• 31
  • 2 minutes read

राहुल गांधी समज-गैरसमज

राहुल गांधी समज-गैरसमज

राहुल गांधी यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या बद्दलचे काही समज गैरसमज संदर्भा सहित पाहूया..
लहानपणापासून राहुल गांधी यांच्याबद्दल पप्पू वगैरे ऐकत होतो.कधी कधी मीही त्यांची चेष्टा उडवत असे .अजूनही सतत सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणारे साहित्य फिरत असते. विरोधक म्हणतात कि राहुल काही महत्वाचे नाहीत पप्पू आहे वगैरे . तर मग का सतत त्यांच्याबद्दल ते बोलत असतात ?त्यांच्या प्रत्येक भाषणाची मोडतोड करून अर्धवट साहित्य का पसरवले जाते ?असो गैरसमज आणि सत्य पाहूया

१. राहुल गांधी यांचा “इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा” हे विधान –
राहुल गांधी कसे चुकीचे वक्तव्य करतात हे दाखवण्यासाठी सतत त्यांचे हे विधान असलेला व्हिडिओ फिरवला जातो. पण तो व्हिडिओ अर्धवट असून पूर्ण व्हिडिओ वेगळा आहे . राहुल गांधी त्यात म्हटले आहेत की , “आलू के किसानों को कहा कि ऐसी मशीन लगाउंगा कि इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा. इस साइड से आलू डालो, उस साइड से सोना निकालो. इतना पैसा बनेगा कि आपको पता नहीं होगा कि क्या करना है पैसे का. ये मेरे शब्द नहीं है, नरेंद्र मोदी जी के शब्द हैं.” ” यातुन ” “ये मेरे शब्द नहीं है, नरेंद्र मोदी जी के शब्द हैं” हे वाक्य काढून टाकले आहेत आणि अर्धवट व्हिडिओ सगळीकडे फॉरवर्ड केला जात आहे.

2. राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी नसून फिरोज खान आहेत का ? अणि त्यामुळे राहुल मुस्लिम आहेत का ?-
राहुल गांधी यांच्या आजोबांचे म्हणजे इंदिराजी गांधी यांच्या पतीचे नाव फिरोज गांधी होते आणि ते पारसी होते. पारसी धर्मातील नियमा प्रमाणे तुम्ही आंतरधर्मीय लग्न केले तरी तुमची पत्नी किंवा मुले त्या धर्माची होत नाहीत त्यांचा मुळ धर्म कायम राहतो त्यामुळे इंदिरा गांधी यांचा पित्याचा धर्म जो हिंदू होता तोच त्यांच्या मुलांना मिळाला. पारसी धर्माची लोकसंख्या सर्वाधिक कमी होण्याचे कारण पण हे एक आहे. भाजपा चे लोक राहुल गांधी बद्दल असे खोटे नाटे पसरवतात पण त्यांचेच चुलत भाऊ वरुण संजय गांधी हे भाजपा मध्ये असून त्यांच्यावर मात्र कधी अशी टीका होत नाही. विरोधाभास पण बघा . मुस्लिम लीगचे नेते जिन्ना हे नेहरूंना हिंदू धार्जिणा आणि काँग्रेसला हिंदूंचा पक्ष म्हणत विरोध करायचे आणि ब्रिटिशांना समर्थन करण्यासाठी जिन्ना यांच्यासोबाबत युती मात्र सावरकर आणि मुखर्जीच्या हिंदू महासभेने केली होती.

3. राहुल गांधी यांचे अविवाहित असणे म्हणजे ते चरीत्रहीन असणे-
विवाहित किंवा अविवाहित असणे ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक चॉईस असते पण म्हणून त्यांचे चरित्रहनन करणे योग्य नाही. भाजपा मध्ये ही असे अनेक नेते अविवाहित आहेत किंवा होते. जसे की अटल बिहारी वाजपेयी आणि अनेक जण. अटल बिहारी वाजपेयी यांनीही ‘मी अविवाहित आहे पण ब्रम्हचारी नाही’ असे एका मुलाखतीत सांगितले आहे. नरेंद्र मोदी यांनीही स्वतः लग्न केले पण घटस्फोट न देता पत्नीला सोडून दिले शिवाय स्वतः विवाहित असून मुख्यमंत्री असण्याच्या वेळी ते लपवून ठेवले होते. पंतप्रधान होताना ते disclose झाले. राहुल गांधी असे खोटे बोलणारे तर नाहीत.

4. राहुल गांधी यांचे शिक्षण –
राहुल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी राहुल गांधी यांना डेहरादून येथील दून स्कूलमध्ये पाठवण्यात आले. 1984 मध्ये झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षेच्या कारणामुळे राहुल आणि प्रियांका यांना घरात राहूनच शिकावे लागले. हार्वर्ड विद्यापीठात जाण्यापूर्वी राहुल यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये पदवीपूर्व शिक्षणाची सुरुवात केली. त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षा धोक्यांमुळे राहुल यांची फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये बदली झाली. त्यांनी १९९४ मध्ये पदवी प्राप्त केली आणि पुढच्या वर्षी केंब्रिजमधून एम.फिल. मिळवली . त्यांच्याकडे कुठलीही खोटी पदवी नाही त्यांच्यासोबत शिकलेले वर्गमित्र आजही उपलब्ध आहेत . अमेरिका , इंग्लंड आणि विविध देशातील नामांकित संस्थांनी राहुल गांधी यांची भाषणे तेथे आयोजित केली असून तेथे संबोधित करताना राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्या सारख्या teleprompter बघून वाचण्याची गरज पडली नाही.

5. राहुल गांधी आणि महात्मा गांधी यांचे रक्ताचे नाते ?-
राहुल गांधी आणि महात्मा गांधी यांचे रक्ताचे नाते नाही हे सत्यच आहे पण विचारांचे नाते मात्र आहे. राहुल गांधी महात्मा गांधींच्या सत्य , अहिंसा , प्रेम या तत्वांच्या वर आजही चालत आहेत. त्याबद्दल काही उदाहरणे पाहू. त्यांचे वडील राजीव गांधी यांचा ज्यांनी खून केला. तिला भेटण्यास प्रियांका गांधी गेल्या होत्या ज्यात ती गर्भवती असल्याचे समजले. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांची शिक्षा माफ व्हावी आणि त्या गुन्हेगार असल्या तरी त्यांच्या बाळाला आई वडील दोघांचे प्रेम मिळावे म्हणून कोर्टात अर्ज केला आणि तिची सुटका केली.आपल्या पित्याचा जो कोणी साधा सुधा मनुष्य नसून एक मोठा नेता आहे त्याचा खून करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बदला न घेता माफ करणे आणि त्याच्या मुलांचा विचार करणे ही गांधीविचारांचीच शिकवण आहे. त्यामुळे रक्ताचे नसले तरी राहुल गांधी हे महात्मा गांधीजींच्या विचारांचे वारसदार नक्कीच आहेत.

6. राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी यांच्याबद्दल अपशब्द –
राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या बद्दल भाजपा , मोदी आणि पक्षाच्या विविध नेत्यांच्या कडून सतत अपशब्द वापरले जातात जसे की बारबाला, काँग्रेसची विधवा आणि असे विविध शब्द पातळी सोडून वापरले जातात . आपल्याकडे एखादी सून जेव्हा एखाद्या घराची सून होते तेव्हा ती त्या घरची लक्ष्मी होते आणि ते घर तिचे होते. कमला हॅरिस आणि अनेक भारतीय महिला ज्या दुसऱ्या कुठल्या परदेशी वंशाच्या घरी सून म्ह्णून गेल्या आणि तिथे त्यांना मोठे पद मिळाले तर आपण अभिमानाने त्यांचे कौतुक करतो पण तेच इतर देशाची एखादी मुलगी आपल्या घरी सून म्हणून आली आणि आपली झाली तर तिच्याबद्दल असा भेदभाव का ? त्या देशांनी जर आपल्या नागरिकांच्या सोबत असा व्यवहार केला तर आपल्याला कसे वाटेल ? राहुल गांधी यांनी स्वतः मोदींना किंवा त्यांच्या आई किंवा पत्नीला कधीही मोदींसारख्या गलिच्छ भाषेत संबोधले नाही .
आपल्या सासूचा आणि नवऱ्याचा मृत्यू बघितलेल्या सोनियांना राजकारणात यायची बिलकुल इच्छा नव्हती, पण तरीही देशात वाढता हिंसाचार आणि द्वेष पाहता लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांना यावे लागले.पण त्यांना ज्या प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल केलं जातं त्यामुळे त्याबद्दल एका पत्रात त्यांनी त्या प्रश्नाचे दिलेले उत्तर

सरकारे येतात जातात. तुम्हाला वाटतं का, आता या हरण्या-जिंकण्याचा माझ्यावर काही परिणाम होत असेल? तुमच्या शिव्या विदेशी म्हणून मारलेले टोमणे, बारबाला, जर्शी गाय, विधवा, स्मगलर, गुप्तहेर….या सगळ्याचे मला दुःख होतं? एखाद्या टीव्ही चैनल वर दिल्या जाणाऱ्या शिव्यांनी मला दुःख होतं?? ट्विटरवर आणि फेसबुकवर चालवल्या जाणाऱ्या घाणेरड्या ट्रेण्डवर मला दुःख होतं?? नाही हो मला दुःख होत नाही.परंतू या लोकांवर कीव जरूर येते!!

लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रेम केलं होतं.त्याचा मृतदेह पाहून दुःख होते पण त्यानंतर दुःख नाही होत. मन दगडाचे होऊन जाते. तूम्हाला माझ्यावर राग असेल माझा तिरस्कार करत असाल तर करा.मी आजच निघून जाईल, फक्त माझा राजीव मला परत द्या आणी जरका तुम्ही माझ्या राजीवला परत देऊ शकत नसाल तर मला शांतपणे राजीवच्या आजूबाजुला ह्याच मातीत मिसळून जाऊ द्या.या देशाच्या सुनेला एवढा हक्क तर मिळाला पाहिजे ना!

७.राहुल गांधी यांना राजकारणातले कळत नाही का ? किंवा ते चांगले नेते बनू शकत नाही का ? –
हाही एक चुकीचा आरोप त्यांच्यावर केला जातो . राजकारणाबद्दल कळले नसते तर २००४ मध्ये त्यांनी जेव्हा पहिली निवडणूक अमेठी मधून लढवली तेव्हा सर्वाधिक मतांनी निवडून आले नसते. त्यांनी विचारलेले कुठलेही प्रश्न विरोधकांना घाबरवून सोडतात त्यामुळे ते महत्वाचे नाही- नाही म्हणत ही प्रत्येक विरोधकाला त्यांच्या वक्तव्याची दाखल घ्यावीच लागते. राहुल हे युवा काँग्रेसचे अध्यक्ष असताना युवा काँग्रेसचे सदस्य २लाख हून २.५ दशलक्ष इतके वाढले होते . नुकतीच कर्नाटक मध्ये जी निवडणूक काँग्रेस ने जिंकली त्यात ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे मोठे योगदान होते. अश्या अनेक गोष्टी राजकीय कौशल्याबद्दल सांगता येतील .

८ त्याग –
आपल्या पणजोबा पासून त्यांच्या घरात जी त्यागाची आणि संघर्षांची परंपरा आहे ती राहुल गांधी यांनी कायम ठेवली आहे . मोतीलाल नेहरू हे देशातील खूप मोठे आणि श्रीमंत वकील होते पण गांधी विचारातून प्रभावित होऊन त्यांनी आपल्या मेहनतीने उभारलेले मोठे 42 खोल्यांचे भव्य असे स्वराज भवन 1920 मध्ये देशाला स्वातंत्र्य लढ्यासाठी दान केले. देश स्वतंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरू यांची एकूण संपत्ती आनंद भवन सोडून 200 कोटी रुपये एवढी होती, त्यातील 98% म्हणजे 196 कोटी रुपये त्यांनी देशासाठी दान केले आणि स्वतः कडे फक्त 4 कोटी ठेवले. इंदिरा गांधी यांनी 1970 मध्ये भव्य असलेले आनंद भवन, त्यातील मौल्यवान वस्तू, दुर्मिळ फर्निचर हे सगळे एक ट्रस्ट बनवून देशाला दान केले. आत्ताच्या पिढीने ही वारसा सुरु ठेवला आहे. आत्ताच राहुल गांधी यांचे खासदारपद रद्द करून त्यांना त्यांच्या निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले पण त्यांनी त्यावर कुठला तमाशा केला नाही .

सरदार पटेल यांनी याबद्दल नेहरू घराण्याचे कौतुक केले होते पटेल म्हणतात – भारत के स्वतंत्रता संग्राम में किसी भी व्यक्ति ने नेहरू से अधिक बलिदान नहीं दिया है और भारतीय स्वतंत्रता के लिए नेहरू के परिवार के रूप में किसी भी परिवार ने सबसे ज्यादा कष्ट नहीं उठाया है.
उन्होंने आगे लिखा था – मोतीलाल नेहरू ने अपनी आजीविका छोड़ दी, अपनी शानदार हवेली को स्वतंत्रता आंदोलन के सिपाहियों को सौंप दिया. और खुद एक छोटे से घर में चले गए.

९. हिम्मत आणि धैर्य –
राहुल गांधी १४ वर्षाचे असताना त्यांची लाड करणारी आज्जी इंदिरा गांधी यांचा गोळ्या घालून खून झाला. ते २१ वर्षाचे असताना वडील राजीव गांधी यांना बॉम्ब ने उडवले गेले .आईला सतत बारबाला , विधवा आणि उलटे सुलटे बोलले जाते .सतत वेगवेगळे जाती धर्म इ. लावून शिव्या दिल्या जातात . एखाद्याने हे सगळे पाहून राजकारणातून निवृत्ती घेऊन ऐषोरामात जीवन जगले असते . पण देश एकसंध करण्यासाठी , देशातील प्रेम वाढवण्यासाठी ते आजही लढत आहेत त्या हिम्मत आणि धैर्याला दाद द्यावी तेवढी कमी आहे .

१०. द्वेष विरुद्ध प्रेम . बदला नाही बदल, हिंसा नाही अहिंसा –
समोरचा विरोधक सतत द्वेष पसरवत असताना , सुडाची भाषा करत असताना राहुल गांधी कधीही मला भाजपमुक्त भारत करायचा आहे किंवा इतर काही खालच्या पातळीवरची टीका करत नाहीत . महात्मा गांधींच्या विचारांतून आलेला सुसंस्कृतपणा त्यांनी आजही तसाच टिकवून ठेवला आहे.

११. फिटनेस –
राहुल हे स्वतः एक खेळाडू असून त्यांनी जपान मार्शल आर्ट अकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवले आहे. राहुल गांधी नेमबाजही आहेत. त्यानी स्पोर्ट्स कोट्यातून सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी कधीही मला ५६ इंची छाती असल्याचा किंवा मी बलवान असल्याचा दावा केला नाही पण मच्छिमार जेव्हा पाण्यात जाळं फेकण्यासाठी जात होते तेव्हा राहुल गांधी यांना राहवलं नाही. त्यांनीही सोबतच उडी मारली समुद्राच्या पाण्यात पोहून बाहेर आल्यावर राहुल गांधींचे फोटो व्हायरल झाले ज्यात राहुल गांधींचे पॅक अब्स दिसत आहेत .

१२. निर्भयता –
त्यांचे विरोधक स्वतः ला शूरवीर , निर्भय असल्याच्या बाता मारतात पण मला कोणतरी मारण्याचा प्रयत्न करेल या भीतीने स्वतःकडे देशातील सर्वोच्च सुरक्षा असूनही मागे पाल काढतात . पत्रकारांच्या प्रश्नाच्या भीतीमुळे आत्तापर्यत एकही पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत नरेंद्र मोदी यांची झाली नाही . तेच राहुल गांधी यांनी सत्तेत असताना आणि नसताना ही अनेक पत्रकार परिषद घेतल्या आणि प्रश्नांना निडरपणे सामोरे गेले . भारत जोडो यात्रेत ही ते निर्भयपणे वावरताना दिसत होते .

१३. राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांचे नागरिकत्व –
सोनिया गांधी या जेव्हा राजीव गांधी यांची पत्नी आणि इंदिरा गांधी यांची सून बनून भारतात आल्या तेव्हाच त्या भारतीय नागरिक झाल्या . राजीव गांधी यांची दोन्ही मुले राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे हे भारतीय नाहीत हे म्हणणेच मोठा विनोद आहे.

१४. पंतप्रधान ला पर्याय ?
जर्मनी राष्ट्राला हिटलरशिवाय दुसरा कुठलाच पर्यायच नाही असे पसरवले जायचे तीच थेरी मोदीभक्तांकडून भारतात पसरवली जाते . अशी थेअरी पसरवत हिटलर सोबत पूर्ण जर्मनी राष्ट्र उध्वस्त झाले. आज त्या जर्मनीत त्याचे नावही घेतले जात नाही . नेहरूंचे निधन झाले तेव्हा भारतालाच नव्हे तर जगाला प्रश्न पडला होता कि भारताचे काय होणार ? पण लाल बहादूर शास्त्री आले त्यांनी सक्षमपणे देश पुढे नेला त्यांचे अचानक निधन झाल्यावर इंदिरा गांधी आल्या तर त्यांना गुंगी गुडिया म्हटले जाऊ लागले पण त्यांनी ही सक्षम पणे देश पुढे नेला . राजीव गांधी ना ही आल्यावर हा पायलट काय देश चालवणार असे म्हटले गेले पण डिजिटल क्रांती आणि अनेक मोठ्या गोष्टी करून देशाचा विकास केला तेच अटलजी आणि मनमोहन सिंग बद्दल ही सांगता येईल हे सगळे अनपेक्षितपणे झालेले पंतप्रधान होते . त्यामुळे xyz ला पर्याय नाही हे वाक्यच मुळी ढोंगीपणाचे आहे.

आपल्याला राहुल गांधी यांचे भक्त व्हायचे नाही पण एक सच्चा, प्रामाणिक आणि संवेदनशील नेता म्हणून आपण त्यांना साथ दिली तर ते नक्कीच चांगला बदल घडवतील असे वाटते.

असो हे सगळे असले तरी मला राहुल गांधी यांच्या काही गोष्टी आवडत नाहीत . विरोधकांच्याकडे कुठला मोठा महामानव नाही ज्याचे पूर्ण देशात आणि जगात मोठे योगदान आहे त्याचे अनुयायी आहेत तरी ते सावरकर, हेडगेवार , गोळवलकर सारख्या संकुचित विचारांच्या त्यांच्या जुन्या नेत्यांना मोठया प्रमाणात जनमानसात पोहोचवतात .
इकडे महात्मा गांधी यांच्यासारखा एवढा मोठा नेता ज्याला जग मानते असे असताना त्या महामानवाचे विचार प्रसार करण्यासाठी वेगवगेळ्या शाळा , कॉलेजेस आणि स्पर्धा , चित्रपट , प्रबोधनपर व्याख्याने , शिबिरे इ. का घेतली जात नाहीत. मी ११वी -१२वी त असताना आमच्या कॉलेजमध्ये आसाराम बापू कि कुणा एक बाबाचे लोक आले होते त्यांनी सनातन संस्कृती वगैरे ची पुस्तके वाटून आमची त्यावर स्पर्धा घेतली .
स्पर्धा घेण्यापूर्वी त्यांनी आम्हाला पूर्ण dictionary पाठ असलेल्या एका माणसाचा विडिओ दाखवला ज्यात तो सांगायचं कि त्याला या बाबांच्या मुळे कि कशामुळे ही शक्ती मिळाली . ते तर खोटे होते पण महात्मा गांधी तर खरेच जगभर प्रभावी आहेत . आजही देशात आणि जगात त्यांना मानणारे लोक आहेत ज्यांनी त्या त्या क्षेत्रात आणि परिसरात मोठा बदल घडवला आहे .हे झाले तर देश एकसंध व्हायला , देशात प्रेम आणि संवाद वाढायला मदत होईल.

असो आपणही त्यांना साथ देऊया … मानले कि द्वेष , हिंसा यांचा अंधःकार खूप आहे पण एक छोटीशी पणती अंधःकाराला नाहीसे करायला पुरेशी असते .

– संकेत मुनोत

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *