मनुस्मृती दहन : अन्यायाच्या ग्रंथाला जाळून माणूसपण पेटवणारा इतिहास

मनुस्मृती दहन : अन्यायाच्या ग्रंथाला जाळून माणूसपण पेटवणारा इतिहास

मनुस्मृती दहन : अन्यायाच्या ग्रंथाला जाळून माणूसपण पेटवणारा इतिहास

मनुस्मृती दहन : अन्यायाच्या ग्रंथाला जाळून माणूसपण पेटवणारा इतिहास


       २५ डिसेंबर १९२७ हा दिवस केवळ एका ग्रंथाच्या दहनाचा नव्हता; तो शतकानुशतके चालत आलेल्या अन्याय, विषमता आणि माणुसकीच्या अपमानाविरुद्ध पेटलेल्या बंडाचा दिवस होता. महाडच्या चवदार तळ्याच्या काठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले, तेव्हा त्या आगीत कागद जळत नव्हते. जातिव्यवस्थेचा गर्व, धर्माच्या नावावरचा अमानवीपणा आणि गुलामगिरीला पवित्र ठरवणारी मानसिकता राख होत होती. मनुस्मृती दहन दिवस हा कोणत्याही धर्मग्रंथाविरुद्धचा अंध द्वेष नव्हता; तो माणसाला माणूस मानण्याच्या लढ्याचा निर्णायक टप्पा होता.
        मनुस्मृती ही केवळ एक धार्मिक संहिता नव्हती; ती समाजव्यवस्थेला जन्माधारित विषमतेच्या चौकटीत अडकवणारी विचारसरणी होती. मनुस्मृती ग्रंथ नव्हे, अन्यायाची संहिता आहे. स्त्री, शूद्र, अतिशूद्र यांना शिक्षण, स्वातंत्र्य, स्वाभिमान यांपासून दूर ठेवणारे नियम त्यात पवित्रतेच्या नावाखाली मांडले गेले होते. “शूद्राने वेद ऐकले तर कानात शिसे ओतावे” “स्त्रीला स्वातंत्र्य नाही” अशा अमानवी कल्पनांना धर्माचा दर्जा देणारा हा ग्रंथ लोकशाही, समानता आणि मानवतेच्या पूर्णतः विरोधात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखले होते की, जोपर्यंत विचार जळत नाहीत, तोपर्यंत गुलामगिरी संपत नाही.
       महाड सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा लढा नव्हता; तो मानवी प्रतिष्ठेचा लढा, इतिहासाला कलाटणी देणारा क्षण होता. चवदार तळ्याचे पाणी सर्वांसाठी असतानाही, अस्पृश्यांना ते वापरण्याचा अधिकार नव्हता, हीच ती अमानुष व्यवस्था होती. मनुस्मृती दहन हा त्या अन्यायाच्या मुळावर घाव घालणारा प्रतीकात्मक पण अत्यंत निर्णायक कृती होती. बाबासाहेबांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितले. “आम्ही धर्म नाकारत नाही; आम्ही अन्याय नाकारणार आहोत.” ही भूमिका क्रांतिकारी होती, कारण ती अंधश्रद्धेला नव्हे तर विवेकाला केंद्रस्थानी ठेवणारी होती. 
       दहन म्हणजे द्वेष नव्हे, विवेक आहे. आजही काही जण मनुस्मृती दहनाला “धर्मविरोधी कृती” म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रश्न साधा आहे, धर्म जर माणसाला माणूस मानत नसेल, तर तो धर्म की अन्याय? मनुस्मृती दहन म्हणजे ग्रंथद्वेष नव्हे; ते म्हणजे मानवद्वेषी विचारांचा निषेध आहे. जसा रोग नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते, तसाच समाज शुद्ध करण्यासाठी अन्याय्य विचारांवर घाव घालावा लागतो.
आजही जळणारी मनुस्मृतीचा कागद जळून ९० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण तिची मानसिकता आजही अनेक रूपांत जिवंत आहे. आजही जात जन्मावरून ठरते, स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते, दलितांवर अत्याचार होतात, संविधानाच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. ही सगळी लक्षणे सांगतात की मनुस्मृती अजूनही काही मेंदूत जळलेली नाही. भारतीय संविधान आणि मनुस्मृती या दोन परस्परविरोधी विचारधारा आहेत.
       मनुस्मृती म्हणते, जन्माने श्रेष्ठ-कनिष्ठ. संविधान म्हणते, सर्व समान आहेत. मनुस्मृती दडपशाही शिकवते तर संविधान स्वातंत्र्य देते. म्हणूनच बाबासाहेबांनी संविधान दिले, ते केवळ कायदा म्हणून नव्हे, तर मनुस्मृतीच्या मानसिकतेवरचा अंतिम विजय म्हणून. मनुस्मृती दहन दिवस हा केवळ स्मरणाचा कार्यक्रम नसावा. तो आत्मपरीक्षणाचा दिवस असला पाहिजे. आपण विचारतो का, आपण अजूनही जात पाहतो का? स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास ठेवतो का?संविधानाचे मूल्य जगतो का? जर उत्तर नकारार्थी असेल, तर मनुस्मृती दहन दिवसाची गरज आजही आहे. मनात, वागण्यात आणि व्यवस्थेत.
       आज जेव्हा संविधानिक मूल्यांवर हल्ले होत आहेत, इतिहास बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि सामाजिक विषमता “परंपरा” म्हणून साजरी केली जाते, तेव्हा मनुस्मृती दहन दिवस अधिकच महत्त्वाचा ठरतो. हा दिवस सांगतो, कोणतीही परंपरा माणुसकीपेक्षा मोठी नाही. मनुस्मृती दहन म्हणजे राखेत गेलेला ग्रंथ नव्हे; तो म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामा होता. बाबासाहेबांनी त्या आगीत जे पेटवले, ते आजही आपल्याला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची दिशा देते. आज मनुस्मृती दहन दिवस साजरा करताना एकच प्रश्न विचारला पाहिजे की, आपण मनुस्मृती जाळली आहे की फक्त पाहिली आहे? खरा सन्मान तेव्हाच, जेव्हा आपण मनुस्मृतीला नव्हे, संविधानाला जगू.
 
प्रवीण बागड़े
0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *