माझा मुलगा सयाजीला 22 नोव्हेंबर 23 रोजी अचानक चालता येईना, त्याचा उजवा पाय विशेषतः गुडघा वळणेही बंद झाले. त्याला प्रचंड वेदना सुरू झाल्या. आम्ही त्याला तत्काळ दवाखान्यात नेले. त्याचे शाळेत जाणे बंद झाले. दहावीचे वर्ष असल्यामुळे काळजी वाटू लागली, परंतु दहावीपेक्षाही त्याचा पाय बरा होणे अत्यावश्यक होते. संचेती, दीनानाथ, जोशी हॉस्पिटल इत्यादी तसेच व्यक्तिगत अशा सुमारे दहा डॉक्टरांनी त्याच्या पायाची तपासणी केली, चार वेळा एमआरआय, एनसीव्ही (Nerve conduction velocity ), असंख्य रक्ताच्या चाचण्या केल्या, रिपोर्ट नॉर्मल येत होते, पण कोणालाही पायाच्या आजाराचे निदान झाले नाही. सुमारे दोन महिने तपासण्या चालू होत्या. कांहीं नामवंत डॉक्टर म्हणाले “कन्फुजन आणि रेअर केस आहे, चालायला येईल की नाही आम्ही सांगू शकत नाही.” हे ऐकून पायाखालची वाळूच सरकली. पण सयाजी खूप धाडसी आहे. तो जराही डगमगला नाही. तो अत्यंत धैर्यवान, महत्त्वाकांक्षी आहे. त्याला खूप वेदना होत होत्या, पण आम्हाला वाईट वाटू नये म्हणून तो सांगत नसे. तो खूप समजदार आहे. तो सतत पुस्तक घेऊनच दवाखान्यात असायचा. परीक्षेपेक्षा पाय महत्त्वाचा आहे, असे आम्ही त्याला सांगत असत. आम्ही खूप घाबरुन गेलो होतो. जे सुचवतील त्या दवाखान्यात आम्ही जायचो. पायाचे निदान कांहीं होत नव्हते. तपासण्या आणि औषधे नियमित चालू होती, पण पायाला यत्किंचितही फरक नव्हता, पायाला प्रचंड वेदना असल्यामुळे सयाजी पहाटे चार पर्यंत जागाच असायचा. वॉकरवर त्याने सुमारे तीन महिने काढले.
पायाबाबत चिंतेत असतानाच आम्ही फलटणचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत मगर यांना दाखवले. त्यांनी सर्व रिपोर्ट पाहिले. त्यांनी प्रदीर्घ अनुभवाच्या व ज्ञानाच्या आधारे पायाच्या आजाराचे अचूक निदान केले. त्यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी पायावर उपचार केले. त्यातच सयाजीची दहावीची परीक्षा सुरू झाली. आनंदाची बाब सयाजी आता 3 मार्चपासून बिना वॉकरचे चालू लागला आहे. जे निदान पुण्याच्या संचेती, दीनानाथ हॉस्पिटलला करता आले नाही, ते निदान फलटण येथील डॉ. हेमंत मगर आणि डॉ. सुमेध मगर यांनी करून पाय दुरुस्त केला. आमची कोणत्याही डॉक्टर किंवा हॉस्पिटलबाबत तक्रार नाही, त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की शहरातील मोठे आणि महागडे दवाखाने म्हणजे ग्रेटच असतात असे नाही, पेपर बरोबरच पेशंट, प्रदीर्घ अनुभवदेखील महत्त्वाचा असतो. डॉ. हेमंत मगर यांनी निदान करून ट्रीटमेंट दिली आणि एक महिन्यात त्याला उत्तम चालायला येईल असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले होते, समजा नाही चालायला आले तर, आणखीन पुढील उपचार आहे, असे ते म्हणाले होते. पण 3 मार्चपासून सयाजी उत्तम चालू लागला. डॉ. मगर सर खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारख्या डॉक्टरांची देशाला खूप खूप गरज आहे. आज (12 मार्च) सयाजीचा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !