकाबला केला. याबाबतचा पुरावा ऋग्वेदातील पाचव्या मंडळातील 30 व्या सुक्ताच्या 9 व्या ऋचेत आढळतो, ज्यात म्हटले आहे –
स्त्रियो हि दास आयुधानि चक्रे किं मा करन्नबला अस्य सेनाः.
अन्तर्ह्यख्यदुभे अस्य धेने अथोप प्रैद्युधये दस्युमिन्द्रः..
अर्थ – (नमुची)दासाने स्त्रियांची सेना युद्धभूमीवर उभी केली. परंतु अशी दुर्बल(अबला)सेना काय करु शकते ? असा विचार करीत इंद्राने त्यातील दोन सुंदर स्त्रियांना आपल्या घरी ठेवून घेतले आणि नमुची सोबत युद्ध करण्यासाठी निघून गेला.
नमुचीच्या महिला सेनेच्या तुकडीशिवाय ऋग्वेदात वृत्रमातेचा जिने आपला पुत्र वृत्र याच्या रक्षणार्थ इंद्राचा मुकाबला केल्याचा उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील 32 व्या सुक्ताच्या नवव्या ऋचेत आढळतो –
नीचावया अभवद् वृत्रपुत्रेन्द्रो अस्या अव वधर्जभार .
उत्तरा सूरधरः पुत्र आसीद् दानुः शये सहवत्सा न धेनुः ..
अर्थ – वृत्राच्या रक्षणार्थ स्वसामर्थ्यासह इंद्रावर चालून गेलेल्या वृत्रमातेला इंद्राने आपल्या संहारक वज्राने ठार मारले. वत्सासह निद्रिस्त होणाऱ्या गाईप्रमाणे ती राक्षसी स्वपुत्रासह निपचित पडली.
ज्याअर्थी स्त्रिया सैनिकी शिक्षण घेऊन युद्धभूमीवर पराक्रम गाजवितात त्याअर्थी तत्कालीन समाज किती प्रगत असावा याची कल्पना येते. याचाच अर्थ त्या काळात स्त्री-पुरुष भेदभाव नव्हता. स्त्री असो की पुरुष योग्यतेनुसार कोणताही पेशा किंवा व्यवसाय करण्याची मुभा होती, हे स्पष्ट होते. या ऋचेतील अबला या शब्दाचा उल्लेख वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर आपण पाहिले की भारतात महिलांना समानतेची वागणूक मिळत होती. आर्य भारतात आल्यानंतर स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आणि तेव्हापासून स्त्रियांकडे अबला या दृष्टिने पाहिले जाऊ लागले.
भारतीय समाजातील महिलांची स्थिती पाहून अगदी प्रारंभीच्या काळात रणनीतिचा एक भाग म्हणून आर्यांनी स्त्रियांबाबत थोडे नरमाईचे धोरण अंगीकारले, असे दिसते. घरातील यज्ञ कार्यात स्त्रिया पतीला सहकार्य करीत असल्याचा उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील 72 व्या सुक्ताच्या 5 व्या ऋचेत आढळतो-
संजानाना उप सीदन्नभिज्ञु पत्नीवन्तो नमस्यं नमस्यन्.
रिरिक्वांसस्तन्वः कृण्वत स्वाः सखा सख्युर्निमिषि रक्षमाणाः..
अर्थ – हे अग्नी ! देवगण तुझ्यासमोर नतमस्तक होऊन बसले आणि आपल्या पत्नींसोबत तुझी पुजा करु लागले. देवता तुझे मित्र आणि तुझ्याद्वारे संरक्षित होते. त्यांनी आपला मित्र अग्नीला पाहिले आणि यज्ञ करु लागले.
या ऋचेतील देवगण आपल्या स्त्रियांसोबत(पत्नी)तुझी पूजा करु लागले हा उल्लेख फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. यावरुन हे स्पष्ट होते की यज्ञाचेवेळी पतीसोबत बसून पूजा करण्याचा अधिकार स्त्रियांना होता. परिणामी ऋग्वेदात घोषा लोपामुद्रा विश्पला विश्ववारा आणि सुदेवी या महिला ऋषिंचा उल्लेख आढळतो, ज्यांनी ऋग्वेदातील काही ऋचांची रचना केली आहे.
परंतु जसजसे आर्यांचे राजकीय स्थान बळकट होऊ लागले त्यांनी आपले खरे रुप दाखवायला सुरुवात केली. कारण आर्य ज्या सुमेरियन व बाबिलोनियन भूप्रदेशातून भारतात आले, तेथे स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान होते. सुमेरियात स्त्रियांसोबत कठोर व्यवहार केला जात होता. स्त्री पुरुषाच्या अधीन होती. पुरुषाचा व्यभिचार क्षम्य होता. परंतु स्त्रियांना याबाबत दंडित केले जात असे. अपत्यहीन स्त्रियांचा त्याग करुन दुसरा विवाह करण्याची पुरुषांना मुभा होती. बाबिलोनियामध्ये देखील स्त्रियांचे स्थान अगदी साधारण होते. त्यांना व्यापक कायदेशीर अधिकार नव्हते. त्या पुरुषांच्या अधीन होत्या. व्यभिचारी स्त्रीला देहदंडाची शिक्षा होती. पुरुषांना एकापेक्षा जास्त बायका करण्याचा अधिकार होता. अपत्यहीन स्त्रियांना घटस्फोट देण्याची प्रथा होती. अशा सामाजिक परिस्थितीतून आर्य भारतात आल्यामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक नव्हता.
वैदिक काळापासून समाजातील स्त्रियांचे स्थान हळूहळू कमी होऊ लागले. अथर्ववेदाच्या रचना काळापर्यंत ( इ.स.पू. साधारण 1000) कन्येपेक्षा पुत्राचे महत्त्व वाढल्याचे दिसते. अथर्ववेदाच्या तिस-या कांडातील 23 व्या सुक्ताच्या दुस-या मंत्रात याबाबतचा उल्लेख आढळतो –
आ ते योनिं गर्भ एतु पुमान् बाण इवेषुधिम्.
आ वीरोऽत्र जायतां पुत्रस्ते दशमास्यः..
अर्थ – हे स्त्री ! बाण ज्याप्रमाणे सहजपणे भात्यात जातो त्याप्रमाणे पुरुषाच्या वीर्याने युक्त गर्भ तुझ्या योनीत जावो. तो गर्भ दहा महिन्यानंतर सुदृढ पुत्राच्या रुपाने जन्माला येवो. या सुक्तातील तिसरी आणि चौथी ऋचाही पुत्राचे महत्त्व सांगणारी आहे. पुत्राचे महत्त्व विशद करणारा उल्लेख अथर्ववेदाच्या 5 व्या कांडातील 25 व्या सुक्ताच्या अनुक्रमे 10 ते 13 या ऋचांमध्येही आढळतो.
पूर्वज पूजेची प्रथा वाढत गेल्याने आणि पुत्राशिवाय इहलोक व परलोकातील सुख प्राप्त करणे शक्य नाही, या कल्पनेने मुलांचे महत्त्व वाढत गेले. कारण धार्मिक विधिमध्ये तर्पण(Oblations) करण्याचा अधिकार केवळ मुलांना देण्यात आला होता. पुढे ब्राह्मण साहित्यात मुलींचा जन्म कुटुंबासाठी त्रासदायक ठरविण्यात आला. ऐतरेय ब्राह्मणाच्या सातव्या अध्यायातील 18 व्या खंडात याचा उल्लेख आढळतो –
सखा ह जाया कृपणंहि दुहिताज्योतिर्हि पुत्रः परमे व्योमन्
अर्थ – मुलाचा जन्म कुटुंबासाठी आशादायक तर मुलीचा जन्म कुटुंबासाठी त्रासाचे उगमस्थान आहे.
यावरुन असे दिसते की अथर्ववेदाच्या काळापासून स्त्रियांच्या सामाजिक जीवनाची घसरण सुरु झाली आणि ब्राह्मण काळात त्रासदायक ठरण्याइतपत स्त्रियांचा सामाजिक दर्जा खाली घसरला.
उपनिषद काळात पुत्राचे महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसते. पुत्राशिवाय मनुष्यलोक जिंकता येत नाही, असा उल्लेख बृहदारण्यकोपनिषदाच्या प्रथम अध्यायातील 5 व्या ब्राह्मणाच्या 16 व्या मंत्रात आढळतो –
अथ त्रयो वाव लोका मनुष्यलोकः पितृलोको देवलोक इति सोऽयं मनुष्यलोकः पुत्रेणैव जय्यो नान्येन कर्मणा…
अर्थ – मनुष्यलोक, पितृलोक आणि देवलोक हे तीन लोक आहेत. हे मनुष्यलोक पुत्राद्वारेच जिंकता येऊ शकते, अन्य कोणत्याही कर्माने नाही.
स्त्रियांच्या सामाजिक जीवनाची ही घसरण इ.स.पू. सहाव्या शतकापर्यंत तशीच सुरु राहिली.
इ.स.पू. सहाव्या शतकात बुद्धाचा उदय होतो. त्यांनी स्त्रियांना संघात स्थान देऊन त्यांचे समाजातील स्थान बळकट केले. अगदी राजपरिवारातील स्त्रियांपासून तर सामान्य कुटुंबातील स्त्रिया भिक्खूणी संघात सहभागी झाल्या. स्त्री-पुरुष समतेच्या बुद्धाने सुरु केलेल्या या चळवळीला सम्राट अशोकाने राजाश्रय प्रदान केला. परिणामी स्त्रिला दुय्यम स्थान देणा-या ब्राह्मण पुरोहितांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले. बुद्धाचा समाजावरील प्रभाव व अशोकाच्या राजाश्रयामुळे ब्राह्मण पुरोहितांची झालेली सामाजिक व आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी ब्राह्मण पुरोहितांच्या पुढाकाराने मौर्य साम्राज्याचा पाडाव करण्यात आला. समाजावरील आपले प्रभुत्त्व पुनःश्च स्थापित करण्यासाठी मनुस्मृती सारख्या विखारी ग्रंथाची रचना करण्यात आली.
मनुस्मृतीच्या रचनेमागील विविध सामाजिक कारणांपैकी एक महत्त्वपूर्ण कारण बौद्ध धम्माने स्त्रियांना बहाल केलेली सामाजिक प्रतिष्ठा, हे होय. मनुस्मृतीने स्त्रियांना उपभोग्य वस्तू यापलीकडे स्थान दिले नाही.

