जगभर माणसांचा एकटेपणा वाढत आहे. फक्त एकेकटी राहणारी माणसे नाहीत. तर कुटुंबात राहणारी, एकत्र काम करणारी माणसे देखील आतून एकएकटी आहे. विशेषतः महाकाय महानगरांमध्ये सर्वात जास्त.
कोट्यावधी माणसांच्या शहरात लाखो माणसे एकटेपणा मेहसूस करत असतील तर हा केवढा विरोधाभास आहे. पण तो मुद्दा तूर्तास बाजूला ठेवूया
असे असले तरी माणसाची इतर माणसांबरोबरच्या भावनिक बंधांची, मैत्रीची भूक पुरातन आहे. ती ना थांबणार. ना जाणार.
जेथे जेथे भूक तेथे तेथे कोणते तरी प्रॉडक्ट किंवा सेवा विकायला संधी हे भांडवलशाही बरोबर ताडते.
Friend डॉट कॉम नावाने नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉडक्ट अमेरिकेत तयार होत आहे. “तुमच्याशी मैत्री करणारे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉडक्ट असेल” असा मेसेज दिला जात आहे.
त्याच्या तडाखेबाज विक्रीसाठी अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे महानगर असणाऱ्या न्यूयॉर्क शहरात जोरदार जाहिरात मोहीम राबवली जात आहे. न्यूयॉर्क मधील सबवे मधून दररोज कही दश लक्ष नागरिक प्रवास करतात. त्या सबवे मध्ये मेट्रोचे अनेक डबे रंगवून या जाहिराती केल्या जात आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सामान्य नागरिकांमध्ये कुतूहलापेक्षा भीती आणि दहशत जास्त आहे.
Friend डॉट कॉम च्या जाहिरातीतून लोकांना हा मेसेज जात आहे की ए आय आता त्यांच्या व्यक्तिगत जीवनात आपले अदृश्य टेन्टॅकल्स घुसवणार आहे. त्याचा उपयोग भविष्यात सर्विलियंस स्टेट साठी केला जाणार आहे.
त्यामुळे या जाहिरातीविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून खूप सोशल मीडिया मोहीम देखील उभी रहात आहे.
अमेरिकेत जे घडते त्याचा मागोवा ठेवला की नजीकच्या काळात आपल्याकडे जे घडणार आहे त्याची किमान माहिती तरी ठेवता येईल.