महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा साक्षात्कार घडवणाऱ्या संग्रहालयाचा देखील मनपूर्वक अभ्यास केला.
भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२१–२२ या काळात विद्यार्थीदशेत या वास्तूत वास्तव्यास होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला आदराने पुष्पांजली अर्पण करत सपकाळ कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
भूतकाळातील दुर्मीळ छायाचित्रे, वैयक्तिक वस्तू, हस्तलिखिते व संविधानाच्या प्रतिकडे पाहताना त्यांनी भावना व्यक्त केल्या की, ही वास्तू केवळ एक स्मारक नसून प्रेरणास्थान आहे. बाबासाहेबांच्या अभ्यासाच्या खोलीत बसून त्यांनी नमूद केले की, “ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला.”
या प्रसंगी मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या ‘सकपाळ’ या आडनावाचा संदर्भ देत, बाबासाहेबांचे पूर्वीचे आडनाव ‘सकपाळ’ होते, याची आठवण करून दिली.
बाबासाहेबांच्या विचारांची आजही देशाला नितांत गरज असून, त्यांच्या मार्गाने चालण्याचे तेथील आंबेडकरी जनतेला आवाहन केले. माझी लंडनची भेट आता खरी सार्थक झाली असून मी ती कधीही विसरणार नाही असे प्रकर्षाने सांगितले. बाबासाहेब हे फक्त ऐका समाजाचे तसेच देशाचे नसून ते सर्व जगाचे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीच्या निमित्ताने लंडनस्थित आंबेडकरी अनुयायांनी हर्षवर्धन सपकाळ यांचे पुष्पगुच्छ आणि “महामानव” हे पुस्तक देऊन हार्दिक स्वागत केले.