मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) सज्ज झाली आहे. विक्रोळी येथील पार्क साईट परिसरात काल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य ‘जाहीर सभा’ पार पडली. या सभेच्या माध्यमातून आंबेडकरांनी महापालिकेतील भ्रष्टाचार आणि मराठी माणसाच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
मराठी माणसाच्या घरांसाठी आणि रोजगारासाठी काय केले?
मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी होत असल्याच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांनी प्रस्थापित पक्षांना धारेवर धरले. ते म्हणाले, “मराठी माणसाचा टक्का कमी झाला म्हणून बोंबाबोंब केली जाते, पण हा टक्का वाढवण्यासाठी तुमच्याकडे ठोस आराखडा आहे का? गेल्या २० वर्षांत ज्यांची सत्ता होती, त्यांनी महानगरपालिकेचा उपयोग मराठी माणसाला घर आणि रोजगार देण्यासाठी का केला नाही?”
मराठी माणसाला व्यापारात आणि रोजगारात स्थान मिळवून देण्यासाठी राज्यशासन आणि स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस धोरणे राबवली नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
वंचितचा ‘प्लॅन’ आणि आश्वासनं –
मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
जागांचा वापर: काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महापालिकेच्या मोकळ्या जागा आणि कॉर्पोरेशनच्या जागा मराठी माणसाचा टक्का वाढवण्यासाठी वापरल्या जातील.
टॅक्सचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी : नागरिकांनी भरलेला टॅक्स लूटमारीसाठी नाही, तर लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी वापरला पाहिजे.
आर्थिक केंद्र :
मुंबईला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनवण्याची गरज आहे, जेणेकरून बेरोजगारी संपेल. मात्र, भाजपला हे जमणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
“धर्माच्या नावाखाली दंगली घडवणे आणि समाजात भीती निर्माण करून माणसांना विभागण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर नाराजी व्यक्त केली.
विक्रोळी (पश्चिम) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वर्षा नगर येथे पार पडलेल्या या सभेसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. “वंचित बहुजन घटकांचा सहभाग महापालिकेच्या सत्तेत वाढवण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे,” असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले. या सभेमुळे विक्रोळी आणि आसपासच्या परिसरातील ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य संचारल्याचे पाहायला मिळाले.