- 138
- 1 minute read
वकिलांवरील प्राणघातक हल्ले म्हणजे लोकशाहीवर घाव – “Advocate Protection Act” त्वरित लागू करण्याची महाराष्ट्रभर वकिलांची एकमुखी मागणी*
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 128
न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या वकिलांचे जीवन असुरक्षित - अॅड.उमाकांत बी.घोडराज
धुळे, दि. ९ (यूबीजी विमर्श-संहिता )
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वकिलांवर वाढत्या प्राणघातक हल्ल्यांनी न्याय व्यवस्थेच्या मूलभूत सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नुकताच नाशिक जिल्ह्यात, दिनांक २ जुलै २०२५ रोजी घडलेला संतापजनक प्रकार, या भयावह वास्तवाला अधोरेखित करतो. नाशिक येथील नामवंत वकील बोराडे साहेबांवर प्राणघातक हल्ला झाला, आणि त्यांनी पूर्ण रक्तबंबाळ अवस्थेत देखील आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, ही घटना आज नाशिकपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे.
याआधी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील महिला वकील ॲड. डी. एस. अंजन यांच्यावर सरपंच व त्याच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या पाईपने अमानुष मारहाण केली, ही घटना वकिलांच्या असुरक्षिततेच्या पातळीचे अत्यंत भयावह चित्र दाखवते.
“वकील हा केवळ एक व्यवसायिक नसून, तो समाजातील वंचितांचे रक्षण करणारा योद्धा आहे. अशा योद्ध्यांवर हल्ला होणे म्हणजे संपूर्ण लोकशाहीवर हल्ला होणे होय,” अशी संतप्त प्रतिक्रिया धुळे जिल्हा वकील संघाचे कार्यकारणी सदस्य अॅड. उमाकांत बी.घोडराज यांनी दिली.
मागील वर्षभरात वकिलांवर झालेल्या हल्ल्यांची यादी केवळ दीर्घ नाही, तर धक्कादायक आणि लज्जास्पद आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे वकील दाम्पत्य अॅड. राजाराम आढाव आणि अॅड. मनीषा आढाव यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हती – ती संपूर्ण महाराष्ट्रातील वकील समुदायाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभ करणारी ठरली. नुकतेच नाशिक येथील रामेश्वर बोराडे तर पंढरपूर येथील एका वकिलावर हल्ला झाला.
अँटॉप हिल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी ॲड.साधना यादव आणि ॲड. हरिकेश शर्मा यांना अमानुष मारहाण करून ॲड. साधना यादव यांच्या पायावर बुटाणे पाय ठेवून मारहाण करून पाय मोडला,तळपायावर पट्ट्याने भयंकर मारहाण केली. ॲड.साधना यादव यांच्या कानाखाली,तोंडावर मारून जखमी केले आहे. त्यांच्या पायात रॉड टाकावा लागला आहे. किल्ला कोर्ट मुंबई या ठिकाणी ॲड. अमित मिश्रा यांच्यावर आरोपीच्या भावाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता.चाळीसगाव येथील न्यायालयातील ॲड.एस.टी खैरनार यांच्यावर वकील रूमच्या बाहेर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला.
मालेगाव जिल्हा वाशिम येथील ॲड. सुदर्शन गायकवाड तसेच त्यांची पत्नी आणि मुलगा यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण,शहादा येथे पोलिसाने सरकारी वकील ॲड.बागुल व यांना पोलीस स्टेशनच्या आवारात जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केले.नवापूर येथे एका जेष्ठ विधिज्ञाच्या घरावर दगडफेक करत मारहाण केली. दहिसर येथे अॅड. सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारींनी भर दिवसा हल्ला केला.
नाशिक येथे महिला ॲड. अलका मोरे यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला,
कल्याण येथील महिला ॲड.पूजा कांबळे यांना बदलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक त्यातून महिला वकिलाने आत्महत्या केलेला प्रयत्न,वर्धा येथील न्यायालयातच न्यायाधीशांसमोर महिला ॲड. योगिता मून यांच्यावर आरोपीने चाकूने हल्ला केला,नाशिक तलाठी कार्यालयात केलेल्या महिला वकील यांना तेथील अधिकाऱ्याकडून असभ्य वर्तणूक आणि अपशब्द बोलून अपमानित केले गेले. सांगोला येथे कोर्ट हॉलमध्ये न्यायालयीन कामकाज सुरू असताना ॲड. सरगर यांना आरोपीकडून बेदम मारहाण करण्यात आली. उस्मानाबाद न्यायालयातून बाहेर पडत असताना ॲड. प्रथमेश मोहिते यांच्यावर आरोपीकडून प्राण घातक हल्ला,तर पुणे काळेवाडी येथील ॲड. शिवशंकर शिंदे यांचे अपहरण करून नांदेड तेलंगणाच्या हद्दीत अर्धवट जाळलेला मृतदेह मिळाला.ॲड. नितीन सातपुते यांच्यावर आरोपीने गाडी आडवून रस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण,सातारा येथील ॲड. राममोहन खारकर यांच्यावर रात्री शाहूनगर चौकात आरोपीकडून प्राण घातक हल्ला केला. बारामती वकील संघटनेचे ॲड. सुहास क्षीरसागर यांना पोलीस स्टेशनचे अधिकारी डीवायएसपी यांच्याकडून मारहाण आणि खोट्या गुन्ह्यत अटक.
पुणे येथील महिला वकीलांची पुणे ग्रामीण डीवायएसपी कडून विनयभंग कारवाई नाही म्हणून मंत्रालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न, विक्रोळी पोलीस स्टेशन मध्ये ॲड. अनिकेत यादव यांना पोलिसांकडून मारहाण आणि बेकायदेशीर डांबून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
अकोट येथे ॲड. अब्दुल जुन्नेद यांना पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडून मारहाण
कल्याण सत्र न्यायालयात सरकारी वकिलावर आरोपीकडून न्यायालयीन कामकाज सुरू असताना हल्ला
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी ॲड. रेखा हिवराळे यांच्यावर न्यायालयीन कामकाज सुरू असताना आरोपीकडून हल्लाकरण्यात आला.बोरिवली येथील ॲड. पृथ्वीराज झाला यांच्यावर कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये एपीआय हेमंत गीते यांची क्रूरपणे मारहाण. नाशिक रोड कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात ॲड. संतोष मंचरे यांच्यावर महिला पोलिसांकडून जीवघेणा हल्ला…
वकिलांना मारहाण करण्याच्या, वकिलांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार होत आहेत.ही भीती न्यायव्यवस्थेला पोखरत आहे! वकिलांना पोलिसांकडून न्यायालयीन परिसरातच अपमानित केलं जातंय, आरोपींकडून कोर्ट हॉलमध्येच प्राणघातक हल्ले होतात, महिला वकिलांवर मानसिक छळ व आत्महत्येचा प्रयत्न होतो – ही केवळ वकिलांची नव्हे, तर न्याय व्यवस्थेचीच हत्या आहे. जिथे वकिलच असुरक्षित असतील, तिथे सामान्य नागरिकांचं काय?
ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा : आता नव्हे तर कधी?
राज्यात वकिलांवर हल्ले, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे, पोलिसांकडून अपमान यामुळे तरुण वकिलांच्या मनात भीती घर करते आहे. आज जर शासनाने “ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा” लागू केला नाही, तर उद्या वकिली व्यवसायात येणाऱ्यांची संख्या घटेल, आणि न्यायसंस्थेचं खंबीर बळ गमावलं जाईल.
राजस्थान राज्याने हा कायदा प्रथम लागू करून इतर राज्यांसमोर आदर्श ठेवला आहे. आता महाराष्ट्र आणि गोवामध्येही हा कायदा तातडीने लागू व्हावा अशी सर्व वकील संघटनांची एकमुखी मागणी आहे.वकील संरक्षण कायदा लागू होईपर्यंत प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून सतत आंदोलन सुरू ठेवले जाईल, असा निर्धार वकिलांकडून व्यक्त केला जात आहे.
“ *Advocate Protection Act” ची तातडीने अंमलबजावणी हवी – वकिलांची ठाम भूमिका*
*मुख्य मागण्या:*
१. “Advocate Protection Act” तातडीने लागू करावा.
२. वकिलांवरील हल्ल्यांना गुन्हा मानून कडक शिक्षा आणि जलदगती न्यायप्रक्रियेची तरतूद करावी.
३. बार कौन्सिलने ठोस भूमिका घेऊन शासन दरबारी वकिलांची बाजू मांडावी
४. कायदा न लागू झाल्यास राज्यभर आंदोलन, रास्तारोको आणि निषेध करण्यात येईल.
संयुक्त राष्ट्रांच्या व्याख्येनुसार वकील हा मानवाधिकार रक्षक आहे. त्याच्यावर हल्ला म्हणजे संपूर्ण लोकशाहीवरील हल्ला.
५.संवेदनशील प्रकरणात काम करणाऱ्या वकिलांसाठी पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे ‘धोका मूल्यांकन’ व्यवस्था असावी. त्यांना पोलिस संरक्षण व तत्काळ मदतीची सुविधा असावी.
६.वकिलांवरील हल्ल्यांचे खटले जलदगतीने चालवण्यासाठी विशेष न्यायालय व तपास यंत्रणा असावी.
७.जिल्हास्तरीय समित्यांद्वारे वकिलांवरील हल्ल्यांची माहिती घेऊन पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणावा.
८.माध्यमांतून वकिलांविषयी जनजागृती, सकारात्मक प्रचार, YouTube/Web Series च्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक.
९. वकील सुरक्षेसाठी न्यायालयीन पायाभूत सुविधा:प्रत्येक न्यायालयात वकील विश्रामगृह, CCTV, ओळख तपासणी यंत्रणा, वकील सुरक्षेसाठी स्वतंत्र निधी असावा.
१०. नवोदित वकिलांसाठी ‘Ethical Mentorship Program’
*सरकारसाठी जळजळीत इशारा*
“एक वकील जेव्हा न्यायासाठी उभा राहतो, तेव्हा तो केवळ पक्षकाराचं प्रतिनिधित्व करत नाही – तो संपूर्ण संविधानाच्या आत्म्याचं रक्षण करत असतो. त्याच्यावरचा प्रत्येक हल्ला, हा लोकशाही व्यवस्थेवरचा हल्लाव आहे – याची जाणीव शासनाला आणि समाजाला करून देणं, ही आता केवळ गरज नाही, तर जबाबदारी आहे.”
वृत्तपत्र,मिडिया,टीव्ही चॅनल, युट्युब,व्हाट्सअप तसेच ऑल इंडिया फेडरेशन ॲडव्होकेट आणि असोसिएशन न्यू दिल्ली चे ॲड.राम प्रकाश जाधव व पदाधिकारी, कल्याण जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रकाश जगताप,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे ॲड.इक्बाल खान,यूबीजी विमर्श-संहिता माध्यम समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.उमाकांत घोडराज व तमाम महाराष्ट्र राज्यातील वकिलांची चळवळ राबविणारे ॲडव्होकेट व संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी व विविध जिल्ह्यातील व तालुक्यातील अध्यक्ष, पदाधिकारी व वकील सदस्य यांच्या माध्यमातून वकिलांचे हे हक्काचे आणि सुरक्षिततेसाठीचे आंदोलन अधिक प्रभावी आणि संघटित होईल,हीच अपेक्षा.
0Shares