(हिंदूच खरे दलित आहेत. कारण, ते लहान लहान दलात विभागले आहेत. करिता, फक्त पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना दलित म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे – भाग क्र. २२ वरुन पुढे.. क्रमशः)
भारतीय समाजव्यवस्था ही पूर्णतः चतुर्वर्ण आणि जातीव्यवस्थेवर आधारलेली आहे. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, “हिंदू समाज म्हणजे जातींचे आगार आहे. हिंदू हा जातींनी तयार झालेल्या लोकांचा समूह आहे”. या स्थितीचा विचार करता, माझ्या मते, हिंदूच खरे दलित आहेत, कारण ते लहान लहान दलात/तुकड्यात विभागले आहेत. करिता, फक्त पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना दलित म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
सध्य: परिस्थितीत सुद्धा बाबासाहेबांच्या या विधानाची सत्यता आढळून येते. भारतातील लोकांचे सामाजिक संबंध देखील जातींवर आधारित आहेत. एका जातीने दुसऱ्या जातीशी कोणत्या प्रकारचा सामाजिक व्यवहार करावा, हे जाती पद्धतीने ठरविले आहे. शैक्षणिक, औद्योगीक व संशोधनाच्या क्षेत्रात प्रगती झाल्यानंतर देखील लोकांचा जातींवर अतूट विश्वासच नसून, त्यांची श्रद्धा आहे.
हिंदूंची जातींवर श्रद्धा असण्याचे कारण म्हणजे, जात ही एक कायदेशीर संस्था आहे असे हिंदू कायद्याच्या प्रत्येक पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. त्याचा भंग करणे हा अपराध असून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मनुच्या कायद्याच्या ग्रंथात, ‘मानव धर्मशास्त्र’, हे अत्यंत पुरातन असून हिंदूंच्या कायद्यांचा तो सर्वाधिक विश्वसनीय असा ग्रंथ आहे. मनुपुर्वी वेद, ऋग्वेदांनी देखील जातीस मान्यता दिली असल्याचे आढळून येते. जातीनुसार वर्तन करणे हाच त्यांचा धर्म होय. जो जातीचे उलंघन करील, त्यास कडक शिक्षा देण्याची तरतूद होती. ज्यांनी जातींच्या नियमांचे पालन केले नाही त्यांना शिक्षा दिल्याचे अनेक उदाहरणे इतिहासात आढळून येतात. त्यामुळे, कोणीही जातीच्या विरुद्ध वर्तन करण्याची हिम्मत दाखवू शकले नाही.
हिंदूंनी जातींना धार्मिक मान्यता दिली आहे. ही धार्मिक मान्यता सामाजिक मान्यतेपेक्षा प्रभावी आहे. कारण, सामाजिक, धार्मिक आणि पवित्र श्रद्धांचा परस्पराशी घनिष्ठ संबंध आहे. धार्मिक हे सामाजिक असले तरी, सर्व सामाजिक हे धार्मिक नाही. पवित्र हे सामाजिक असले तरी सर्व सामाजिक पवित्र नाही. या उलट धार्मिक हे सामाजिक व पवित्रही आहे.
अशा प्रकारे धार्मिक मान्यतेचे स्पष्टीकरण करून, बाबासाहेब म्हणतात की, “नेमकी हीच गोष्ट हिंदूंनी जातींच्या बाबतीत केली आहे. त्यांनी जातींना वेदांमध्ये स्थान दिले. वेद पवित्र असल्याने जात सुद्धा पवित्र बनली. वेद हे पवित्र आहेत, कारण ते धार्मिक आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. वस्तुस्थिती अशी आहे की, वेद हे पवित्र असल्यामुळे ते धार्मिक आहेत”.
हिंदू धर्माने जातीला पवित्र मानले आहे. जातीचा जन्म धर्मातून झालेला आहे. त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि त्याला धार्मिक मानले. त्यामुळे, डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे असे प्रतिपादन करतात की, “धर्म हा खडक आहे. ज्यावर हिंदूंनी आपले घर बांधले आहे. आता सुद्धा असे आढळून येईल की, हा साधा खडक नाही, हा तर ग्रॅनाईट खडक आहे. त्यामुळे जातीव्यवस्था आजही टिकली असून, काळाची नासधूस करण्याचे व त्यावर हल्ला चढविण्याचे सामर्थ्य जातीमध्ये आहे”.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (७४-७५) या ग्रंथातून)