हिंगोली लोकसभा मतदारसंघातून एका उच्चशिक्षित तृतीयपंथीय उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघाच्या अद्याप न सुटलेल्या समस्यांसाठी आपल्याला संसदेत पाठवा असं आवाहन विश्वनाथ फाळेगावकर या तृतीयपंथीय उमेदवाराने केलं.
हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून सोमवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केलं जाईल. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा खासदार होण्यासाठी एका उच्चशिक्षित तृतीयपंथी उमेदवारने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर यामध्येच संशोधनाचं काम करणाऱ्या विश्वनाथ फाळेगावकर या तृतीयपंथी उमेदवाराला हिंगोली लोकसभेचा खासदार व्हायचंय.
हिंगोलीत शिक्षण आणि आरोग्याची सुविधा काहीच नाही, ती सुधारावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संसदेत बोलताना तुम्हाला मराठी, हिंदीसोबत इंग्रजीही आली पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधींना साधं बोलता येत नाही, त्यांना मुद्दे मांडता येत नाहीत असा आरोप त्यांनी केला. खासदारांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले.