यावर्षी या अहवालाला “मर्सिडिज-बेंझ” अहवाल म्हटले गेले आहे असे बातमीत वाचून मी चमकलो. म्हटलं या बहुराष्ट्रीय कंपनीला भारतातील वाढत्या आर्थिक विषमतेबद्दल अचानक हृदयात कळ आली की काय ? मनात आले, कदाचित त्यांच्या सीएसआर फंडिंग मधील एक ऍक्टिव्हिटी असेल.
मन मानायला तयार नव्हते. हि लय पोचलेली लोक आहेत. आर्थिक विषमता वगैरे मुळे त्यांची हृदये कणभर देखील द्रवत नसतात. आय वॉज करेक्ट !
________
४६ लाख रुपयांपासून ७८ लाख रुपयांपर्यंत प्राईस रेंज असणाऱ्या मर्सिडीज कंपनीला आपले ग्राहक कोण याची स्पष्टता आहे. हे ग्राहक देशातील अब्जाधीशच असणार, पगारदार मध्यमवर्गीय नसणार, हे या कंपनीला स्पष्ट आहे.
मर्सिडिजने दिलेले पैसे वापरून, हुरून अहवालाने ही आकडेवारी गोळा केली आहे. भारतात एक मिलियन डॉलर्स, म्हणजे अंदाजे ८.५ कोटी रुपये संपत्ती असलेल्या कुटुंबांची संख्या वाढून ८,७१,००० झाली आहे.
मर्सिडीज बेंजला फक्त आकडेवारीत रस नाहीये. तिला इंटरेस्ट आहे हे अब्जाधीश नक्की कुठे राहतात. अहवालाने त्याचा देखील शोध घेतला आहे. अशी शहर आणि राज्यनिहाय माहिती देखील अहवालाने दिली आहे.
वरील पैकी १.७८ लाख अब्जाधीश कुटुंबे महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी एकट्या मुंबईत १.४२ लाख कुटुंबे राहतात. दिल्लीमध्ये ८०,००० तर तामिळनाडू मध्ये ७३,००० आणि कर्नाटकात ६९,००० अब्जाधीश कुटुंबे आहेत.
उघड आहे या आकडेवारीचा उपयोग करून मर्सिडीज त्यांच्या शोरूम कुठे उघडायच्या, मार्केटिंगसाठी खर्च कुठे करायचे हे ठरवणार आहे.
______
अहवाल प्रकाशित करण्याच्या समारंभात मर्सिडीज इंडियाचे सीईओ संतोष अय्यर, म्हणाले देखील की देशात अब्जाधीशांची संख्या वाढत आहे हे कंपनीसाठी चांगली बातमी आहे.
ते हे देखील म्हणाले की पुढच्या दहा वर्षात आजचे अनेक अब्जाधीश वयस्कर होऊन रिटायर होतील किंवा निसर्ग नियमानुसार जिवंत राहणार नाहीत. त्यावेळी त्यांची संपत्ती त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित होणार आहे. अब्जाधीश कुटुंबातील या पुढच्या पिढीवर आमचा डोळा असणार आहे. कारण ते मर्सिडीज कारचे ग्राहक असणार आहेत.
मर्सिडीज, संतोष अय्यर असे व्यक्तिगत बघू नका. प्रणाली किती बरकाव्यात जाऊन काम करते याचे उदाहरण म्हणून याकडे बघा.
संजीव चांदोरकर (२७ सप्टेंबर २०२५)