महिलांना स्वातंत्र्य नाही

मनुस्मृतीने महिलांच्या स्वातंत्र्याची पूर्णतः गळचेपी केली आहे. समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून स्त्रियांना स्वातंत्र्य उपभोगण्याचे काही अधिकार आहेत, याकडे मनुस्मृतीने साफ दुर्लक्ष केले आहे. मनुस्मृती ही महिलांच्या पारतंत्र्याचे एक प्रकारचे घोषणापत्र आहे. याविषयी मनुस्मृती म्हणते –
बालया वा युवत्या वा वृद्धया वापि योषिता।
न स्वातन्त्र्येण कर्तव्यं किञ्चित्कार्यं गृहेष्वषि।।5-147।।
अर्थ – बालिका असो की युवती किंवा वृद्ध स्त्रीने स्वतंत्रपणे घरातील कोणतेही काम करु नये.
बालिका असताना एकदाचे समजू शकतो कारण त्या वयात तिला चांगल्या वाईट गोष्टीची जाण नसते. परंतु वृद्ध स्त्री जिने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले तिलाही घरात कोणतेही काम स्वतंत्रपणे करण्याचा अधिकार नसावा याचा अर्थ महिलांवर अजिबात विश्वास ठेऊ नये, असे मनुस्मृती सूचित करते.
याच आशयाचा दुसरा उल्लेख पाहा –
बाल्ये पितुर्वशे तिष्ठेत्पाणिग्राहस्य यौवने।
पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत्स्त्री स्वतन्त्रताम्।।5-148।।
अर्थ – बाल्यकाळात स्त्रीने वडिलाच्या अधीन, तारुण्यात पतीच्या अधीन आणि पतीच्या मृत्यूनंतर पुत्राच्या अधीन राहावे, तिने स्वतंत्रपणे कधीच राहू नये.
या जन्मजात पारतंत्र्याविरुद्ध स्त्रियांनी बंड करु नये म्हणून त्यांना सामाजिक निंदानालस्तीचा (कुळाला कलंकित करण्याचा)धाक दाखविण्यात आला आहे. याबाबत मनू काय म्हणतो ते पाहा –
पित्रा भर्त्रा सुतैर्वापि नेच्छेद्विरहमात्मनः।
एषां हि विरहेण स्त्री गर्ह्ये कुर्यादुभे कुले।।5-149।।
अर्थ – स्त्रीने पिता, पती किंवा पुत्रापासून वेगळे राहण्याची इच्छ बाळगू नये. कारण त्यांच्यापासून वेगळी राहणारी स्त्री पतीकूळ आणि पितृकूळ दोन्हीला निंदित(कलंकित) करते.

स्त्रियांना घरकामात गुंतवावे

स्त्रियांना इकडेतिकडे भटकण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी व अन्य कामात लक्ष देण्यासाठी वेळ मिळू नये म्हणून त्यांना सदैव घरगुती कामात जुंपून ठेवण्याची आज्ञा मनुस्मृती देते –
अर्थस्य संग्रहे चैनां व्यये चैव नियोजयेत्।
शौचे धर्मेऽन्नपक्तयां च पारिणाह्यस्य वेक्षणे।।9-11।।
अर्थ – रुपये पैसे सांभाळणे, खर्च करणे, शरीर व उपभोग्य वस्तूंची साफसफाई (धुणीभांडी) करणे, भोजन तयार करणे आणि घरातील सर्व सामानाची देखभाल करण्याच्या कामात स्त्रियांना गुंतवून ठेवावे.

स्त्री पुरुषांना दुषित करते

मनुस्मृतीने तमाम महिला वर्गाची येथेच्छ निंदानालस्ती केली आहे. समाजातील सर्व दोषांचे मूळ महिलांना मानते. विशेषतः तरुण स्त्रियांच्या बाबतीत मनुस्मृतीने पराकोटीची द्वेषभावना बाळगलेली दिसते –
स्वभाव एष नारीणां नराणामिह दूषणम्।
अतोऽर्थान्न प्रमाद्यन्ति प्रमदासु विपश्चितः।।2-213।।
अर्थ – पुरुषांना दूषित करणे स्त्रियांचा स्वभाव आहे. म्हणून ज्ञानी पुरुष विशेषतः तरुण स्त्रियांच्या बाबतीत कधीच बेसावध नसतो.
याचा अर्थ पुरुषांना बिघडविण्याचे काम केवळ स्त्रिया करतात, पुरुष मात्र सज्जन आहेत. सर्व दोषांचे खापर महिलांच्या डोक्यावर फोडून मनू समस्त महिला वर्गावर घोर अन्याय करीत आहे. जे पुरुष वाममार्गाला लागलेले आहेत, त्यासाठी फक्त स्त्रिया जबाबदार आहेत, असा आरोप मनुस्मृती करते. कोणताही सभ्य माणूस महिलांबाबत एवढी हीन अभिरुची बाळगणार नाही जेवढी मनूमहाराजाने बाळगली आहे –
मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा न विविक्तासनो भवेत्।
बलवानिन्द्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति।।2-215।।
अर्थ – आई, बहीण किंवा मुलीसोबत एकांतात एका आसनावर बसू नये. कारण बलवान इंद्रियांचा हा समूह (स्त्री) विद्वानाला देखील आपल्याकडे आकर्षित करते.
महिलांची यापेक्षा दुसरी अवहेलना काय असू शकते ? आई, बहीण व पत्नी यामधील फरक न समजण्याइतपत (नगण्य अपवाद वगळता) समाज असभ्य नाही. तसा तो त्या काळातही नव्हता. मात्र पुरोहित वर्ग लैंगिक स्वैराचाराबाबत अतिशय मुक्त होता, याबाबतचे दाखले ऋग्वेदातही आढळतात. याविषयीचे अनेक दाखले बाबासाहेब डाॅ.आंबेडकरांनी त्यांच्या Riddles in Hinduism या ग्रंथात दिलेले आहेत. मनुस्मृती वेदांना प्रमाण मानते. कदाचित म्हणूनच स्त्रियांबाबत ही कुत्सित मनोवृत्ती मनुमहाराजाने दाखविली असावी, असे दिसते.

पती परमेश्वर

मनुस्मृतीने स्त्रियांना अजिबात महत्त्व दिलेले नाही. एखादा मालक जसा आपली गाय किंवा बैल दुस-याला विकतो व ते जनावर निमूटपणे दुस-या मालकासोबत जाते, मनुस्मृतीने काहीशी तशीच स्थिती महिलांची करुन ठेवली आहे. याबाबत मनू म्हणतो –
यस्मै दद्यात्पिता त्वेना भ्राता वानुमते पितुः।
तं शुश्रूषेत जीवन्तं संस्थितं च न लङ्घयेत्।।5-151।।
अर्थ – पिता किंवा पित्याच्या अनुमतीने भावाने कन्येचा हात ज्याच्या हातात दिला, जीवनभर शुद्ध ह्रदयाने स्त्रीने त्याची(पतीची) सेवा करावी व त्याच्या मृत्यूनंतर धर्माचे उल्लंघन करु नये.
आपला पती निवडण्याचा अधिकार स्त्रियांना नाही, जो सिंधू सभ्यतेच्या काळात होता. पती कसाही असो त्याची मनोभावे सेवा करावी जणू स्त्री यंत्रमानव आहे.
या श्लोकात पतीच्या मृत्यूनंतर धर्माचे उल्लंघन करु नये हा जो उल्लेख आहे, त्याची कदाचित दोन कारणे असावी. एक तर पतीच्या मृत्यूनंतर तिने पर पुरुषाशी संबंध स्थापित करु नये किंवा पुनर्विहाह करु नये. कारण मनुस्मृतीने विधवा विवाहांवर बंदी घातली आहे. दुसरे कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. बुद्धाच्या व सम्राट अशोकाच्या काळात अनेक विधवा स्त्रिया भिक्खूणी संघात सहभागी होऊन सन्मानाचे जीवन जगत असत. या विधवा स्त्रियांचा बौद्ध संघात प्रवेश रोखण्यासाठी मनूने हा कायदा केला असण्याची शक्यता आहे. कारण मनू हा घोर बौद्ध विरोधी होता. विधवा महिलांच्या संघात सहभागी झाल्याने बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसाराला चालना मिळाली असती, जे मनुस्मृतीला कदापि मान्य नव्हते.
यापुढे तर मनुस्मृतीने कहरच केला आहे. समस्त महिला वर्गाच्या भाव भावना त्यांच्या आशा आकांक्षाची अगदी राखरांगोळी केली आहे. जिवंतपणी नरक यातना भोगायला लावणारा मनुस्मृतीचा हा आदेश पाहा –
विशीलः कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जितः।
उपचर्यः स्त्रिया साध्व्या सततं दैववत्पतिः।।5-154।।
अर्थ – पती अनाचारी असो किंवा परस्त्री गमन करणारा असो किंवा ज्ञानहीन साध्वी स्त्रीने सर्वदा देवाप्रमाणे आपल्या पतीची सेवा करावी.

महिला व्यभिचारी

स्त्रिया किती कामातूर असतात, कामवासनेने त्या एवढ्या अंध झालेल्या असतात की पुरुष कसाही असो त्यांना काही फरक पडत नाही. त्याच्या सोबत कामक्रीडा करण्यास त्या तत्पर असतात, असा जावईशोध मनुस्मृतीने लावलेला आहे –
नैता रुपं परीक्षन्ते नासां वयसि संस्थितिः।
सरुपं वा विरुपं वा पुमानित्येव भुञ्जते।।9-14।।
अर्थ – ती (स्त्री) रुप पाहत नाही किंवा वयाचा सुद्धा विचार करीत नाही, सुंदर असो की कुरुप केवळ पुरुष असल्याने ती त्याचा भोग घेते.
खरं तर मनुस्मृतीची ही बाब पुरुषांवर अधिक लागू पडते. आपण अनेकदा वाचतो की कुणा एका वृद्धाने छोट्या मुलीवर अत्याचार केला किंवा कुणीतरी अंध, अपंग किंवा विवाहितेवर जबरदस्ती केली. पुरुषांची ही दुष्कृत्ये काही नवीन नाहीत. अगदी प्राचीन काळापासून ती चालत आलेली आहेत. मनूमहाराज ह्या गोष्टी का पाहू शकला नाही ? हे एक कोडेच आहे. खरे पाहता अशा प्रसंगात महिलेचा दोष कमी असतो. पुरुषाच्या फसवणुकीला ती बळी पडते.

पत्नीच्या जिवंतपणी दुसरा विवाह

मनुस्मृतीच्या काळात स्त्रियांच्या आशा आकांक्षा कशा पायदळी तुडवल्या जात होत्या याचे उत्तम उदाहरण या श्लोकात आढळते –
मद्यपाऽसाधुवृत्ता च प्रतिकूला च या भवेत्।
व्याधिता वाधिवेत्तव्या हिंस्त्रार्थघ्नी च सर्वदा।।9-80।।
अर्थ – जर स्त्री दारु पिणारी, वाईट आचरण करणारी, पतीच्या आज्ञेच्या विरुद्ध वागणारी, कुष्ठरोग युक्त, तापट आणि नेहमी अपरिमित खर्च करणारी असेल तर तिचा पती ती जिवंत असताना दुसरा विवाह करु शकतो.
या श्लोकात वर्णित स्थिती जर पुरुषांना लागू असती तरीही मनूने स्त्रियांना पतीसेवेचा डोज पाजला असता. कारण मनुस्मृतीच्या मते पुरुषांना सर्व गुन्हे माफ आहेत. स्त्रीबाबत ज्या तक्रारी या श्लोकात नमूद आहेत त्या अशा नाहीत की पती-पत्नीच्या परस्पर संवादातून सुटू शकणार नाहीत. खरंतर याबाबतीत सामंजस्याने मतभेद दूर करण्याचा सल्ला देणे जास्त संयुक्तिक ठरले असते. मात्र तसे न करता पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करण्याचा आदेश देणे, यापेक्षा स्त्रिला दुसरी शिक्षा काय असू शकते ?. रोग्याची सेवा करणे हा मनुष्याचा महान धर्म समजला जातो. मग पत्नी कुष्ठरोगाने पीडित असताना तिची देखभाल करण्याऐवजी अशा कठीण प्रसंगी तिला वा-यावर सोडून दुसरा विवाह करण्याचा आदेश देऊन मनू कोणता सामाजिक आदर्श स्थापित करु इच्छितो हे न समजण्यासारखे आहे.

पत्नीची विक्री करणे

मनुस्मृतीच्या काळात स्त्रीला(पत्नी) मालमत्ता समजून खरेदी-विक्री करण्याची प्रथा असावी, असे दिसते. ज्याप्रमाणे आपण स्थावर किंवा जंगम मालमत्ता विकतो, त्याप्रमाणे पत्नीला विकण्याची प्रथा असावी, असे मनुस्मृतीच्या खालील श्लोकावरुन दिसते –
न निष्क्रयविसर्गाभ्यां भर्तुर्भार्या विमुच्यते।
एवं धर्मं विजानीमः प्राक्प्रजापतिनिर्मितम्।।9-46।।
अर्थ – दुस-याला विकल्यामुळे किंवा परित्याग केल्यामुळे पत्नी पतीच्या पत्नीत्वापासून पृथक होत नाही. प्रजापतीद्वारा निर्मित हा धर्म आम्हाला चांगल्याप्रकारे अवगत आहे.
मनुस्मृतीने स्त्रीला कोणतेही सामाजिक अधिकार दिले नव्हते. तिला शूद्राचा दर्जा बहाल करण्यात आला होता. ती केवळ उपभोग्य वस्तू आहे अशीच तिची अवस्था होती. बरं एकदा मान्य करु की पतीने आपल्या पत्नीला विकले किंवा तिचा त्याग केला तर पत्नीवरील पतीचा अधिकार संपुष्टात येणे स्वाभाविक होते. परंतु मनूमहाराज हे मान्य करीत नाही. स्त्रीला विकल्यानंतर किंवा तिचा परित्याग केल्यावर ज्याने तिला विकत घेतले आहे, त्याची अधिकृत पत्नी म्हणून स्त्रीला मान्यता नाही. तिची अवस्था न घरकी न घाटकी अशी करुन टाकण्यात आली. एवढेच नव्हेतर या परिस्थितीतही पहिल्या पतीचा पत्नीवरील अधिकार कायम ठेवण्यात आला. म्हणजे मनात येईल तेव्हा पत्नीला विकणे किंवा तिचा परित्याग करणे आणि मनात आले की पत्नी म्हणून तिच्यावर पुन्हा अधिकार गाजविणे आणि ते ही ईश्वराच्या (प्रजापती) नावावर, हे जुलूमी कृत्य नव्हे काय ? ज्याने पैसे देऊन स्त्रीला विकत घेतले तो पुरुष पहिल्या पतीचा अधिकार कसा मान्य करील ? यातून वादावादी, भांडण तंटा व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असावा.


महिला अवगुणी

एवढ्यावरच मनुचे समाधान होत नाही. तो महिलांना अवगुणांचा पुतळा मानतो. याविषयी मनुस्मृतीतील हा उल्लेख पाहा –
शय्यासनमलंकारं कामं क्रोधमनार्जवम् ।
द्रोहभावं कुचर्यां च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् ।।9-17।।
अर्थ – शय्या, आसन, अलंकार, काम, क्रोध, कुटिलता, द्रोह आणि दुराचार मनूने सृष्टीच्या आरंभापासून स्त्रियांसाठी राखून ठेवले आहेत.
दुसऱ्या शब्दात सृष्टीच्या निर्मितीपासून हे अवगुण महिलांसाठी राखीव आहेत, असे मनुस्मृतीला सूचित करावयाचे आहे. महिलांच्या बाबतीत पराकोटीचा द्वेष यातून दिसतो. मनुस्मृतीची ही विधाने संपूर्ण महिला व मानव समाजाला कलंकित करणारी आहेत.

स्त्रीला शूद्राचा दर्जा

बुद्धाचा आणि सम्राट अशोकाचा कालखंड वगळता मनुस्मृतीच्या काळात स्त्रियांचे समाजातील स्थान व महत्त्व संपुष्टात येवून तिला शूद्राचा दर्जा देण्यात आल्याचे स्पष्ट होते. याविषयी मनुस्मृती म्हणते –
वैवाहिको विधिः स्त्रीणां संस्कारो वैदिकः स्मृतः ।
पतिसेवा गुरौ वासो गृहार्थोऽग्निपरिक्रिया ।।2-67।।
अर्थ – स्त्रियांचा वैदिक संस्कार(यज्ञोपवित विधी) विवाह विधी आहे, पतीची सेवा त्यांचे गुरुकुल निवास आणि घरातील कामधंदाच त्यांचा सायंकालीन व प्रातःकालीन होम आहे.
याचा अर्थ जसे शूद्रांना यज्ञोपवित धारण करणे निषिद्ध आहे, तसे महिलांसाठी(कोणत्याही जातीतील असो) निषिद्ध आहे. ज्याप्रमाणे शूद्रांना शिकणे आणि शिकविणे निषिद्ध आहे त्याचप्रमाणे स्त्रियांना सुद्धा आहे शूद्रांना यज्ञ करणे, करविणे निषिद्ध आहे तसेच महिलांना सुद्धा आहे. कारण घरातील कामकाज स्त्रियांसाठी होम-हवनाच्या बरोबर असल्याचे मनुस्मृती सांगते. म्हणजेच शूद्र आणि स्त्रिया यात मनुस्मृती काही फरक करत नाही.
याशिवाय महिलांना अपमानित करणा-या अनेक बाबींचा उल्लेख मनुस्मृतीत आहे. विस्तार भयास्तव सर्व गोष्टींचा येथे उल्लेख करणे शक्य नाही. फक्त एवढेच सांगावेसे वाटते की आज संविधानामुळे भारतीय महिला मोठमोठी पदे भूषवत असून प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या कार्य करीत आहेत. देशातील काही हिंदुत्ववादी संघटना व लोक विद्यमान संविधानाऐवजी मनुस्मृतीचा कायदा लागू करण्याच्या वल्गना करतात. समजा हिंदुत्ववाद्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर भारताची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाला मनूचा कायदा मान्य होईल का ? याचा निर्णय महिलांनी घ्यावा.

– भि.म.कौसल

0Shares

Related post

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…
एससी/एसटी आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण लाभार्थीच्या एकतेला छेद देणारे कट कारस्थान…!

एससी/एसटी आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण लाभार्थीच्या एकतेला छेद देणारे कट कारस्थान…!

         अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून हिंदू – दलित वोट बँक तयार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *