‘मी तांदूळ विकत घेत नाही’ या वाक्याने जपानी कृषि मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा !
ताकु एतो नावाचे गृहस्थ बुधवार पर्यंत जपानचे कृषि मंत्री होते. मात्र गेल्या रविवारी त्यांच्याच पक्षाच्या एका समारंभात “मला तांदूळ विकत घ्यावे लागत नाहीत. माझे चाहते माझ्यासाठी भेट स्वरूपात जे तांदूळ देतात ते माझ्यासाठी पुरेसे असतात” असे वक्तव्य केले होते. या वाक्याने संपूर्ण जपानी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आणि त्यांना त्यांच्या कृषि मंत्री पदाचा राजिनामा जपानी पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द करावा लागला. जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्या कार्यालयाने कृषि मंत्र्याचा राजिनामा दिला तसा स्विकारत बुधवारी मंजूर केला गेला आणि ताकु एतो यांचे मंत्रीपद गेले.
जपान मध्ये लोकांचे प्रमुख अन्न भात आहे. आणि भाताचे उत्पन्न जपानच्या गरजेच्या तुलनेने 60 टक्क्याने कमी झालेले आहे. म्हणजेच जपान अन्नधान्याच्या दृष्टीने परावलंबी झालेला आहे. त्याला इतर देशांतून अन्नधान्य आयात करावे लागते. जागतिक हवामान बदल, युक्रेन रशिया युद्ध यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अन्नधान्याच्या भाववाढीमुळे जपान मधील लोकांना चढ्या दराने तांदूळ खरेदी करावा लागत असल्याने जनतेमध्ये आक्रोश सुरु असतानाच मंत्र्याने लोकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे वरील वादग्रस्त वक्तव्य केले आणि जनता रस्त्यावर उतरली. परिणामी मंत्र्याची गच्छंती झाली. हा सर्व प्रकार म्हणजे जणू फ़्रान्स मध्ये सोळाव्या लुई चे वक्तव्य आणि फ़्रेंच लोकांचा उठाव याचे स्मरण करुन देणारा प्रसंगच ठरला.
मात्र या जपानी नेत्याने वक्तव्या पश्च्यात दाखविलेलीइ संवेदनशीलता वाखानण्याजोगी आहे. हाच मंत्री नंतर राजिनाम्यावर जपानी प्रेस समोर खुलासा देताना संवेदनशीलपणे सांगतो की, माझे वक्तव्य लोकांमध्ये चीड निर्माण करणारे होते. आपल्या खुलाशात ते म्हणतात की, ‘मी पण तांदूळ विकतच घेतो’ असे सांगून सध्या जपानमध्ये अन्नधान्याची गंभीर टंचाई आहे. गरज भागविण्यासाठी जपानला इतर देशांकडून अन्नधान्य आयात करावे लागते.अन्नधान्यात परावलंबित्व कमी करुन जपानला स्वयंपूर्ण होण्यासाठी रचनात्मक कृषि धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल.
ही बातमी राजकीय वर्तुळात माध्यमांमधून एकमेकांवर चिखलफ़ेक करण्यासाठी मध्यवर्ती राहीलही पण एखादा देश अन्नधान्यात परावलंबी झाल्यावर काय परिस्थिती ओढवू शकते याची ही झलक.