- 61
- 1 minute read
राजानंद हुमणे : चारित्र्यसंपन्न आंबेडकरी योध्दा तथा रिपब्लिकन एलआयसी युनियनचे सहसंस्थापक!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 86
राजानंद हुमणे : चारित्र्यसंपन्न आंबेडकरी योध्दा तथा रिपब्लिकन एलआयसी युनियनचे सहसंस्थापक!
भारतीय लोकांची सरासरी असलेली उंची लाभलेल्या भक्कम बांध्याचा देह. सतत हसतमुख कार्याला सामोरे जाण्याची तत्परता. अंगात वीज संचारल्यासारखा उत्साह. चळवळीतील कार्यकर्ते, मित्र, आप्तेष्ट व नातेवाईक अशा सर्वांनाच हातच न राखता व परतफेडीची कोणतीही अपेक्षा न करता मदत करणारे, या सर्वांपेक्षाही त्यांची निष्कलंक चारित्र्य संपन्नता आणि रिपब्लिकन एलआयसी युनियन स्थापन करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा म्हणता येईल, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे राजानंद हुमणे!
एलआयसी च्या ९२२ या शाखेत आपल्या सार्वजनिक सेवेची ४० वर्षे योगदान देऊन, मित्रवर्य राजानंद हुमणे निवृत्त होत असताना, त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या अनावर भावना आणि विचार यांची गुंफन म्हणजे आजचे हे शब्दांकन.
राजानंद हुमणे एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून रूजू झाले. त्याच पदावरून ते निवृत्ती देखील घेत आहेत. त्यांच्या सेवा काळात त्यांना एलआयसीच्या प्रशासकीय विभागात पदोन्नतीची अनेकवेळा संधी चालून आली. परंतु, आधी एससी/एसटी असोसिएशन आणि त्यानंतर हक्काची स्थापन केलेली रिपब्लिकन एलआयसी एम्प्लॉईज युनियन या संघटनांच्या कार्यांसाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी आपली पदोन्नती वेळोवेळी टाळली.
एलआयसी मध्ये के. पी. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या अखिल भारतीय एससी/एसटी असोसिएशन चे कार्य करताना त्यांनी नेहमीच आपले सर्वस्व झोकून कार्य केले. हुमणे यांच्याविषयी खास बाब अशी की, त्यांनी आपल्या संपूर्ण सेवा काळात असोसिएशन किंवा युनियनच्या माध्यमातून आपले वैयक्तिक काम कधीच करून घेतले नाही. याउलट, असोसिएशनचे अध्यक्ष के. पी. चौधरी दिल्लीहून ज्या ज्या वेळी मुंबईत दाखल झाले, त्या त्या वेळी त्यांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह सेवेला ते पुढे राहिले. मात्र, चौधरी यांच्या कार्यपध्दतीविषयी जेव्हा वाद निर्माण झाला त्यावेळी केपी यांना गुजरात अधिवेशनात जाऊन धारेवर धरणारे लढवय्ये देखील हुमणेच होते.
के. पी. चौधरी यांच्याशी हुमणे यांचे तीव्र मतभेद झाल्यानंतरची एक आठवण या ठिकाणी मुद्दाम नमूद करावीशी वाटते. हुमणे यांचा मोठा मुलगा स्वप्निल त्याच्या मित्रांबरोबर दिल्लीला पर्यटनासाठी गेला होता. दिल्लीहून नोएडा मुक्कामी जात असताना ज्या उबेर टॅक्सीत ते प्रवास करित होते, त्या टॅक्सीचा भीषण अपघात झाला होता. मध्यरात्री झालेल्या त्या भीषण अपघातात स्वप्निल चे मित्र गंभीर जखमी झाले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी केपी चौधरी यांच्यासोबत मतभेद झाले असतानाही पहिला फोन मदतीसाठी त्यांना केला. के. पी. चौधरी यांनी देखील तितक्याच तत्परतेने त्या मुलांना मदत पुरवली. ज्या व्यक्तीशी आपले तीव्र मतभेद झालेत, त्याच व्यक्तीला संकटकाळात संपर्क करणे हे खरेतर नैतिक बळ असल्याशिवाय शक्य नाही.
राजानंद हुमणे यांच्या ९२२ या शाखेत बऱ्याचवेळा माझे जाणे-येणे असायचे. तसं रूढ अर्थाने तिथं काम नसतानाही जाणं हे त्यांच्या स्नेहाखातर वरचेवर होत राही. त्यांच्या सोबत कॅन्टीनमध्ये बसून चहा पीत गप्पा मारण्याची मजा काही औरच असायची. अशाच, गप्पा सुरू असताना एकदा त्यांच्या असोसिएशनच्या संदर्भात विषय निघाला. त्यावरून असोसिएशन नेमके काय करतात यावर 3 Ways Media च्या मासिक ‘सिंहलोक’ चा विशेष अंक काढण्याचे ठरले. त्यानुसार, फोर्ट, चर्चगेट, कफपरेड या विभागातील जवळपास सर्व सरकारी आस्थापनांमध्ये जाऊन एससी/एसटी असोसिएशन चे कार्य समजून घेतले. त्यावर मासिक ‘सिंहलोक’ चा विशेषांक ही निघाला. त्या विशेषांकात आम्ही तीन निष्कर्ष नोंदवले होते; १) नियुक्ती, बढती आणि बदली या तीनच बाबींवर असोसिएशन काम करते, २) असोसिएशन ला युनियन सारखे कोणतेही अधिकार नाहीत, ते सहानुभूती वर चालते, ३) एससी/एसटी यांचे सामाजिक प्रश्न मांडणारी युनियन ची गरज आहे.
मासिक ‘सिंहलोक’ ने काढलेल्या या निष्कर्षांविषयी राजानंद हुमणे यांनी मुंबईतील असोसिएशनचे नेते मा. सुमेध जाधव यांच्याशी चर्चा केली. त्या दोघांच्या चर्चेतून रिपब्लिकन एलआयसी युनियन स्थापन करण्याची कल्पना पुढे आली आणि सुमेध जाधव आणि हुमणे यांनी ती स्थापनेच्या यशस्वीतेपर्यंत नेली. अर्थात, यात इतरही सहकाऱ्यांचा सहभाग होताच.
राजानंद हुमणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण तर पहिल्या पॅऱ्यात वर्णिली आहेत. परंतु, त्यांचा खास स्वभाव म्हणजे त्यांना रागावलेले कधी पाहिले नाही. अतिशय मितभाषी. कोणत्याही कार्यात निःसंकोचपणे झोकून देणारा स्वभाव. निगर्वीपणा तर त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य.
अनेक स्वभाव वैशिष्टे असलेले हुमणे, कार्य मात्र इतरांच्या हितासाठीच करताना दिसले. भीती आणि भांडण या दोन गोष्टी तर त्यांच्यापासून कोसो दूर राहिलेल्या. मला त्यांचा खरा गुण भावला तो म्हणजे चारित्र्यसंपन्नता. बऱ्याचदा अधिकाराच्या पदावर असताना आर्थिक लोभ किंवा आकर्षण निर्माण होते. परंतु, हुमणे यांना अशा लोभाने स्पर्श देखील केला नाही. त्यांच्यात असलेल्या या चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द ते नेहमी उद्धृत करतात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, ‘ मी विद्वान आहे म्हणून लोक मला घाबरतात असे नाही; मी खूप पदव्या घेतल्या म्हणून मला घाबरतात असेही नाही; मला घाबरतात यासाठी की, माझे चारित्र्य खूप शुध्द आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार-प्रेरणेने आपले जीवन जगणारे मित्रवर्य राजानंद हुमणे यांच्या साठी पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या सेवानिवृत्ती च्या प्रसंगी त्यांना हार्दिक मंगलकामना. यापुढील त्यांचे जीवन आणखी उर्जा आणि आरोग्यसंपन्न होऊन त्यांना कृतीशील शतायुष्य लाभो.
– चंद्रकांत सोनवणे
0Shares