मूल्यं नसलेल्या संस्कृतीचे माथेफिरू

मूल्यं नसलेल्या संस्कृतीचे माथेफिरू

मूल्यं नसलेल्या संस्कृतीचे माथेफिरू

जेव्हा तुमची स्वतःची विचाराधारा नसते, स्वतःची ओळख नसते, स्वतःची मूल्ये नसतात तेव्हा तुम्हाला ती जातीकडून धर्माकडून उधार घ्यावी लागतात. ती उधारीची आणि कमकुवत असल्यामुळे त्यावर उभी तुमची अस्मिताही ठिसुळ असते.

ही जातीधर्माची नाजूक अस्मिता म्हणजेच फाजील अहंकार घेऊन मिरवणारी असंख्य माणसं आपल्या अवतीभवती असतात. अगदी आपल्या घरातही असु शकतात. ज्या जातीत ज्या धर्मात जन्मले त्यात जन्म घेण्यात त्यांचं कोणतंही कर्तृत्व, पराक्रम किंवा कवडीचंही योगदान नसतं तरीही त्यांना “गर्व” असतो अमुक जातीत किंवा अमुक धर्मात जन्मल्याचा.

झुंडीत माणूस स्वतःला सुरक्षित अन शक्तिशाली फील करत असतो. जातीधर्माच्या झुंडी तुम्हाला आयत्या मिळालेल्या असतात. त्यासाठी कष्ट घ्यायची गरज नसते. विचार करण्याचीही अट नसते. मेंढरासारखं फक्त कळपात माना खाली घालून चालत राहायचं असतं. मेंढरं प्रश्न विचारत नाहीत. शंका घेत नाहीत. मेंढरं विद्रोह करत नाहीत. कारण मेंढरं भूक मैथुन आणि सुरक्षा ह्यापेक्षा जास्त विचारच करत नाहीत.

माणसांतली मेंढरंही अशीच असतात. कळपात आपण सुरक्षित आणि ताकतवान आहोत असा भ्रम त्यांना असतो. भ्रम कसला घमेंड असतो. आपल्या कळपातली मेंढरं आपल्याच कळपात राह्यली पाहिजेत अन दुसऱ्या कळपातली मेंढरं आपल्यात शिरली नाही पाहिजेत ह्याची काळजी घेतली जाते.

पण ती खरी मेंढरं बिचारी एकमेकांचे जीव घेत नाहीत. माणसातली मेंढरं घातक असतात. क्रूर असतात.

डोक्यातून सहज निघून जात नाही ती “जात”. जातीने तुम्हाला खरंतर काहीही उदात्त किंवा उपयुक्त दिलेलं नसतं. तरीही ती जात तुम्हाला इतकी प्रिय का बरं असते?

जातीशी जुळलेला अहंकार फार जीवट असतो. आपल्या पोरानं-पोरीनं जातीतच लग्न करावं अशी जातीवादी पालकांची इच्छा असते. ही इच्छा ते आपल्या मुलांवर जबरीने थोपवतात. मुलांनी ती अमान्य केल्यास मायबाप दुखावतात. त्यांचा अहंकार दुखावतो.

गावात एखाद्याच्या पोरीनं दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून त्या पोरीच्या नावाने अन चांगले संस्कार नसेल दिले म्हणून तिच्या बापाच्या नावाने बोटं मोडत त्यांची खिल्ली उडवत चहाच्या टपरीवर बसलेल्या बापलोकांचा एक ग्रुप असतो. ज्या ग्रुपमधे बसून आपण दुसऱ्यांच्या पोरींना नावबोट ठेवलं होतं, आता त्याच ग्रुपमधे आपलीही तशीच टर उडवली जाईल ह्या कल्पनेने हे जातीयवादी बाप बेचैन होतात, भेदरतात.
ही बेचैनी टोकाला जाऊन मग ऑनर किलिंग्स घडतात.

ऑनर किलिंगच्या ह्या बातम्या तुरळक असतात असं नका समजु. शारीरिक हत्या जरी प्रत्येक केसमधे केली जात नसली तरी जातीमुळे विवाहास विरोध करुन आंतरजातीय विवाह होऊ न दिलेली प्रत्येक केस ही ऑनर किलिंगचीच असते.

हत्या झालेल्या व्यक्तीलाच आपण “मृत” समजतो, परंतु जातीच्या कारणाने लग्न होऊ न दिलेली प्रत्येक व्यक्ती ही मृतच असते. शरीराने नाही तर मनाने.

असे असंख्य मुडदे आपल्या अवतीभवती फिरत असतात.

✍🏼डॉ. विजय रणदिवे

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *