- 180
- 1 minute read
मराठी माणसांच्या अहितासाठीच असणारी, ठाकरे बंधुंची युती कुणासाठी फायद्याची ?
उद्धव ठाकरे व राज ठाकरेंच्या सेनांकडे महाराष्ट्राचे हित अस्मितेचा कधीच कुठला कार्यक्रम नव्हता व आज ही नसल्याने दोघे एकत्र येऊन करणार काय ?
महाराष्ट्र, मराठी माणूस व मराठी भाषेची अस्मिता, हित यासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे, या विचारांचा एक मत प्रवाह महाराष्ट्रात आहे. आज ही हाच प्रवाह उद्धव व राज एकत्र येत असल्याचे चित्र उभे करीत आहे. पण महाराष्ट्राच्या हितासाठी मनसे व शिवसेना उबाठाने खरच एकत्र येण्याची गरज आहे का ? हा खरा प्रश्न आहे. या एकत्र येण्याने खरच महाराष्ट्राचे भले होणार आहे का ? तर याचे उत्तर नाही, असेच आहे. इतकेच काय सेना व मनसेच्या युतीवर याच पक्षातील अनेक नेते प्रश्नचिन्ह ही उभे करीत आहेत. महाराष्ट्र, मराठी माणूस अन् मराठी भाषेसाठी काहीच करायचे नाही. उलट सरकार ज्या पक्षाचे असेल त्याची आपल्या फायद्यासाठी चाटूगिरी करणारे एक टोळके राज्यात आहे. त्यास अधूनमधून महाराष्ट्राच्या हिताचे झटके येतात, त्यातीलच एक झटका म्हणजे उद्धव ठाकरे व राज ठाकरेंना एकत्र आणणे. पण यामुळे काय होणार आहे ? महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. सेना सत्तेत राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता राहिली आहे. त्या सत्तेच्या माध्यमातून नेते मोठे झाले. मराठी माणूस नाही. मराठी अस्मिता व मराठी भाषेचे संवर्धन करण्यात सेना अपयशी ठरली आहे. १९९० पासून सत्तेच्या मुख्य प्रवाहात असलेल्या शिवसेनेने महाराष्ट्राला भूषणावह ठरेल, असा एक ही निर्णय घेतला नाही की काम केले नाही. मग कुठल्या हितासाठी व कसल्या अस्मितेसाठी या ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे, हे कळत नाही. पण ही कोल्हेकुई अधुनमधून का सुरू होते, हा प्रश्न असून त्याची कारणे वेगळी आहेत.
मराठी अस्मितेसाठी शिवसेनेची स्थापना झाली व मराठी माणूस तिच्या मागे खंबीरपणे उभा ही राहिला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मराठी माणसाने उदंड प्रेम केले. त्यांना साथ दिली. पण त्या बदल्यात मराठी माणसाला सेनेने व ठाकरेंनी काय दिले ? या प्रश्नांची उत्तरे शोधली तर, मराठी माणसाच्या पदरात निराशेशिवाय काहीच पडलेले नाही. सेना , बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरेंचा दबदबा सत्तेत असताना या सत्तेने राज्याच्या हितासाठी काय केले ? तर काहीच नाही, हेच त्याचे उत्तर आहे. सेनेचा व ठाकरे परिवाराचा सत्ता असो अथवा नसो एक काळ होता. सत्ताबाह्य केंद्र होता ठाकरे परिवार. या काळात जातीय दंगली, द्वेष, प्रांतवाद, संविधान व लोकशाहीची टिंगल टवाळी हा सेनेचा मुख्य अजेंडा होता. मुंबईत दबदबा असताना मराठी माणसाच्या कामगार संघटना याच सेनेने मालकांकडून सुपाऱ्या घेऊन तोडल्या व मराठी माणसांना भिकेला लावले. महाराष्ट्राची आराध्य दैवतं व अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, जिजाऊ माता, फुले, शाहू, आंबेडकर आदी महापुरुषांचा अवमान व अपमान झाला, सेना गप्प राहिली. आज ही हा अवमान व अपमान सुरू आहे. उद्धव व राज गप्प आहेत. ३ टक्के असलेला ब्राह्मण समाज महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाही. आचार्य अत्रे निर्मित फुलेंच्या जीवनावरील चित्रपटात प्रबोधनकार ठाकरे यांनी स्वतः ही अभिनय केलेला आहे. फुलेंचा वैचारिक वारसदार प्रबोधनकार ठाकरे होते, या फुलेंचा इथल्या ब्राह्मणी शक्ती सतत अपमान करीत असताना हे दोन्ही ठाकरे गप्प आहेत. असे असेल तर यांचे एकत्र येणे कशासाठी ? काय गरज या युतीची ?
उद्धव व राज ठाकरेंच्या एकत्र येण्याने छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामित्व कायम राहिल काय ? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या शेकडो मराठी माणसाच्या वारसदारांचे मुंबईतून होत असलेले पलायन थांबेल का ? राज्यातील शैक्षणिक धोरणांमुळे मराठी भाषा दर्जा हीन झाली आहे. मराठी शाळा पट संख्ये अभावी बंद पडत आहेत. अथवा सेमी इंग्लिशच्या नावाखाली इंग्रजी भाषेचा आधार घेऊन त्या सुरू आहेत. ही लाचारी मराठी भाषेवर ओढवली आहे, तिची या लाचारीतून मुक्ती या एकत्र येण्यामुळे होणार आहे का ? तसेच महाराष्ट्रातील जे उद्योग, त्यामुळे मिळणारे रोजगार, उत्पन्न गुजरातला पळवून नेले जात आहे, नेले आहे, अथवा जी सरकारी कार्यालये मुंबईतून गुजरातला हलविली गेली आहेत, जात आहेत, हे सारे या एकत्र येण्याने थांबणार आहे का ? यासाठी मोदी, शहाशी संघर्ष करण्याची तयारी या दोन्ही ठाकरेंची आहे का ? हे सारे प्रश्न आहेत. मात्र यापैकी एकाही प्रश्नाबाबत या दोन्ही ठाकरेंकडे कुठलीच ठाम भूमिका नाही. त्यामुळे त्यांचे एकत्र येणे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, या म्हणण्यात तसा काहीच अर्थ नाही.
मोदी व शहाच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे वाटोळे करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले. हे खरे असले तरी एकनाथ शिंदेच्या अगोदर अनेकांनी शिवसेनेला झटके दिले आहेत. शिंदेंचा झटका जोर का है इतकेच. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, अन दस्तुरखुद्द राज ठाकरे यांचा यामध्ये समावेश असून कुठल्याच वैचारिक कारणासाठी नव्हेतर सत्तेसाठी त्यांनी सेनेला सोडचिठ्ठी दिलेली आहे व ते ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नाकावर टिचून दिलेली आहे. यातील गणेश नाईक, छगन भुजबळ व नारायण राणेंनी तर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ही गंभीर आरोप केले आहेत. मराठी माणसाच्या न्याय, हक्क, हित व अस्मितेसाठी स्थापन झालेल्या सेनेच्या अथवा ठाकरे परिवाराच्या अजेंड्यावर सत्ताकाळात हे प्रश्न कधीच राहिले नाहीत. अफाट पैसे कमविणे, त्यासाठी भ्रष्ट्राचार करणे, महाराष्ट्राला लुबाडणे हाच मुख्य अजेंडा सेना नेते व ठाकरे परिवाराचा राहिला आहे. कुणीच यासाठी अपवाद नाही. अन् हे राज्यातील जनते समोर जाहीरपणे आले ही आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी स्थापन झालेल्या सेना नेत्यांनी आपल्या स्वहिताला प्राधान्य दिले असल्याने भ्रष्टाचारी भुजबळ, राणे, शिंदे, नाईक व राज ठाकरे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून जन्माला आले आहेत. सेनेचे दोन तुकडे झाले असून दोन्ही बाजूला असे अनेक नेते कमी अधिक फरकाने आज ही आहेत.
गोदी – मोदी मिडिया या एकत्र येण्याला महाराष्ट्राचे हित असल्याचे राज्यातील जनतेला भासवित आहे. पण विवेकवादी मराठी माणूस या एकत्र येण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतच नाही, पाहणार ही नाही. याचे कारण आहे, ते म्हणजे त्याने गेल्या ६ दशकातील शिवसेनेचे राजकारण पाहिले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना ही पाहिले आहे. पाहत ही आहे. अन् या ठाकरेंकडे राज्याचा हिताचा कसलाच कार्यक्रम नाही , हे त्याला माहित आहे. त्यामुळेच या एकत्र येण्याबाबत तो उत्साही नाही. मनसे व सेनेत ही हा उत्साह दिसत नाही. शिवसेना उबाठा सोबत येण्यात हित आहे की भाजप सोबत जाण्यात हित आहे, या संदर्भातील निर्णय राज ठाकरेंनी अगोदर घ्यावा, त्यानंतरच मनसे सोबत युतीची पुढील बोलणी होतील, असे सूचक विधान करून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे व भाजपच्या युतीच्या गुप्त मर्मावर बोट या एकत्र येण्याच्या चर्चेनंतरच ठेवले आहे. सेना व मनसेचे प्रवक्ते, नेते या संदर्भात जी विधाने करीत आहेत, त्यात ही उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातील काही निर्णया विरुद्ध जाहीर विधाने केली आहेत. जी या एकत्र येण्यास बाधित ठरू शकतात. साधारणतः एकत्र येण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू असते त्यावेळी अशी विधाने टाळायला हवीत. पण दोन्हीकडून ही ते होत नाही. मग हे कळत होतं आहे की नकळत होतेय, हे कसे समजून घ्यायचे. याचा अर्थ काय काढायचा.
राज्यातील जनतेची शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काहीही मतं असोत, पण शिवसेना मराठी माणसाच्या संरक्षण, रक्षण, हित व अस्मितेसाठी स्थापन करण्यात आली होती, असे सेना नेते सांगतात. राज ठाकरेंची ही अशीच भूमिका आहे. मग मराठी माणसाच्या या संघटनेचे देवेंद्र फडणवीसांनी तुकडे केले, तेव्हाच राज ठाकरे यांची अस्मिता जागी व्हायला हवी होती. पण ती जागली नाही. उलट राज फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीला जाहीर प्रदर्शन करून जागले. फडणविसांचे चरित्र व राजकारण हे महाराष्ट्र विरोधी असल्याचे अनेक राज्यातील उद्योग गुजरातला गेल्यानंतर व कोरोना काळात स्पष्ट झाले आहे. मग अशा महाराष्ट्र विरोधी व्यक्तीशी महाराष्ट्र राज ठाकरे यांचे इतके जिव्हाळ्याचे संबंध का ? हे ही राज्यातील जनतेला कळायला हवे ना.
सन २०१४ , २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. राज्यातील जनतेने त्यांना नाकारले आहे. आज राजकीय पटलावर ते दिसत आहेत, ते केवळ अन् केवळ गोदी, मोदी मिडियामुळे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला, वर्चस्वाला आणि लगाम घालण्यासाठी भाजपला राज ठाकरेंची गरज असून या गरजेपोटीच भाजपने राज ठाकरे यांच्या मनसेला अद्यापपर्यंत धक्का लावलेला नाही. राज ठाकरेंने उद्धव सेने विरुद्ध तगडे आव्हान उभे केले po पाहिजे, ही अपेक्षा भाजपची आहे, मात्र तेवढीही कुवत राज्यातील राजकारणात मनसेची राहिलेली नाही. मात्र अशा ही अवस्थेत राज ठाकरे राजकीय दृष्टीने संपणे भाजपला नुकसानीचे होऊ शकते. त्यामुळेच ऐनकेन प्रकारे त्यांना राजकीय सक्रिय ठेवणे भाजपचा अजेंडा आहे. त्याच अजेंड्याचा एक भाग आहे, तो म्हणजे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना एकत्र आणण्याचे चित्र तयार करून राज ठाकरेंना स्पर्धेत ठेवणे. हा उद्योग राज समर्थक व सत्तेचे लाभार्थी आहेत अशांच्या माध्यमातून करणे. आजची एकत्र येण्याची चर्चा त्याचाच एक भाग आहे. महाराष्ट्राचे हित, अस्मिता याचा या काही संबंध नाही.
……………
राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश)