- 173
- 1 minute read
राहुल गांधी यांनी राजकारणातील मुस्लिम टक्का वाढवून सेक्युलर राजकारणाला मजबूती द्यायला हवी
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 128
राहुल गांधींनी राजकारणातील मुस्लिम टक्का वाढवून सेक्युलर राजकारणाला मजबूती द्यायला हवी !
सन 2009 ते 2014, ते 2024 म्हणजे विद्यमान लोकसभा या 20 वर्षांच्या काळात पुरोगामीत्वाचा टेम्बा मिरवणाऱ्या महाराष्ट्रातून एक ही मुस्लिम सदस्य लोकसभेवर निवडून गेला नाही. महाराष्ट्रात मुस्लिम समाज एकूण लोकसंख्येच्या 12 ते 13 % टक्के असताना 288 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या 30 ते 32 असायला हवी, पण गेल्या 20 वर्षात म्हणजे विधानसभेच्या 4 कार्यकाळात ती 10 चा आकडा पार करू शकली नाही. संघ, भाजप व मोदींचा ज्वर हा दहा वर्षांपूर्वी आलेला आहे. हिंदू – मुस्लिम राजकारण तेव्हापासूनच आल्याचे दिसत आहे. मग त्या अगोदरच्या लोकसभा व विधानसभेतील मुस्लिम समाजाच्या या दारुण अवस्थेला जबाबदार कोण ? हा प्रश्न महत्वाचा नाही का ? याचे उत्तर काँग्रेसला मागायचे की, संघ, भाजप व मोदीसारख्या फॅसिस्ट शक्तींना मागायचे ? हे ठरविण्याची वेळ आली आहे की नाही ? याचा ही विचार करावा लागेल की नाही ? की जे काही चालले आहे, ते असेच चालू द्यायचे ? इतके सारे प्रश्न राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला मविआमधील 3 ही प्रमुख घटक पक्षांनी डावलल्यामुळे आज सहजपणे उभा राहतात.
स्वातंत्र्यानंतर मुस्लिम समाजाचा राजकारणातील सहभाग हा आश्रिता सारखा झालेला आहे. त्याने फक्त एकगठ्ठा मतं द्यायची अन प्रस्थापित राजकीय पक्षांना सत्तेच्या चाव्या द्यायचा व स्वतः या सत्तेच्या परिघा बाहेर जायचे, इतकेच काम संसदीय राजकीय व्यवस्थेत या समाजाचे राहिले आहे. पण स्वातंत्र्य पूर्व काळात ही अवस्था मुस्लिमांची नव्हती. 1937 ते 1957 पर्यंत मुस्लिमांचे नेतृत्व आश्रित नव्हते. त्यांना कुणाकडे सत्तेत सहभागी करून घ्या म्हणायची गरज नव्हती. सत्तेवर आपल्या हिंमतीवर जायची शक्ती त्यांच्याजवळ होती. या काळातील मुबंई राज्याच्या सत्तेवरून नजर टाकली तर सहज लक्षात येते. मग ही आजची अवस्था त्यांची कुणी केली ? प्रश्न पाठ सोडायलाच तयार नाहीत
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही इंडिया आघाडी/ महाविकास आघाडीतील तीन पैकी एका ही पक्षाने उमेदवारी दिली नाही. मात्र याबाबत कुठलीच खंत व नाराजी व्यक्त न करता संविधान, देश विरोधी व महाराष्ट्र द्रोही भाजपची विजयी घोडदौड रोखण्याचे काम राज्यातील मुस्लिम समाजाने केले. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी भाजपला पूर्ण बहुमतापर्यंत पोहचू दिले नाही. मुस्लिम समाजाने इंडिया आघाडीला / मविआला दिलेल्या एकगठ्ठा मतांमुळे हे शक्य झालेले आहे. हे भाजपसारख्या फॅसिस्ट शक्तीला माहित असल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने यावेळी ही एक ही मुस्लिम उमेदवार दिला नाही. हे आपण समजू शकतो. पण 280 पेक्षा जास्त जागा लढविणाऱ्या मविआने ही मुस्लिम समाजाच्या तोंडाला पानेच पुसण्याचे काम केले आहे. राज्यात मुस्लिमांची संख्या 12 ते 13 % टक्क्याच्या आसपास असल्याने या समाजाला मविआने किमान 30 ते 32 जागा द्यायला हव्या होत्या. पण तसे झालेले नाही.
लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी देण्याचा अजेंडा घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी देशभर फिरत आहेत. मात्र आपल्या पक्षात ते हा अजेंडा राबवित नाहीत. काँग्रेसचे हेच सेक्युलर चरित्र असून राहुल गांधी ही त्यास अपवाद नाहीत. मुस्लिमांना दुय्यम दर्जाची वागणूक देणे हा संघ व भाजप या फॅसिस्ट शक्तीचा अजेंडा असला तरी त्याची अंमलबजावणी 1985 साली राजीव गांधी यांनी वादग्रस्त रामजन्मभूमी – बाबरी मशीदीचे टाळे तोडून तेथे रामलल्लाला विराजमान केल्यापासून झालेली आहे. अन त्यानंतरच संसदीय राजकारणातील मुस्लिमांचा टक्का कमी कमी होत गेलेला दिसत आहे. राजीव गांधी यांनी केलेल्या ऐतिहासिक चुकीची परिमार्जन करण्याची संधी राहुल गांधी यांच्याकडे चालून आलेली आहे. ती त्यांनी गमावू नये. पण तसे होताना ही दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एक ही मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून अरिफ नसीम खानने नाराजी व्यक्त केली होती. मात्र विधानसभेत ही योग्य प्रतिनिधीत्व मिळाले नाही. यावर ते काहीच बोलले नाहीत.स्वतःला उमेदवारी मिळाली की, समाज गेला तेल लावत, अशीच भुमिका या मुस्लिम नेत्यांची राहिली आहे. काँग्रेस 100 च्या आसपास जागा लढवित असल्याने खरे तर 12 ते 13 जागा मुस्लिमांना मिळायला हव्या होत्या. पण मिळाल्या 7 ते 8. राष्ट्रवादी शरद पवार गट 87 जागा लढवित असून या जाणता राजाने फक्त 2, तर 95 जागा लढविणाऱ्या उद्धव ठाकरे सेनेने फक्त 1 जागा दिली. राज्यातील डावे,समाजवादी व आंबेडकरवादी विचारांच्या पक्षांना गंडवित 280 पेक्षा जास्त जागा लढविणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या उबाठाने मुस्लिम समाजाच्या तोंडाला ही पाने पुसली आहेत.
विदर्भात एकूण ११ जिल्हे असून विधानसभेच्या 62 जागा आहेत. यातील अनेक मतदारसंघात मुस्लिमांची मते निर्णायक आहेत. लोकसभा निवडणुकीत याच मतदारांनी काँग्रेसला हात दिला. पण द्यायची वेळ आली तेव्हा काँग्रेसने या 62 पैकी एक जागा देवून मुस्लिमांनाची बोळवण केली. मराठवाड्यात 8 जिल्हे असून उस्मानाबाद, बीड,औरंगाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यात ही मुस्लिम मतदार निर्णायक ठरणारा आहे. पण केवळ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य 47 मतदारसंघातून एक ही उमेदवार काँग्रेसच काय मविआमधील घटक पक्षांनी दिला नाही. तीच अवस्था उत्तर महाराष्ट्राची आहे. या विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर जिह्याची अशीच परिस्थिती आहे. नाशिक जिह्यातील मालेगाव मतदारसंघात काँग्रेसने एजाज बेग यांना तिकीट दिले आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमधील आष्टी येथून मेहबूब शेख यांना तिकीट दिले आहे. उबाठाने मुंबईतील वर्सावा वगळता राज्यातील कुठल्याही मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. म्हणजे काँग्रेसने 3 व राष्ट्रवादीने 1 उमेदवार दिला आहे. या 4 उमेदवारांचा पराभव झाला तर मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात औषधला ही मुस्लिम उमेदवार सापडणार नाही. हे येणाऱ्या विधानसभेतील चित्र असेल. अन ते पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे असेल.
काँग्रेस पक्षाने मुंबई अन परिसरातून मीरा भाईदर, मालाड – मालवणी, चांदिवली, मुंबादेवी अन बांद्रा वेस्ट या पाच मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिले आहेत, तर शरद पवार यांनी अनुशक्ती नगर येथून आयाराम, गयाराम असा उमेदवार दिला आहे. बाकी कोकण विभागातील रायगड, पालघर, रत्नागिरी अन सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून एक ही मुस्लिम उमेदवार दिला नाही. मात्र या समाजाची मतं काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व उद्धव सेनेच्या उबाठाला हवे आहेत.
भाजपच्या नेतृत्वाखालील युतीने तर केवळ 6 च मुस्लिम उमेदवार दिले आहेत. 146 ते 150 जागा लढविणाऱ्या भाजपने एक ही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. मात्र 80 ते 82 जागा लढविणाऱ्या शिंदे सेनेने 1 व 50 ते 52 जागा लढविणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 4 ते 5 उमेदवार दिले आहेत. 288 जागा लढविणाऱ्या युतीने फक्त 6 उमेदवार दिले आहेत. हे चित्र अतिशय लाजिरवाणे असल्याने अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या नवाब मलिक यांच्यासह अन्य मुस्लिम नेत्यांना याची लाज वाटायला हवी. शिंदेसोबत एक अब्दुल सत्तार आहे. त्यांना ही लाज वाटायला हवी होती. युतीतील मोठा भाऊ म्हणून जो भाजप मुस्लिम समाजाचा इतका द्वेष करतो, त्या भाजपला साथ देताना अजित पवारसोबत असलेल्या नेत्यांनी लाज, शरम विकून खाल्ली आहे, असे वाटते. बाकी लाचारांना आपल्या पुरते पडलेले असते समाजाचे काही सोयरसुतक नसते…हेच खरे.!
………………………… ……………
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares