• 49
  • 1 minute read

वकील वकिलाचा खून : कायदा शिकवणारेच कायदा मोडतायत?

वकील वकिलाचा खून : कायदा शिकवणारेच कायदा मोडतायत?

कायद्यातून कायदा मोडणं — ही विडंबनाची परिसीमा!

                 बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात घडलेली संतापजनक घटना – एका वकिलाचा त्याच व्यवसायात काम करणाऱ्या इतर वकिलांकडून अपहरण करून खून – केवळ कायद्याच्या व्यवस्थेवरच नव्हे, तर वकील म्हणून आपल्यावर असलेल्या नैतिक जबाबदारीवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
 
         ही केवळ एक ‘गुन्हेगारी बातमी’ नाही, तर समाजाने आणि विशेषतः कायद्याच्या विद्यार्थ्यांनी, वकिलांनी, न्यायप्रेमी नागरिकांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज असलेली प्रबोधनात्मक घटना आहे.
 
         कायद्यातून कायदा मोडणं — ही विडंबनाची परिसीमा!
वकिल हा व्यवसाय म्हणजे केवळ पेशा नव्हे, तर तो लोकशाही व्यवस्थेतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. वकील हा न्यायाच्या प्रवाहातील वाहक असतो – न्यायाधीश व नागरिक यांच्यातला पूल असतो. अशा पूलाचीच जर पायमुळे सडू लागली, तर समाजाचं भवितव्य अधांतरी राहील.
 
         बेळगावमधील घटनेत केवळ वैयक्तिक शत्रुत्व, मालमत्तेचा वाद, आणि मनोमन धगधगणारी सुडाची भावना यांचा कहर दिसतो. पण हे करताना जे वकील शिक्षण, अनुभव आणि कायद्याच्या व्याख्यांची जाण ठेवतात – त्यांनीच जर खून, पुरावा नष्ट करणं, आणि सुपारी देणं असे गुन्हे केले – तर ते ‘वकिली’च्या धर्माशी द्रोह नाही का?
 
       कायद्यातील मूल्यशिक्षणाची वाट हरवली?
आधुनिक कायदा शिक्षणात “नैतिक मूल्ये”, “पेशागत आचारसंहिता” (Professional Ethics), “कायदा व नैतिकता” अशा विषयांना स्थान आहे. मात्र, पुस्तकात शिकवलेलं आणि प्रत्यक्ष आयुष्यात वागलेलं यात अंतर वाढत चाललंय.
 
      पैसा, मालमत्ता, आणि ईगो हे जर कायद्याचं शिक्षण घेतलेल्यांनाच गुन्ह्याच्या मार्गावर नेत असतील, तर हे केवळ त्या व्यक्तीचं अपयश नाही, तर संपूर्ण कायदा व्यवस्थेच्या मूल्यशिक्षणाचं अपयश ठरू शकतं.
 
      वकिलांच्या प्रतिमेवरचा धक्का या घटनेचा परिणाम केवळ आरोपी वकिलांवरच नाही, तर संपूर्ण वकिल समाजावर होतो. जेव्हा सामान्य माणूस ‘वकिल’ म्हणतो तेव्हा त्याच्या मनात संरक्षक, मार्गदर्शक, शिक्षित आणि न्यायासाठी लढणारा असा व्यक्तीभान असतं.
 
          पण अशा गुन्ह्यांमुळे वकिलांचं सामाजिक स्थान, जनविश्वास, व ‘न्यायसंस्थेतील महत्त्व’ याला धक्का पोहोचतो. एकंदरीतच वकिलांबाबत समाजात शंकेची आणि भीतीची भावना तयार होते – जी खूपच घातक आहे.
 
        आत्मपरीक्षणाची गरज – वकील म्हणून आपली भूमिका काय? आज प्रत्येक वकिलाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की –
“मी कायद्याचं रक्षण करतोय की फक्त व्यावसायिक नफा शोधतोय?”
आपण कायद्याचा वापर लोकांसाठी करत आहोत की लोकांवर?
आपला खाजगी राग, प्रतिस्पर्धा, अहंकार – यासाठी आपण कायद्याचा गैरवापर करत आहोत का?
कायद्याचं शिक्षण घेऊन जर आपण गुन्हेगार बनत असू, तर हे शिक्षण फसवं नाही का ठरत?
 
        समाज व कायदा संस्थांची जबाबदारी अशा प्रकरणात कडक शिक्षा होणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून “कायद्याचा शिक्षण घेतलेल्यांनाही माफ नाही” असा संदेश जाईल.
बार कौन्सिल ऑफ इंडिया व वकिल संघटना यांनी याबाबत ठोस भूमिका घेत दोषी वकिलांचे निलंबन करावं.
कायदा महाविद्यालयांनी नैतिक शिक्षणाची उपासना केवळ तात्विक न ठेवता व्यावहारिक दृष्टिकोनातून घडवावी.
 
      ‘वकील वकिलाचा खून करतो’ ही बातमी केवळ एका माणसाच्या मृत्यूची नाही, तर व्यवस्थेच्या नैतिक अधःपतनाची घंटा आहे.
समाजाने कायद्यात विश्वास ठेवण्यासाठी वकिलांनी कायद्याचा आदर्श ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा उद्या न्यायालयात साक्ष देणारा प्रत्येक साक्षीदार, तक्रारदार किंवा पीडित म्हणेल –
“वकिलांनाच जर कायद्यावर विश्वास नसेल, तर आम्हाला का ठेवायचा?”
                 
अ‍ॅड. प्रकाश रा. जगताप
8097236298
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *