माझे वडील यांचा आज स्मृती दिवस आहे. 1980 मध्ये त्यांनी मला सांगितले होते की अशी नोकरी कर ज्यामुळे लोकांना मदत करता येईल आणि कामामुळे समाजात ओळख होईल. त्यावेळी मी ONGC मध्ये मुंबई ला क्लास वन ऑफिसर होतो. मोठ्या पगाराची नोकरी असून ही गरिबांच्या, गरजूंच्या रोजच्या समस्या दूर करण्यासाठी काही करता येत नसेल तर काय उपयोग? असे ते म्हणाले आणि कलेक्टर बन असा सल्ला दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व कार्य त्यांच्यासमोर होते. माझे वडील शिकलेले नव्हते परतू शहाणे होते, सामाजिक जाणिवा होत्या, दूरदृष्टी होती. 14 ऑक्टोबर 1956 च्या धम्म क्रांती चा संदेश गावागावात पोहचला होता.
मी वडिलांचे म्हणणे मनावर घेतले आणि प्रयत्नांती कलेक्टर झालो. सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करत करत, शक्य तेवढे काम , प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊन गरीब, गरजू व शोषीत, वंचितांच्या भल्यासाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असे करताना, काही चुकलेही असेल , काही राहून ही गेले असेल मात्र प्रयत्न कुशल कर्माचा होता. Ambedkarism इन administration चा होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानामुळे प्राप्त अधिकाराचा हिंमतीने वापर करीत वर्ष 2005 मध्ये नागपूर जिल्ह्यातील शाळेच्या भिंतीवर दर्शनी भागात संविधानाची प्रास्ताविका लिहून घेतली व संविधान प्रास्ताविका वाचन सुरू केले, ह्याच वर्षी 26 नोव्हेंबर ला संविधान दिवस साजरा केला. संविधान ओळख हा असा देशातील पहिलाच उपक्रम प्रथमतः नागपूर जिल्हयात सुरू झाला.पुढे 2015 पासून देशभर सुरू झाला. या कामामुळे थोडीशी का होईना , समाजात एक वेगळी ओळख मिळाली. हे घडून येण्यासाठी पत्नी रेखा हिचे फार मोठे योगदान व त्याग आहे. 45 वर्षांपूर्वी वडिलाने दाखविलेल्या मार्गावर चालत राहिलो त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संदेशानुसार काम इमानदारीने, स्वाभिमानाने करता आले ह्याचे निश्चितच समाधान आहे. My Father is my Role model.