आपल्या 11वर्षांच्या सत्ताकाळात प्रचंड अहंकाराने मोदींनी विरोधकांची सतत खिल्ली उडविली, अवमान, अपमान केला. संसदेत जनविरोधी जितके कायदे करता येतील तितके केले, संसदेची प्रतिमा आवारा बनवून टाकली. इतके असताना ही देशावर संकट येताच विरोधक हे सर्व विसरून सरकारसोबत उभे राहिले. सर्व पक्षीय बैठकांमध्ये सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. पण त्या विश्वासास ही पात्र होण्याची कुवत मोदी व त्यांच्या सरकारमध्ये नाही. हे पहलगाम आतंकी हल्ला आणि त्यानंतर पीओकेमधील अतिरेकी अड्ड्यांवर कारवाई प्रकरणी मोदीने दाखवून दिले. संकट व युद्धजन्य परिस्थितीत ही मोदीने धार्मिक अजेंडा, गोदी मिडिया, संघ, भाजप व आय टी. सेलच्या माध्यमातून राबविल्याने संपूर्ण जगभर आपल्या देशाचीप्रतिमा खराब झाली, तर पाकिस्तान विषयी सहानुभूती निर्माण झालेली आहे. ज्या ट्रॅम्पला निवडून आणण्यासाठी मोदी व भक्तांनी जीवाचे रान केले, यज्ञयाग केले होते, त्याच ट्रम्पने या युद्धजन्य परिस्थितीत ज्या भूमिका घेतल्या, धमक्या दिल्या, त्यामुळे तर मोदींच्या इज्जतीच्या चिंध्या झालेल्या आहेत. आज एक ही देश आपल्या सोबत उभा राहायला तयार नाही. नेहरू, इंदिरा गांधींच्या सत्ताकाळापासून मित्र असलेला रशिया ही आता भारताला धमक्या देवू लागला असल्याने, पाकमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. पाकची ही कृती पहलगामच्या अतिरेकी घटनेवर मीठ चोळण्या सारखी व मोदी सरकारच्या विदेश नीतीची खिल्ली उडविणारी आहे.
देशातील मिडिया एकदम मोदी भक्तीमय झालेला आहे. भारताने अधिकृत रित्या फक्त पीओकेमधील आतंकी अड्डे उध्वस्त करण्याची भूमिका घेतली होती. पण या गोदी मिडियाने या भक्तीत रणगाडे, रॅफेल आणखी काही काही पाकिस्तानात घुसविले. इस्लामाबाद, कराची, रावळपिंडीवर ताबा मिळविला. पाकिस्तानचे पंतप्रधान, लष्कर प्रमुखांना पाकमधून पळवून लावले. हे सर्व गोदी मिडियावर सुरू होते. अतिशय संवेदनशील वातावरणात भारतीय मिडियाची भूमिका चीड आणणारी असून याची दखल सर्व जगाने घेतली. गोदी मिडियाने चालविलेल्या फेक न्यूजमुळे मिडियाची नाही, तर मोदीची इज्जत गेली आहे. याचा परिणाम असा झाला की, सर्व जग भारत पाक युद्धजन्य परिस्थितीत पाकच्या बाजूने उभे राहिले.
भारत-पाक युद्ध चीनला हवे आहे. चीनने भारताच्या भूमीवर कब्जा ही केलेला आहे. युद्धाच्या माध्यमातून तो कब्जा अधिकृत करून घ्यायची चीनची योजना आहे. हे युद्ध झाले तर चीन पाकसोबत भारताशी सरळ सरळ युद्धात उतरेल. चीन आणि भारताचे संबंध आता खूप बिघडले आहेत. फक्त देशाचे संरक्षण सल्लागार अजित डोबाल व अदानीचे व्यक्तिगत व्यापारिक संबंध तेवढेच चांगले आहेत. बाकी चीनच्या बाबतीत विदेश निती फेल आहे.
पहलगाम आतंकी हल्ला, पुलवामा हल्ला हे निवडणुका जिंकण्यासाठी घडवून आणलेले हल्ले आहेत, अशी जोरदार चर्चा व शंका देशातील जनतेमध्ये आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत जी चूक झालेली आहे. ती यास दुजोरा ही देत आहे. बर, या हल्ल्यानंतर सर्जिकल स्टाईक करण्यात आले असले तरी, या दोन्ही हल्ल्यातील अतिरेकी अद्याप सापडलेले नाहीत. तर, यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चे प्रमाणेच मोदी सरकारने या घटनांचा वापर निवडणुका जिंकण्यासाठीच केलेला आहे. त्यामुळे हे हल्ले घडवून आणले यास पुष्टी मिळत आहे. तरी ही सर्व विरोधक व जनता सरकारच्या मागे उभी राहिली. मग प्रश्न हा उपस्थित होतो की, पंतप्रधान मोदी, त्यांचे सरकार हे देशातील जनता व विरोधी पक्षांसोबत उभे का नाही. सार्वभौम राष्ट्राचे प्रमुख म्हणून मोदी स्वतः निर्णय का घेत नाहीत ? पंतप्रधान म्हणून मोदीने घ्यायचे निर्णय अमेरिका व ट्रम्प का घेत आहेत ? युद्ध विरामचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला व मग मोदी सरकारने तो जाहीर केला. बर पाकिस्तानशी सरळ युद्ध न करता केवळ पीओकेमधील आतंकी अड्डे इतकेच टार्गेट करा, हा आदेश ही ट्रम्पनेच दिला होता. हे स्वतः ट्रम्पनेच जाहीरपणे सांगितले आहे.
तसेच आज पुन्हा ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारताला धमक्या देवून मी सिजफायर केले. ही सार्वभौम राष्ट्र म्हणून आपली बेइज्जती नाही का ? तरी ही मोदी यासंदर्भात गप्प आहेत. याचा अर्थ मोदी ट्रम्पच्या हातातील कठपुतली आहेत. अथवा मोदी, अदानीची गुपित ट्रॅम्पला माहित असल्याने ते ब्लॅकमेल करीत आहेत. मोदी ज्या प्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांना ब्लॅकमेल करीत आहेत, त्याच पद्धतीने ट्रम्प मोदीला ब्लॅकमेल करीत आहेत. बर हे सर्व ट्रम्प लपुनछपून करीत नाहीत, तर खुलेआम करीत आहेत. अन् हे गंभीर आहे.
अमेरिका भारत पाकिस्तान यांना आपसात लढवित आशिया खंडात अशांततेच वातावरण तयार करीत आहे. अन् मोदी अमेरिकेच्या हातातील कठपुतली झाले आहेत, हा आरोप भारताचा मित्र असलेल्या रशियाने केला आहे. हा आरोप खूपच गंभीर असून याकडे मोदी सरकारने गंभीरपणे पाहिले नाही तर , येणाऱ्या काळात त्याचे खूपच गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील.
मुस्लिम राष्ट्रांचे नेतृत्व करण्याची संधी मोदींनी गमावली…!
११ वर्षांच्या सत्ताकाळात मोदी जगभर फिरले, त्यासाठी करोडो रुपये ही खर्च केले. पण विदेशी धोरण ठोसपणे आखता आले नाही. मुस्लिम राष्ट्राचे ही सतत दौरे मोदीने केले. पण, संबंध मात्र प्रस्थापित करता आले नाहीत. आपल्या शेजारील राष्ट्र म्हणजे पाकिस्तान, बंगला देश व अफगाणिस्तान या राष्ट्रातील जनता नैसर्गिक रित्या भारतवर्षातीलच आहे. भले त्यांचा धर्म वेगळा असेल पण ते भारताविरोधात नाही. या राष्ट्राशी चांगले संबंध प्रस्थापित करून जागतिक राजकारणात आपले महत्त्व वाढविण्याची संधी मोदींकडे होती. पण त्यांच्या हिंदू मुस्लिम अजेंड्याने ती संधी हुकली. ही शेजारील राष्ट्र कट्टर शत्रू बनले असून याचा फायदा घेत चीन भारताच्या सीमांवर अतिक्रमण करीत आहे. हिंदू मुस्लिम अजेंडा, संविधान व लोकशाही विरोधी धोरणे यामुळे मोदींची एक हुकूमशाही छबी जगासमोर उभी राहिली आहे. अन् ही उभी करण्यात गोदी मिडियाचा ही मोठा हात आहे. मोदींची प्रतिमा एक लोकशाही विरोधी सत्ताधाऱ्यांची झालेली आहे. यामुळेच युद्धजन्य परिस्थितीत भारतासोबत एक ही देश उभा राहिला नाही.
नुकताच झालेला आतंकी हमला, पाकचे अतिरेक्यांना असणारे संरक्षण, या गोष्टी चव्हाट्यावर आणण्यासाठी मोदी सरकार संसद सदस्यांचे एक सर्व पक्षीय शिष्टमंडळ जगभर पाठविणार आहे. मात्र हे करीत असताना ही मोदीने विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नाही. उलट विरोधी पक्षात तोडफोड करीत त्यांच्या सदस्यांची या शिष्टमंडळात निवड केली. मोदींच्या या सर्व कृतीवरून असे वाटते की, त्यांना या देशात चांगले काही उभेच करायचे नाही. हा देश सतत अशांत ठेवण्यात त्यांना भाजपचे हित दिसत आहे.
संघ व भाजपचा हिंदू मुस्लिम अजेंडा आणि मोदी सरकारची लोकशाही विरोधी भूमिका यामुळे भारत एकटा पडला आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे. तर संघाला या राष्ट्राला आपल्या शतक महोत्सवी वर्षात हिंदू राष्ट्र घोषित करायचे असल्याने, लोकशाही व संविधान विरोधी जितके वातावरण देशात निर्माण करता येईल, तितके केले जात आहे. त्याचाच परिणाम हे आतंकी हल्ले, देशात होत असलेले बॉम्बस्फोट, जातीय, धार्मिक दंगली आहेत. आतंकवाद्यांना जात व धर्म नसतो, हे खरे आहे. संघ व भाजपने दाखवून दिले आहे. भगवी वस्त्रे परिधान करणारी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ही देशातील बॉम्बस्फोट मालिकेतील एक कुविख्यात चेहरा व भाजपची खासदार राहिली आहे. अशी अनेक नावे आहेत. जी पाकिस्तानसारख्या आतंकी व शत्रू राष्ट्रासाठी हेरगिरी करीत आहेत. अन् हे हेरगिरी करणाऱ्यांचे थेट कनेक्शन संघ व भाजपशी ही राहिले आहे. गेल्या ११ वर्षात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे जितके आतंकी सापडले आहेत, ते सर्वच्या सर्व संघी आहेत व हिंदू धर्मातील उच्च जातीचे आहेत. ज्योती मल्होत्रा हे सध्या गाजत असलेले नाव याचेच एक उत्तम उदाहरण आहे.
……………
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी,
पार्टी महाराष्ट्र प्रदेश