महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली
बारामती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, डीजीसीएकडून (DGCA) या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये झंझावाती सभा घेणार होते. यासाठी ते आज सकाळी मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. बारामती विमानतळावर उतरत असतानाच विमानावरचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच विमान जवळच्या शेतात कोसळून त्याला भीषण आग लागली.
या अपघातात ६ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे दोन वैयक्तिक सहाय्यक, वैमानिक आणि अन्य दोन व्यक्तीचे समावेश होते. यावेळी विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून बचावकार्य तातडीने राबवण्यात आले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी श्रद्धांजली वाहिली
या धक्कादायक घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. अजित पवारांची काम करण्याची एक स्वतःची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती, हे नाकारता येणार नाही.”
“त्यांच्या पत्नी, कुटुंब, मित्र आणि पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह इतर ५ जणांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “ज्या विमान अपघातात ६ जणांचा बळी गेला, त्या घटनेची अत्यंत योग्य आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.