- 28
- 1 minute read
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-२९
(प्रस्थापित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अस्पृश्यांविरूद्ध पराकोटीचा हिंसाचार करण्याची वेळ आली तरी, हिंदूंना त्यात रानटीपणा किंवा निर्दयपणा वाटत नसे. आणि, साधारणतः अशीच परिस्थिती आजही दिसते)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारतीय समाज व्यवस्थेची अस्पृश्यता ही एक अमानविय समस्या आहे. हिंदूतील अस्पृश्यता ही एक विचित्र आणि जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही भागातील मानवतेला अपरिचित गोष्ट आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी आपले विचार मांडण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आफ्रिका-अमेरिकेतील निग्रो समाज, रोमन साम्राज्यातील गुलाम समाज किंवा ज्यू समाज इत्यादींचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविषयी सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व बाजूंनी विचार करून या प्रश्नाविषयी सविस्तर विचार मांडलेत.
येशू ख्रिस्ताच्या मृत्यूस ज्यू लोकं कारणीभूत असल्याचा समज असल्यामुळे, ज्यू लोकांचा छळ केल्या जात होता. मध्ययुगीन काळात जवळपास सर्वच युरोपियन गावांत ज्यू लोकांना गावाजवळ मर्यादित आणि ठराविक जागेत राहणे भाग पाडले. भारतात देखील अस्पृश्य लोकांची गावाबाहेर वस्ती आहे. ज्यू आणि अस्पृश्यांच्या प्रश्नांचे स्वरूप सारखे असले तरी ह्या दोन्ही प्रश्नांच्या संदर्भात मूलभूत फरक आहे. ज्यू लोकांना ख्रिश्चन समाजापेक्षा वेगळे अस्तित्व ठेवायचे होते. म्हणूनच, त्यांनी स्वइच्छेने अलिप्तपणा स्वीकारला होता. तर, अस्पृश्यांना सक्तीने हिंदू समाजापासून वेगळे ठेवण्यात आले होते. अस्पृश्यता ही एक शिक्षा आहे, असे बाबासाहेब म्हणतात.
बाबासाहेबांच्या मते, भारतीय खेडे हा समाज घटक नाही. त्यात जातींचा समावेश आहे. खेड्यातील लोकसंख्या दोन गटात विभागली आहे-एक स्पृश्य आणि दूसरा अस्पृश्य. स्पृश्य बहुसंख्य, तर अस्पृश्य अल्पसंख्यांक समाज राहिला. स्पृश्य आर्थिकदृष्ट्या बलवान व सामर्थ्यशाली आहेत, तर अस्पृश्य हे गरीब व परावलंबी आहेत. स्पृश्यांनी सामाजिकदृष्ट्या सत्तेच्या स्पर्धेत स्थान मिळवले आहे, तर अस्पृश्यांना वेठबिगारी स्वीकारावी लागली आहे. तसेच, अस्पृश्यांनी स्वतःच्या गौणत्वाच्या दर्जाची जाणीव ठेवून तशा प्रकारे गौण राहणीमान ठेवावे लागत असे. प्रत्येक खेड्यात स्पृश्यांची एक आचार संहिता आहे. जिचे पालन अस्पृश्यांना करावे लागे. या आचार संहितेचा भंग करणे म्हणजे अपराध आहे, असे स्पृश्य समजतात. खेड्यातील प्रत्येक हिंदू हा स्वतःला अस्पृश्यांपेक्षा श्रेष्ठ समजत असे. आपण परमेश्वराचे अवतार असल्याने आपली प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे असे त्यांना वाटे. ही प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्यांच्या बोटावर नाचणारे कोणीतरी असण्याची त्यांना आवश्यकता भासू लागली. आणि, अशा कामासाठी त्यांना अस्पृश्य तयार असल्याचे आढळले की, ज्यांना त्या कामाबद्दल मोबदला देण्याचीही आवश्यकता नव्हती. अस्पृश्य त्यांच्या असहाय्य परिस्थितीमुळे ते काम नाकारू शकत नव्हते. आणि, स्वतःची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्यांच्याकडून काम करून घेण्यात हिंदूंनी कधीही मागेपुढे बघितले नाही. मानवजात म्हणूनही अस्पृश्य अयोग्य आहेत, अशा प्रकारची हिंदूंची भावना होती.
स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील संबंध हे निश्चित स्वरूपाचे असून, तो विषय प्रतिष्ठेचा बनला आहे. अस्पृश्यांना बिनचुकपणे गौण, हीन दर्जा, तर स्पृश्यांना प्रतिष्ठेचा दर्जा देण्यात आला आला असून, त्याचे पालन करणे अस्पृश्यांना बंधनकारक आहे. ही व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्याची हिंदूंची प्रबळ इच्छा होती. या व्यवस्थेला थोडा जरी धक्का लावण्याचा अस्पृश्यांनी प्रयत्न केला तरी त्यांना दडपून टाकायचे, चिरडून टाकायचे याची हिंदूंनी तयारी ठेवली असे. म्हणूनच, सर्वसामान्य अहिंसक हिंदू सुद्धा अस्पृश्यांविरूद्ध हिंसाचाराचा अवलंब करण्यास कचरत नसे. प्रस्थापित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अस्पृश्यांविरूद्ध पराकोटीचा हिंसाचार करण्याची वेळ आली तरी, हिंदूंना त्यात रानटीपणा किंवा निर्दयपणा वाटत नसे.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)