- 33
- 1 minute read
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-७
आपण प्रथमतः व अंतिमतःही भारतीय आहोत-बदलत्या परिस्थिती नुसार नेत्यांकडून अपेक्षा
जगात जो पर्यंत दुःख आहे, तो पर्यंत त्याचे निराकरण करण्यासाठी तथागत बुध्दांची शिकवण दिवा बणून प्रकाश देत राहील, अर्थात दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवत राहील. माणसाच्या दुःखाला त्याचे नकारात्मक विचारच अधिक कारणीभूत ठरतात, असे माझे ठाम मत आहे. तथागतांनी कार्यकारण भावाचा वैज्ञाणिक सिध्दांत आपणापुढे मांडला व सोबतच चार आर्य सत्यही सांगितले आहेत. हा सिद्धांत जर आपण प्रामाणिक अनुसरला तर आपल्यात सहज सकारात्मक भावना उत्पन्न होवून, आपण आपले दु:ख दूर किंवा कमी करु शकतो.
मात्र, आम्ही प्रमुख्याने बहुतांश बौध्द, आपल्या अपयशाबाबत स्वपरिक्षण न करता व त्यातून उद्भवणाऱ्या दुःखाची कारणे न शोधता, इतरांना दोष देत, सतत नकारात्मक मांडणी करत असतो. त्यामुळे, आपल्यात उद्भवणारे नकारात्मक विचार, इतरांवर अनावश्यक टिकाटिपण्णी करण्याची प्रवृत्ती, इतिहासांतील संदर्भांना नको तिथे गरज नसता जोडणे, अशा अनेक प्रतिक्रियात्मक अनुत्पादक बाबीत आपण पुर्णपणे गुरफटून गेलो आहोत. परिणामतः आपले अपयश/दु:ख दूर किंवा नाहीसे करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यापासून आपण दूर गेलो आहोत. आपले नेतेही याला अपवाद वाटत नाहीत. समाजाची अनुकरण प्रियता बघता, मी तर म्हणेल तेच या परिस्थितीला जास्त जवाबदार आहेत. यातून फक्त नि फक्त नकारात्मक परिणाम मिळत असतात, यात कोणत्याही सुज्ञाला शंका असण्याचे कारण दिसणार नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आताच्या अर्थात २०२४च्या लोकसभा निवडनुकीतील अपयश.
आरएसएस प्रणित भाजप व त्यांचे नेते सतत संविधान बदलवण्याची भाषा करत होते. त्यासाठी त्यांना ४००च्यावर खासदार पण निवडून आणायचे होते. हे सारे काही जग जाहीर होते. याशिवाय, भाजपने मागील दहा वर्षात भाजपा ज्या पद्दतीने देशात अराजकता माजवली आहे, त्यावरून या बाबतीत त्यांचा हेतु सुद्धा स्पष्ट दिसतो. अशात आंबेडकरवादी समाज व नेत्यांची जवाबदारी निश्चितच मोठी आहे/होती. तरी पण नेते, आपल्या अहंकारापोटी, समाजाचा काडीचाही विचार न करता, आपल्या अहंकारापासून टस-से-मस झाले नाहीत. उलट, इतिहासाचे दाखले देत कॅांग्रेसचा विरोध करत, भाजपचा बचावच केला. बदलत्या परिस्थितीत सकारात्मक विचार करून, देश व समाज हिताचा अजेंडा लोकांपुढे न मांडल्याने, तो अजेंडा राहूल गांधींनी अत्यंत प्रभावीपणे राबवला. या सर्व बाबींचा विचार करून, समाजानेच आपली दिशा ठरवली व देशहिताला प्राथमिकता देवून, आरएसएस प्रणित भाजपला संसदेत बहुमतापासून दूर ठेवण्यास इंडिया आघाडीला मदत केली. परिणामतः उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात आंबेडकरवादी म्हणून, म्हणवून घेणारे पक्ष यशापासून कोसो दूरच राहिलो, तसेच त्यांची राजकीय पक्षाची वाताहत/अधोगतीच झाली आहे. ही बाब समस्त बौद्ध व आंबेडकरवाद्यांसाठी अतिशन क्लेशदायक आहे. इतके होऊनही या पक्षांचे कार्यकर्ते स्वतःच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या भाजप धार्जिण्या संशयास्पद भूमिकेंविषयी न बोलता, समाजाला व त्यातील बुध्दिजीवी वर्गाला दोष देत बसले आहेत. ही बाब समाज व देश हिताच्या दृष्टीने बरी नाही. करिता, समाजातील एक जागृत घटक म्हणून, बदलत्या परिस्थिती नुसार, समाज व देश हिताच्या दृष्टीने नेत्यांनी स्वपरिक्षण करून समाजाला योग्य व सक्षम पर्याय द्यावा व आरएसएस प्रणित भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने रणनीती अंगीकारावी, असे मला वाटते. आपण प्रथमतः व अंतिमतःही भारतीय आहोत, हे विसरु नये.
– प्रकाश डबरासे