• 91
  • 1 minute read

माळशिरस एस.सी आरक्षित जागेवर शरद पवारांचा ओबीसी उमेदवार ?

माळशिरस एस.सी आरक्षित जागेवर शरद पवारांचा ओबीसी उमेदवार ?

          अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 29 मतदारसंघापैकी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस हा एक मतदारसंघ. हा मतदारसंघ राखीव होण्या अगोदर मोहिते पाटील या राजकारणातील धन दांडग्या घराण्याचे वर्चस्व असलेला मतदारसंघ. मतदारसंघ राखीव होताच मोहिते पाटलांनी आपल्या मर्जीतील अनुसूचित जातीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याच दरम्यान राज्यातील सत्तेचे केंद्र बदलले. काँग्रेसची सत्ता जावून भाजपची सत्ता आली, तसे मोहिते पाटील भाजपवाशी झाले अन त्यांनी येथून भाजप उमेदवार निवडून आणला. आता पुन्हा सत्तेचे केंद्र बदलतेय हे दिसताच मोहिते पाटील राष्ट्रवादीत दाखल झाले व इंडिया आघाडीमुळे खासदारकी ही मिळविली. पण हे घराणे कुठे ही असले तरी त्यांच्यातील जातीय मानसिकता जात नाही. आरक्षित जागेवरून आपल्या घरगड्यांना निवडून आणून सत्ता आपणच भोगायची ही काँग्रेसी कल्चर त्यांच्यात ठासून भरले आहे. आता ही इंडिया / अथवा महाविकास आघाडीचे जागा वाटप होण्या अगोदर शरद पवार यांनी माळशिरसमधून उत्तमराव जानकराची उमेदवारी जाहीर केली आहे. जे धनगर असून त्यांनी खाटीक या अनुसूचित जातीचे बोगस सर्टिफिकेट मिळविले आहे. बोगस जात सर्टिफिकेट असलेल्या नवनीत राणाला ही खासदार बनविण्यात शरद पवाराचीच चाल होती. आता ते आणखी एका राखीव जागेवर डल्ला मारायला निघाले आहेत.

       1970 च्या दशकानंतर महाराष्ट्रातील सत्तेची सूत्र शरद पवार यांच्या आली. ती इतकी आली की पवार म्हणतील तोच कायदा, तिच नीती अन तोच विकास. असेच झाले होते. मग पवार काँग्रेसमध्ये असो की काँग्रेसच्या बाहेर. या काळात त्यांनी राखीव जागांवरून अनेकांना निवडून आणले. पण हे करताना त्यांनी आंबेडकरी विचारांच्या पक्ष, संघटना तोडण्याचे काम ही केले. राखीव जागांवरून त्यांनी ज्यांना ज्यांना निवडून आणले. ते सर्वच आज आंबेडकरी विचारांशी, चळवळीशी गद्दारी करीत आहेत. गद्दार निघालेत. अनेकजण भाजपात दाखल झाले आहेत अथवा भाजप सोबत आहेत. सत्तेची गुलामी करण्याचे शिक्षण या सर्वांना पवारांच्या राजकारणाने शिकविले, त्यामुळे आज ते सर्वजण तेच करीत आहेत. 1970 ते 2024 कमी काळ नाही. 5 दशकापेक्षा अधिकचा काळ. पण या काळात पवारांच्या कळपातून एक ही फुले, शाहू, आंबेडकरवादी नेता उभा राहिला नाही. हे पवारांच्या फुले, शाहू, आंबेडकरी असण्यावर प्रश्नचिन्ह उभे करते.
        महाराष्ट्रात मराठा समाज हा रुलिंग क्लास असून तोच शरद पवार याचा मुख्य आधार राहिलेला आहे. पण तेवढ्यावर सत्ता मिळत नसल्याने त्यांनी एससी एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक समाजाला जवळ केले अन सत्ता मिळविली. पण सत्तेचा मलिदा त्यांच्यापर्यंत पोहचू दिला नाही. इतकेच नाहीतर तो पोहचणार नाही, याची चोख खबरदारी ही घेतली असल्याचे दिसून येते. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 54 मतदारसंघ हे एससी, एसटीसाठी राखीव आहेत.शरद पवारांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने व इमानदारीने काम केले असते, तर आज पुरोगामी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारी मोठी ताकद उभी राहिलेली दिसली असती. ती आज कुठेच दिसत नाही. हे फेल्यूअर फक्त अन फक्त शरद पवार यांचेच आहे. कारण तेच या विचारधारेचे गेली 50 वर्ष नेतृत्व करीत होते व त्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने एकमताने मान्यता ही दिली होती. त्यामुळे या फेल्यूवरला तेच जबाबदार आहेत. यात तिळमात्र शंका नाही.
        राज्यातील पुरोगामी जनतेने जो विश्वास शरद पवारांवर दाखविला, त्या विश्वासास पात्रता असताना ही ते पात्र ठरले नाहीत. हे खरे आहे. सहा दशके राज्यात, केंद्रात दबदबा असताना, दोन्ही ठिकाणची सत्ता असताना अनुसूचित जाती, जमाती व ओबीसीमधून एक ही इमानदार नेता पवारांच्या राजकारणातून उभा राहिला नाही. उलट या जाती समूहाच्या पक्ष, संघटनांना तोडण्याचे, फोडण्याचे अनेक कारनामे पवारांच्या नावावर आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी नवनीत राणाच्या घशात एक अनुसूचित जातीची जागा का घातली ? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही ? ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानंतर तेथून त्यांना राज्यातील रहिवाशी असलेला एक ही उमेदवार मिळू नये, हे कुणाचे दुर्दैव ? हा ही प्रश्न असून नवनीत राणाचे गेल्या दोन वर्षातील कारनामे पाहिल्यावर अन तिचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने बोगस ठरविल्यानंतर या संदर्भात राज्यात उलट सुलट चर्चा सर्वच स्थरातून झाली. पण यास जबाबदार असणाऱ्या पवारांनी कधी ही ब्र काढला नाही. ते का कळत नाही.
        नवनीत राणा प्रकरणापासून शरद पवार यांनी काही शिकायला हवे होते. त्यांना याचा पश्चाताप व्हायला हवा होता. या संदर्भात त्यांनी कुठेतरी व्यक्त होऊन बोलायला हवे हॊते. पण तसे झाले नाही. उलट आज पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती करण्याची तयारी ते करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघातून मूळचे धनगर असलेल्या उत्तमराव जानकर यांना उमेदवारी देण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. मात्र मतदारसंघातील जनता आता जागृत झाली असून पवारांच्या या षढयंत्राला ती बळी पडणार नाही. पण पवारांसारखे जाणते नेतृत्व असे का वागते /करते ? हा प्रश्न आहेच की.
       आरक्षित जागेवरून प्रस्थापित राजकारण्यांचे चाकर/ घरगडी व आरक्षण विरोधी पक्षाचेच उमेदवार निवडून येतात, हे चित्र देशभरातील आहे. अन हे काही वाजपेयी अथवा मोदीच्या सत्ताकाळात तयार झालेले चित्र नाही, तर ते अगदी नेहरू काळापासून काँग्रेसी कल्चरचा एक भाग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तर त्यांच्याच अनुयायी अथवा नोकरकडून पराभूत करण्याचा विक्रम काँग्रेसच्याच नावावर आहे. हे ही विसरून चालणार नाही. आज तर क्रिमिलियरच्या नावाखाली आंबेडकरी समाजाला सर्व प्रकारच्या आरक्षण व्यवस्थेपासून वंचित करण्याचा प्रयत्न सुरु असून महाराष्ट्रातील महार अन बौद्ध समाज या प्रस्थापित राजकारण्यांचे टार्गेट आहेत. भारतीय संविधानाच्या चौकटीत, सुरक्षित, संरक्षित असलेल्या या आरक्षण व्यवस्थेचे रक्षण, संरक्षण करणाऱ्या लढाऊ जातींनाच आरक्षणापासून वंचित करण्याचा संघाचा कृती कार्यक्रम असून बाकींच्या पक्षांचा त्यास मूक पाठींबाच आहे की काय ? अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आज देशभर आहे.

—————————————-

– राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश.

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *