• 36
  • 1 minute read

वंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभव का झाला ?

वंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभव का झाला ?

ह्याबद्दल हे माझे आकलन सध्यातरी शेवटचेच. इथून पुढे वंचित आघाडीबद्दल लिहिणार नाही असे मात्र बिलकुल नाही. विधानसभेत वंचित आघाडीची भूमिका काय असेल, लोकसभा निवडणुकीत मिळालेला धडा वंचितने अभ्यासला असेल का ह्याबद्दल मला उत्सुकता आहे. विधानसभा निवडणूक जवळ येताना जशा जशा घटना समोर येत राहतील त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न असेल. परंतु आतापुरते एवढे लिहून वंचित बहुजन आघाडी ह्या विषयापासून रजा घेत आहे.

तर वंचित बहुजन आघाडीचा अतिशय निराशाजनक असा दारूण पराभव का झाला? मला प्रामुख्याने जाणवतात ती कारणे खालीलप्रमाणे. ही सगळी बरोबरच आहेत असा माझा दावा नाही. तरुण बौद्ध मतदार म्हणून माझ्या लोकेशनवरून मला जे आढळले , मला जे पर्सिव्ह झाले ते मी मांडण्याचा इथे प्रयत्न करीत आहे. सगळ्याच बौद्ध मतदारांचे असेच निरीक्षण/आकलन/अनावलोकन असेल असे नाही. परंतु बहुसंख्य मतदारांची ही भूमिका असावी असा माझा केवळ अंदाज आहे.

१. जागावाटपाची बोलणी सुरुवातीपासून अतिशय गोंधळ निर्माण करणारी होती. सत्तावीस जागांवर आमची तयारी आहे असे सांगण्यापासून महाविकास आघाडी आम्हाला कोणत्या जागा सोडणार असे विचारण्यापर्यंत केवळ आणि केवळ गोंधळच निर्माण होईल असे संभ्रमित वातावरण होते. स्वतः वंचित आघाडीने त्यांना कोणत्या आणि किती जागा ठामपणे हव्या आहेत हे ठळकपणे पुढे येऊ दिले नाही. ही स्पष्टता न ठेवल्याने परिणामी परसेप्शनच्या राजकारणात वंचित आघाडी कमकुवत ठरली. प्रकाश आंबेडकर आणि वंचित प्रवक्ते मोदीविरोधात सोबत येण्यापेक्षा निव्वळ घोळ घालण्यास उत्सुक आहेत अशी इमेज निर्माण झाली. बहुधा ती तशी निर्माण करण्यात महाविकास आघाडीला यश आले असेही म्हणता येईल.

२. प्रकाश आंबेडकरांनी दिलेले स्टेटमेंट : “मोदीला हटवायला, भाजपला वाचवायला आम्हाला आरएसएस ने मदत करावी”. ह्या स्टेटमेंट ने वंचितचे अर्ध्याहून अधिक मतदार एका फटक्यात कमी झाल्याचे सहज नाकारता येऊ शकत नाही. प्रकाश आंबेडकरांचे हे स्टेटमेंट वैचारिक बौद्धिक पातळीवर डिकोड करून त्याला डिफेंड करणे हे भल्याभल्यांच्या ताकदीपलिकडे होते. वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी , विचारवंतांनी हे स्टेटमेंट डिफेंड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र ते निव्वळ हास्यास्पद ठरले. रणांगणात मोदी शहा भाजप संघ अजस्र अशी फौज घेऊन उभी असताना, त्याविरोधात ठामपणे शड्डू ठोकून उभे राहणे आवश्यक असताना, कोणताही मुत्सद्दी नेता असे स्टेटमेंट देणार नाही. प्रकाश आंबेडकरांना ही एक चूक प्रचंड भोवली. प्रकाश आंबेडकरांनी मोदीवर टीका केली नाही असे नाही. परंतु त्यांच्या तुलनेत राहुल गांधी, खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे ह्या नेत्यानी केलेली टीका भाजपची झोप उडवणारी होती. मतदाराना भाजपवर सडेतोड टीका करणारी , मोदींच्या दहा वर्षाच्या मनमानी भ्रष्ट दलदलीचा मुद्देसुद समाचार घेणारी आघाडी दिसल्याने मोठा विश्वास मिळाला, मानसिक रिलीफ आणि exhaust मिळाला. प्रकाश आंबेडकर तुलनेने कमी पडले. आरएसएस ने आम्हाला मदत करावी ह्या स्टेटमेंटने स्वतःच चेकमेट झाले.

३. वंचित बहुजन आघाडीकडे प्रकाश आंबेडकर वगळता कोणताही मास अपील असणारा स्टार प्रचारक नाही. एकदिलाने दुसऱ्या फळीतील नेत्यामागे उभी राहणारी फौज नाही. ही वंचितने गेल्या पाच वर्षात कार्यकर्त्यांच्या पातळीवर कोणतेही संघटनात्मक काम उभे केले नाही ह्याचा परिणाम असावा.

४. जरंगे पाटील ह्यांच्या आंदोलनाचा फायदा होईल असे मानून जरांगे पाटलांचा जरांगे पाटलांची स्वतःची तशी मागणी नसताना, इच्छा दिसत नसताना अनुनय करणे प्रकाश आंबेडकरांना महागात पडले. २०१९ साली मोठ्या आशेने जवळ आलेला मायक्रोओबीसी मतदार दुरावला.

५. पराकोटीच्या मुस्लिम अनुनयाचा वंचित बहुजन आघाडीला कोणताही फायदा झाला नाही. ऊर्जा विनाकारण खर्ची पडली. मुस्लिम मतदार ह्यावेळी न भुतो न भविष्यती मविआ मागे उभा असताना प्रतिनिधित्वाच्या नावाखाली कुचकामी मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रकार वंचितला महागात पडला.

६. पाच वर्षे कुठेच न दिसलेले, फिरकलेले, अचानक उगवलेले उमेदवार देणे वंचितला महागात पडले. “केवळ आंबेडकर आडनावावर आम्ही विश्वास ठेवून तुम्ही दिलेल्या उमेदवाराला मत देऊ” अशा धारणेचा बौद्ध समाज नाही. बौद्ध समाज राजकीय दृष्ट्या सर्वाधिक सजग असणारा समाज आहे. मतदारसंघ सातत्याने बांधत रहावे लागतात, निवडून आलात नाही आलात तरीही मतदारसंघ बांधणी चिकाटीने करावी लागते. कार्यकर्त्यांना भरघोस आणि जॉब सैटिस्फैक्शन मिळेल असा ठोस कार्यक्रम द्यावा लागतो. वंचित आघाडी ह्यात कमी पडली. परिणामी फ्रस्ट्रेटिंग वावर असणारे कार्यकर्ते सोशल मीडियावर निर्माण झाले.

७. ह्या मुद्याचा कितीसा फरक पडला असेल हा वादाचा विषय आहे. परंतु निवडणुकी दरम्यान वंचितच्या तात्कालिक भूमिकेबद्दल कोणताही प्रश्न वंचितच्या हितचिंतकांनी, पोटेंशियल मतदारांनी उपस्थित केल्यास वंचित हार्डकोअर समर्थक आणि कार्यकर्ते मुद्देसुद मांडणीपेक्षा गचाळ ट्रोलिंग, हरिभाऊ, गद्दार, वगैरे मर्यादित डिक्शनरी वापरून झटापट करताना दिसले. भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता/हार्डकोअर फॉलोअर सोशल मीडियावर का असेना पण मतदारांवर असे तोंडसुख घेत नाही. मतदान ही सभ्यपणे मागण्याची गोष्ट असते. म्हणून ते मतदान आहे, मतखंडणी नाही. वंचित कार्यकर्त्याना प्रशिक्षण देण्यास कमी पडली हे ठळकपणे दिसून आले. ऑनलाइन वावर असणारा , आधीच संभ्रमित झालेला मतदार अजूनच त्यामुळे दुरावला असण्याची एक शक्यता आहे.

बरेच मुद्दे आहेत, परंतु वरील मुद्दे मला प्रकर्षाने इम्पॅक्ट घडवताना जाणवले. बरेच मुद्दे माझ्याकडून सुटले आहेत ह्याची मला जाणीव आहे. पण जागे आणि वेळे अभावी अजून सविस्तर मांडणी करणे शक्य नाही. वंचित बहुजन आघाडीला माझ्या विधानसभेसाठी शुभेच्छाच आहेत. ह्यावेळीस बहुसंख्य वंचित बौद्ध मतदारांनी जरी वंचित बहुजन आघाडीला सपशेल नाकारले असले तरी ते कायमच महाविकास आघाडीच्या दावणीला बांधलेले असतील असा प्रकार बिलकुल नाही. मात्र पुन्हा उभारी घेण्यास वंचितला तिचे राजकारण, पक्षसंघटना अमूलाग्र बदलन्याची तयारी दाखवावी लागेल, अतोनात कष्ट उपसावे लागतील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला मतदार ओळखावा लागेल..

– मयुर लंकेश्वर

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *