- 35
- 1 minute read
महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३९
(ब्राम्हणवादाची प्रमुख तत्वे पशूबळी, असमानता, इत्यादि होती. त्यामुळे, ब्राम्हणी धर्माबद्दल तिरस्कार व बौद्ध धम्माबद्दल आदर वृद्धिंगत झाल्याने, बौध्दांवर विजय मिळवण्यासाठी गोहत्या व यज्ञाद्वारे पूजा करण्याच्या पद्धतीचा त्याग करण्यावाचून ब्राम्हणांना गत्यंतर उरले नव्हते)
प्राचीन काळात, ब्राम्हणांसह, हिंदू समाजातील इतर सर्वच लोकं गोमांस खात होते. इतकेच नव्हेतर गाईचे मास खाणे त्यांना आवडत असे. पूर्वीच्या काळी यज्ञामध्ये पशुंचा बळी दिला जात असे. धार्मिक कार्यामध्ये गाईचा बळी दिला जात होता. यज्ञात दिल्या जाणाऱ्या गाईचे मांस केवळ ब्राम्हण पुजारी व गुरु खायचे. ब्राम्हणांना दररोज गाईचे मांस खायला मिळत होते. बाकीचे लोकं मात्र गाईच्या मासापासून वंचित राहायचे. त्यावेळी गाईचे मांस अत्यंत पवित्र आणि महाग होते. प्रत्येक व्यक्तीला गाईचे मांस मिळणे कठीण होते. बऱ्याच लोकांना फक्त धार्मिक कार्याच्या दिवशीच गाईचे मांस मिळत होते.
बौद्ध धम्मात मात्र पशूबळीच्या प्रथेला तीव्र विरोध करण्यात आला. बौद्ध धम्मात सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेमाची भावना होती. त्यामुळे सर्वच लोकांनी बौद्ध धम्मातील या गोष्टीचे स्वागत केले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की, आम्ही प्राणीमात्राची हत्या करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, बौद्ध धम्माचा लोकांवर इतका प्रभाव पडला होता की, वाताहत झालेले लोकं देखील बौद्ध धम्माचे अनुयायी झालेत. कारण, हिंदू लोकांनी त्यांना आदरच्या भावनेने कधीच वागवले नव्हते. वाताहत झालेल्या लोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी ब्राम्हणवादावर टीका करण्यास सुरवात केली. त्यामुळे, बौद्ध धम्माच्या तुलनेत ब्राम्हणवादाला शरणागती पत्करावी लागली. ब्राम्हणवादाची प्रमुख तत्वे पशूबळी, असमानता, इत्यादि होती, ज्यांचा विरोध वाताहत झालेल्या लोकांनी केला. बौद्ध धम्मात गोहत्येचा निषेध केल्यामुळे बौद्ध धम्माने जनतेच्या मनाची पकड घेतली होती. गृहपतीने पाहुण्याला गोहण म्हणजे गायमाऱ्या असे म्हणून त्यांचा तिरस्कार करणे सुरू झाले होते. त्यामुळे आपली परिस्थिति सुधारण्यासाठी व बौध्दांवर विजय मिळवण्यासाठी गोहत्या व यज्ञाद्वारे पूजा करण्याच्या पद्धतीचा त्याग करण्यावाचून ब्राम्हणांना गत्यंतर उरले नव्हते.
गोमांस भक्षण करणारे ब्राह्मण शाकाहारी का बनले याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील प्रमाणे दिले आहे. गोमांस भक्षनाचा त्याग करण्यामागे ब्राम्हणांचा हेतु बौद्ध भिक्षूंचे वर्चस्व हिसकावून घेण्याचा होता, हे ब्राम्हणांच्या शाकाहारी होण्याच्या प्रक्रियेवरून सिद्ध होते. बौद्ध धम्माची तुलना करता एका बाबतीत ब्राम्हणी धर्म जनतेच्या मनातून एकदम उतरला होता. ती बाब म्हणजे ब्राम्हणी धर्माचे सारतत्व असलेला पशूयज्ञ ही होय. पशूयज्ञाला बौद्ध धम्माचा तीव्र विरोध होता. शेतकी प्रधान समाजामध्ये गाई व बैल यांच्या संहित अन्य प्राण्यांचीही कत्तल करणाऱ्या ब्राम्हणी धर्माबद्दल तिरस्कार व बौद्ध धम्माबद्दल आदर वृद्धिंगत व्हावा हे पूर्णतः स्वाभाविक होते. गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी बौध्दांपेक्षा अन्य काय करता येण्यासारखे होते, हा ब्राम्हणांपुढील प्रश्न होता. त्यामुळे, बौद्ध भिक्षुंच्याही पुढे एक पाऊल टाकून केवळ गाईचे मासच नव्हेतर सर्व प्रकारचे मांस सोडून पूर्णतः शाकाहारी होण्यावाचून त्यांना गत्यंतर उरले नव्हते. शाकाहाराचा स्वीकार करण्यामागे ब्राम्हणांचा हाच हेतु होता.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)