- 138
- 1 minute read
महात्मा फुलेंना समजून घ्यायला व पचवायला अक्कल लागते, हे उदयन भोसलेने सिद्धच केले…!

महात्मा फुलेंना समजून घ्यायला व पचवायला अक्कल लागते, हे उदयन भोसलेने सिद्धच केले…!
पेशवाईच्या प्रभावात सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या उदयन भोसले यांनी स्त्री शिक्षण व पहिल्या महिला शाळेच्या संदर्भात आपल्या अक्कलेचे जे तारे, ज्या नशेत तोडले आहेत. त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी व फुले,शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला आश्चर्य वाटणारच नाही. ते काहीही अनपेक्षित बोलले नाहीत. फुले समजायला, समजून घ्यायला व पचवायला अक्कल लागते, त्या अक्कलेचा अभाव त्यांच्या ठायी आहे. अन् हे पुरोगामी महाराष्ट्राचे नव्हे तर त्यांचे स्वतःचे दुर्देव आहे. इथंपर्यंत तर ठीकच आहे. पण त्यांच्या या बडबडीनंतर महाराष्ट्र खवळून उठला नाही, उठत नाही. उठता बसता फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणारे शरद पवार व आता आता अगदी अलिकडे प्रबोधनकारांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे ही गप्प बसतात, हे या पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. बाकी सत्तेसाठी पेशवाईच्या वळचणीला उभ्या असलेल्या उदयन भोसलेसह जे कुणी असतील त्यांचा समाचार कसा घ्यायचा, तो फुले , शाहू, आंबेडकर व छत्रपतींचा महाराष्ट्र घेईलच.
वंश अथवा रक्ताचे वारस होण्यात कसलीच शूर ,वीरता व अक्कल लागत नाही. पण विचारांचे वारसदार अक्कले शिवाय होता येत नाही, जगभराचा इतिहास याचा साक्षी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे शूरता व विरतेचा वारसा होता. पणजोबा, आजोबा अन् वडिलांकडे सरदारक्या होत्या, सत्ता, जहागिरी होत्या. तरी ही राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. ती राष्ट्रीयत्वाची भावनाच राजे संभाजी व थोरले शाहू महाराज यांच्यानंतर लोप पावली अन् शिवशाहीचे रूपांतर पेशवाईत झाले. शिवशाही नष्ट होऊन पेशवाई आली, ती मराठ्यांच्या व मावळ्यांच्या मनगटात शक्ती नाही म्हणून आली नाहीतर, तर या उदयन भोसलेसारखे मंद बुद्धीचे वारसदार गादीवर आरूढ झाले म्हणून आली. यात काही शंका नाही.
गादीचे वारसदार सांगणाऱ्यांना वारसा हवा आहे, वारसा हक्काची संपत्ती हवी आहे, छत्रपती हे बिरूध मिरवण्यासाठी हवे आहे. नको आहे ती फक्त छत्रपतींची राष्ट्रीय भावना, शूर – वीरता. कारण ती वारसा हक्काने मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो, संघर्षासाठी मनगटात बळ लागते.अक्कल ही लागते. अन् या साऱ्या गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत. त्यासाठी बलिदान करण्याची तयारी लागते. तिचाच अभाव आहे. हे या वारसदारांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. मग फुकटची सत्ता कोण देतो हे पहायचे, देणाऱ्याचे पाय चाटायचे व सत्ता मिळवायची हा एकच पर्याय शिल्लक राहतो. छत्रपतींच्या दोन्ही गाद्याचे वारस आज याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे त्यांना पेशवाईची तळी उचलावी लागते. चमचेगिरी करावी लागते. याच चमचेगिरीतून उदयन भोसले स्त्रियांच्या पहिल्या शाळेच्या संदर्भात गरळ ओकले आहेत.
क्रांती अन् प्रतिक्रांतीचे चक्र फिरत राहते…
चक्रवती सम्राट अशोक यांनी केलेल्या क्रांतिकारी कार्यांमुळे जगभरातील पाव भागावर त्यांचे शासन होते. दगा, फटका, धोका करून पुष्पमित्र शुंगने बृहद्रथ यांची हत्या करून हे शासन ताब्यात घेतले व प्रतिक्रांतीला जन्म दिला. बलाढ्य मुसलमान शासकांना आवाहन देत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून एका क्रांती पर्वाची पुन्हा सुरुवात केली, तर पुन्हा धोका, दगा, फटका करून पेशवाई स्थापन झाली. ही पेशवाई म्हणजेच प्रतिक्रांती होती. त्या विरोधात पुन्हा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज अन् भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढले, संघर्ष केला अन् एका सामाजिक क्रांती व परिवर्तनाच्या क्रांतिकारक युगाला जन्म दिला. बलाढ्य मुगल साम्राज्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महाराज, टिपू सुल्तान, झाशीची राणी, होळकर राष्ट्रीय भावनेने लढले. पुढे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात बहाद्दूर शहा जफर, शहीद भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर, अश्फाक खान, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर लढले अन या लढ्यामुळे पुन्हा एकदा या देशात क्रांती पर्वाची स्थापना झालेली आहे. आज या क्रांती पर्वाला संपवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा प्रतिक्रांती घडवून आणण्याची तयारी करीत आहे. अन् उदयन भोसलेसारखे अक्कलेचे तारे तोडत प्रतिक्रांतीच्या बाजूने केवल सत्तेच्या एका तुकड्यासाठी लाळ घोटत उभे आहेत.
इतिहास लेखनाच्या कामात संघ धुडगूस घालू शकतो, उदयन भोसलेसारख्यांचा त्यासाठी संघ वापर ही करू शकतो. पण केवळ संघ लिहितो तोच इतिहास होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, राजमाता जिजाऊ, फुले , शाहू,आंबेडकर आदी महापुरुषांना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न संघ व त्या सारख्या अनेकांनी केले आहेत. सावरकर यांचे नाव यामध्ये प्रामुख्याने घ्यावे लागेल. पण खरा इतिहास हा बाहेर येतोच. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या विषयी जे काही बदनामीकारक लिहिले आहे, त्याचा परिणाम असा झाला आहे की,त्यामुळे स्वतः सावरकर अन् त्यांचे भक्तच बदनाम झाले आहेत. त्यामुळे शहाण्यांनी इतिहासामध्ये ढवळाढवळ करू नये. उदयन भोसले यांनी ही संघाच्या दबावाला बळी पडून असले भलते सलते काही बोलू नये.
थोरल्या शाहू महाराजानंतर गादीवर बसलेल्या राजर्षी शाहू महाराज यांचा अपवाद सोडला तर कुणाला ही छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महाराज यांच्या विषयी बोलण्याचा कुठलाच अधिकार नाही. छत्रपतींची गादी तर या महाराजांना हवी होती, पण त्यांची समाधी त्यांना माहित नव्हती. छत्रपतींचे कार्य माहित नव्हते. पेशवाईने सर्व इतिहासच समाधी व अन्य अस्तित्वासह गायब केला होता. महात्मा ज्योतिराव फुलेसारखा क्रांतिकारक व समाज सुधारक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहित झाले आहेत. खरे तर उदयन भोसले अन् त्यांच्या साऱ्या परिवाराने महात्मा फुलेंना आपला आदर्श मानले पाहिजे. पण पेशवाईकडून मिळणाऱ्या सत्तेच्या लालसेने त्यांना झपाटले आहे. त्यामुळेच आज ते फुलेंच्या कार्याला गालबोट लावण्याचे काम करीत आहेत. महात्मा फुले यांच्या विचार व कार्याचा वारसा नव्या पिढीला देण्यासाठी निर्मिती करण्यात आलेल्या चित्रपटाला ही त्यासाठीच विरोध होताना दिसत आहे. अन् हा विरोध करणारी परशुराम गँग आहे. तिला कोण ऑपरेट करीत आहे, हे ही सर्वांना माहित आहे.
खरे तर उदयन भोसले यांना सिरियस घ्यायची व महत्त्व द्यायची गरज नाही. पण यामागे बोलविता धनी वेगळा आहे. अन् तो कोण आहे ?, तो असे उद्योग का करतो ? त्याचा हेतू काय ? हे सर्वांना सर्व माहित आहे. त्यामुळेच ही दखल घ्यावी लागते. नाहीतर उदयन भोसले खरे तर अदखलपात्र कॅरेक्टर आहेत.
बाकी एकच….. उदयन भोसले महात्मा फुले यांच्या संदर्भात गरळ ओकताना म्हणाले की, डॉ. आंबेडकर ही साताऱ्यात शिकले आहेत. हे एकदम खरे आहे. पण ते वर्गाच्या बाहेर बसून शिकले हे ही खरे आहे. याची तरी लाज, शरम असू द्या. त्याबद्दल ही कधी खंत व्यक्त करा. बस इतकेच…!
………………
(राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी
मुंबई/ महाराष्ट्र प्रदेश)