- 43
- 1 minute read
राजकारणाचे धार्मिक संविधान
पोलिस व मा.न्यायालय :
नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा तब्बल-११ वर्षानंतर मा.न्यायालयाचा निकाल लागला.या निकालात न्यायाधिशांनी स्पष्ट म्हटले आहे की; “पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केला.” त्यामुळे या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार आणि अन्य दोन आरोपी सुटले. याचा अर्थ तपास करणाऱ्या पोलिसांनीच त्या तीन आरोपींचा बचाव केला; असा होत नाही का? तपास यंत्रणांनी केलेल्या चुका आणि आरोपींच्या कुटुंबाची स्थिती; याचे बारकाईने निरीक्षण केल्यास; ते लक्षात येते. पण न्याय व्यवस्था शंका व तर्काच्या आधारे नाही तर पुराव्यांच्या आधारे निकाल देत असते.हे पुरावे कोर्टापुढे सादर करण्याची जबाबदारी तपास करणाऱ्या पोलिसांची असते. पण पोलिस किती ईमानदारीने काम करतात; हे सर्वज्ञात आहे.आता दाभोळकर परिवाराने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला; तो योग्य आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटायला नको. पण सदोष पोलिस यंत्रणा व न्याय व्यवस्था असलेल्या व नावापुरतीच लोकशाही असलेल्या या देशात “पूर्ण सत्य” सिद्ध करता येईल का? हाच प्रश्न आहे.
पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान असतांना अगदी दोन दिवस आधी हा निकाल दिला गेला; हा काय केवळ योगायोग आहे? न्याय निकाल देण्यास तब्बल अकरा वर्षे लागली? आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या ऐन दोन दिवस आधी निकाल? तपास करणारे पोलिस काय करतात; हे सर्वश्रुत आहे. पण न्याय व्यवस्था कशी काम करते; याकडे ही लक्ष दिले पाहिजे.परंतु याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. किंबहुना याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते;असेही म्हणता येईल.
मरा लेको!
न्यायालयाचा हा निकाल बघून ओबीसी(बहुजन) मुलांनी सावध होण्याची गरज आहे.कारण ते धार्मिक कट्टरवाद्यांच्या नादाला लागून आपले आयुष्य बर्बाद करून घेतात आणि कट रचणारे मात्र सहीसलामत सुटतात.सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनी आपले आयुष्य बर्बाद करून घेतले; आणि त्यांना ज्यांनी नादाला लावले ते मात्र सुटले. अरे पानसरे,दाभोळकर, कलबुर्गी गौरी लंकेश हे काही मुसलमान नव्हते. ते ही हिंदूच होते. पण त्या धार्मिक कट्टरवाद्यांच्या नादी लागून त्यांचा जीव घेतला आणि स्वत:चे आयुष्य देखील बर्बाद केले.राजकारण करणारांनी राजकारण केले.त्यांच्या फसव्या धार्मिक कट्टरवादाचा विरोध करणाऱ्यांना संपवणे; मग ते कोणी ही असो; हाच त्यांचा डाव असतो. राजकीय क्षेत्रात असे डाव टाकणारे व धार्मिक उन्माद निर्माण करणारे कमी नाहीत. त्यात तथाकथीत लोकप्रिय समजले जाणारे नेते सुद्धा सामील आहेत. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे धर्माचा बुरखा पांघरलेले ढोंगी कट्टरवादी लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी लोकांच्या जीवावर उठले आहेत हे तुम्ही लक्षात का घेत नाही?
आमच्या देशात विशेषत: महाराष्ट्रात अनेक समाज सुधारक व संत होऊन गेले त्यांनी आपल्या आयुष्याचं मातेरं करून सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केले पण त्यांचाही त्यांना विसर पडला.म्हणूनच ओबीसी मधील मा.फुले, संत तुकाराम गाडगे बाबा तुकडोजी महाराज…या देशासाठी व समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या तुमच्याच जातीच्या व तुमच्याच धर्माच्या महापुरूषांना तुम्ही अस्पृश्य ठरवले. अशा संत महात्म्यांना विसरून तुम्ही स्वार्थी, ढोंगी व भ्रष्ट राजकीय नेत्यांना आदर्श मानता? आजही सामाजिक सुधारणा करण्यासाठी काही प्रामाणिक लोक प्रचंड मेहनत घेऊन स्वखर्चाने प्रबोधन शिबिरांच्या माध्यमातून कळकळीने सांगण्याचा व समजावण्याचा सतत प्रयत्न करतात. पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही परंतु भ्रष्ट नेत्यांनी प्रायोजित केलेल्या ढोंगी व पाखंडी बुवा बाबांच्या मागे लागता अरे तुमच्यापेक्षा कुत्रे,मांजरं,डुकरं तरी बरे.त्यांना तरी कळतंय; कोणाच्या मागे जावं आणि कोणाच्या मागे जाऊ नये.
अतिरेक म्हणजे काय?
कोणतीही कट्टरता म्हणजे अतिरेक; मग ती धार्मिक असो वा जातीय.त्यातून फक्त लोकांची घरे जाळली जातात व जीव घेतले जातात हे लक्षात घेतले पाहिजे पुराणातील भाकड कथा कादंबऱ्या, नाटकं,काव्य इत्यादी चमत्कारीक मनोरंजक व काल्पनिक साहित्यातील भाकड हिरोंना देव समजून त्यास आधुनिक इंटरनेट व संगणक युगातील तरूण देखील बळी पडतात. यावरून खरंच त्यांच्या डोक्यात मेंदूऐवजी शेण असल्याची खात्री होते. आजही धर्माच्या नावाने हा देश व समाज भरडला जातोय याची कुणालाच खंत वाटत नाही?
संविधानापेक्षा धर्मग्रंथ श्रेष्ठ :
ज्या काळात राजेशाही होती त्या काळात राजाने आपल्या मनमर्जीने राज्यकारभार करू नये; म्हणून देवाधर्माच्या नावावर लिहिलेल्या काल्पनिक साहित्यातील घटनांची उदाहरणे देऊन राजावर मानसिक अंकुश ठेवला जात असे.पण आता त्यासाठी संविधान आहे ना.आता या काळात कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा देशाचे संविधान हाच सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे. हे त्या वेळी संसदेत सर्व धर्मातील लोकांनी मान्य केलं होतं.”आम्ही भारताचे लोक….हे संविधान स्वच्छेने स्वत:प्रत अर्पण करवून घेत आहोत.”असं मान्य करणारे ते लोक काय मूर्ख होते? त्यातही बहुसंख्य लोक तुमच्याच धर्माचे होते ना? एकट्या डॉ. आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संसदेत उपस्थित असलेल्या लोकांनी डोळे लावून ते मान्य केलं असं तर झालं नाही ना? अरे प्रत्येक कलमावर चर्चेतून चिकित्सा करण्यात आली. त्यावर डॉ.आंबेडकरांनी न्यायोचित स्पष्टीकरण केलं.ते पटल्यानंतरच मान्य करण्यात आले.
जगातील धर्मराष्ट्रांची अवस्था :
ज्या ज्या राष्ट्रांनी आपला एक विशिष्ट धर्म अधिकृत राष्ट्रीय धर्म म्हणून जाहीर केला त्या सीरिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक,…या देशांकडे पहा जरा काय स्थिती आहे त्यांची ते पाहून आपला देश जर कोणत्याही एकाच धर्माचा झाला तर विकास होतो हा तुमचा भ्रम दूर होईल.जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या ख्रिश्चन धर्माचा एकही देश या जगात नाही त्या देशांचा विकास पहा पण एकाच धर्माच्या दोन देशांमध्ये अनेकदा युद्ध झाले व होत आहेत; त्या देशांचा विकास पहा. पाकिस्तान व बांगला देश एकाच धर्माचा एकच देश असून सुद्धा युद्ध झालं आणि एकाचे दोन झाले ना…आपल्याही देशातील एकाच धर्माच्या राजांमध्ये युद्ध होत होते ना…म्हणून जरा विचार करा आणि सत्तांध भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांच्या मागे न लागता योग्य,सूशिक्षित व प्रामाणिक लोकांचा शोध घेऊन त्यांना मतदान करा व त्यांनाच निवडून द्या. स्वत:चा रोजगार, व्यवसाय स्वत:च निर्माण करा.जोपर्यंत योग्य, सूशिक्षित व प्रामाणिक लोक निवडून येणार नाही; तोपर्यंत कोणताही नेता तुम्हाला रोजगार देणार नाही.
ते फक्त निवडणुकीपुरते तुमचा वापर करून घेतील.
विद्यावाचस्पती प्रा.
भीमराव गोटे