- 13
- 1 minute read
यातून निवडायचे आहेत
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 23
यातून निवडायचे आहेत
आधीपासून असलेले
आज आलेले,
काल आलेले,
परवा आलेले
मागच्या महिन्यात आलेले
मागील वर्षी आलेले
मागच्या निवडणुकीत आलेले
एकदा जाऊन परत आलेले
परत जाऊन परत आलेले
येऊन जाऊन असलेले
परत परत येऊन जाऊन असलेले
यातला एक निवडायचा आहे !!!
पक्षाशी निष्ठा असलेले जुने
पक्षाशी निष्ठा असलेले नवे
पक्षात राहून बाहेरख्याली असलेले
साहेबांशी निष्ठा असलेले जुने
साहेबांशी निष्ठा असलेले नवे
हृदयसम्राटाशी इमान असलेले जुने सैनिक
हृदयसम्राटाशी इमान आणलेले नवे सैनिक
गांधी नेहरूंचे मीठ खाल्लेले
गांधी नेहरूंचे मीठ खाण्यास आलेले
मोदींचे जुने भाट
मोदींचे नवे भाट
यातला एक निवडायचा आहे !!!
तुरुंगात गेलेले
जाऊन आलेले
तुरुंगात वाटेवरचे
आरोप झालेले
जामिनावर सुटलेले
जामीन अर्ज केलेले
पॅरोल वर सुटलेले
सुप्रीम कोर्टात सुटलेले
हाय कोर्टात गेलेले
खालच्या कोर्टात अडकलेले
यातला एक निवडायचा आहे !!!
फुकट वीज
फुकट पाणी
कर्ज माफी
सबसिडी
फुकट राशन
फुकट बेकारभत्ता
फुकट यात्रा
फुकट रस्ते
बोलाची कढी
बोलाचा भात
यातील जास्तीत जास्त देऊ म्हणणारा
यातला एक निवडायचा आहे !!!
भाईचा माणूस
दादाचा माणूस
बाबाचा माणूस
अण्णाचा माणूस
काकांचा माणूस
अध्यक्षांचा माणूस
उपाध्यक्षाचा माणूस
साहेबांचा माणूस
जातीचा माणूस
धर्माचा माणूस
गावाचा माणूस
गुरूचा शिष्य
गटाचा माणूस
संघाचा माणूस
यातला एक निवडायचा आहे !!!
पक्षाचा अधिकृत
पक्षाचा अनधिकृत
पक्षात आयात केलेला
पक्षाने निर्यात केलेला
फिक्स झालेला
पाठींबा दिलेला
छुपा पाठींबा मिळालेला
आतून पाठींबा दिलेला
बाहेरून पाठींबा मिळालेला
आतून विरोध असलेला
बाहेरून विरोध असलेला
आपल्यातला त्यांचा
त्यांच्यातला आपला
यातला एक निवडायचा आहे !!!
शंभर कोटी जमवलेला
हजार कोटी बाळगून असलेला
गावो गावी जमिनी करणारा
बायकोला श्रीमंत करणारा
सासूच्या नावावर फ्लॅट घेणारा
मेव्हणीला जमीन घेउन देणारा
मेव्हण्याला पी.ए. करणारा
भाजीवाल्याला फ्लॅट घेऊन देणारा
ड्रायवरला कंपनी काढून देणारा
अम्बानिशी पार्टनरशिप असलेला
लवासाचे शेअर असलेला
यातला एक निवडायचा आहे !!!
सहकारमहर्षी
शिक्षणसम्राट
मद्यसम्राट
सहाराश्री
वाळूसम्राट
जमीनसम्राट
कोळसासम्राट
खाणसम्राट
हृदयसम्राट
धर्मसम्राट
धम्मसम्राट
यातला एक निवडायचा आहे !!!
छत्रपातींशी नाते असलेला
टिळकांशी नाते असलेला
ओबीसी असलेला
रिझर्वेशन असलेला
ओबीसी नसलेला
ओपन कॅटेगरीचा
एस. सी. असलेला
बी. सी. असलेला
यातला एक निवडायचा आहे !!!
कॉमनवेल्थमध्ये गेम केलेला
कोळशात काळा झालेला
जल संधारणात घोटाळा केलेला
महाराष्ट्र सदनात घपला केलेला
टोळधाडीत सामील असलेला
बँकेत घोटाळे केलेला
मनरेगात घोटाळा केलेला
टी.डी.आर.चा घोटाळा केलेला
देवाच्या नांवाने घोटाळा केलेला
गांधीच्या नावाने घोटाळा केलेला
ट्रस्टच्या नावाने घोटाळा केलेला
यातला एक निवडायचा आहे
राडेबाजी करणारा
बस पेटवणारा
ट्रेन जळणारा
कारच्या काचा फोडणारा
लोकांना भडकवणारा
भाईचा पाठीराखा
झोपडपट्टीचा दादा
अतिक्रमण करणारा
सात बारा नावावर करणारा
अनधिकृत बांधकाम करणारा
यातला एक निवडायचा आहे !!!
कुणी अयोध्येच्या रामाच्या नावाने
कुणी मथुरेच्या कृष्णाच्या नावाने
कुणी काशीच्या विश्वेश्वराच्या नावाने
कुणी अल्लाच्या नावाने
कुणी सत्यसाईच्या नावाने
कुणी आसरामाच्या नावाने
कुणी नारायणसाईच्या नावाने
कुणी आम आदमीच्या नावाने
उभा आहे
तुझ्या साठी कोणी नसले तरी
यातला एक निवडायचा आहे तुला !!!
मतदारा गड्या फार मोठ्ठा choice आहे !
यादी फार मोठी आहे
मी फक्त सुरवात केली आहे
वाढव यादी तुझी तू
मतदार गड्या तुला वेळ तरी कुठे आहे !
चल उठ कोणातरी एकावर ठप्पा मार
मग महागाईचा विचार कर
मग भ्रष्टाचारावर बोल
मग शिक्षणाच्या घसरणाऱ्या दर्जावर बोलत रहा
मग बेकारीवर बोल
मग बलात्कारावर चर्चा कर
मग वाढणाऱ्या विकास खर्चावर बोल
मग ढासळणा-या मूल्यांवर बोल
बोलत बस, बोलत बस आणि कोकलत बस
पुढची पाच वर्षे तुझीच आहेत
उगाच घाई करू नको
पहिले त्यांना निवडून दे
ती लोकशाहीची गरज आहे.
तुला तुझ्यावर शासन लागते,
तुला तुझ्यावर कुणाचे तरी सरकार लागते,
तुला तुझ्यावर लोकसभा लागते,
तुला तुझ्यावर विधानसभा लागते
त्यांच्या शिवाय तुझे जीवन अधुरे आहे.
त्यांना आधी निवडून दे
मग आहेच की!!
महागाई जिथल्या तिथे
भ्रष्टाचार जिथल्या तिथे
बेकारी जिथल्या तिथे
कर्जबुडवे जिथल्या तिथे
बलात्कार जिथल्या तिथे
बाकी सगळे जागच्या जागी जिथल्या तिथे !!!
तू फक्त यातला एक निवडून दे
बेट्या तेव्हढाच तुझा हक्क
श्रीकांत कुलकर्णी
0Shares