महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-१२
डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी संपूर्ण भारतीय आणि पास्च्यात्य तत्वज्ञानाचे सखोल अध्ययन केले होते. या तत्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी बुद्धाचे तत्वज्ञान स्वीकारले होते. तर चल बघूया तथागत बुध्दांच्या तत्वज्ञानाविषयी थोडेसे:
गौतम बुध्दांनी वेदाला विरोध केला. त्यांच्या मते, वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. तसेच, वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात बुध्दांना काही आढळले नाही. वैदिक ऋषींचे सिद्धांत तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या कल्पना होत्या. वैदिक ऋषींनी तत्वज्ञानात जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत, असे बुध्दांचे स्पष्ट मत होते.
वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ, “ब्राम्हणे” होत. ब्राम्हणे, हा वेदाचाच एक भाग होय. ब्राम्हणे या ग्रंथातील तत्वज्ञानानुसार वेद हे पवित्रच नसून, ते अचूक आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. चातुवर्णाची कल्पना वेदात सांगितली आहे. ज्याअर्थी वेद हे वादातीत आहेत, त्याअर्थी समाजरचनेची चातुवर्ण पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती. १. नियम पहिला, समाज चार वर्णात, जसे की, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यात विभागाला जावा. २. दूसरा नियम, या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत. ब्राम्हणांचा दर्जा सर्वात वरचा, तर शूद्राचा सर्वात खालचा असावा. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती. हक्क आणि अधिकार यांचा प्रश्न वर्गावर विषमतेच्या नियमांवर आधारलेला होता. ३. तिसरा नियम, व्यवसायाच्या विभागणी संबंधीचा होता. ४. चौथा नियम, शिक्षणाच्या हक्कासंबंधीचा होता. त्यानुसार शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णानाच दिला होता. शुद्रांना आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता.
वरील प्रकारच्या आमानविय नियमांमुळे बुद्धाने वेद आणि ब्राम्हणे यांच्या तत्वज्ञानाला तीव्र विरोध केला होता. बुध्दांच्या मते, विचार स्वातंत्र्य ही सर्वात महत्वाची बाब आहे. आणि, सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे, अशी बुध्दांची खात्री होती. त्यामुळे, वेद हे अपौरुषेय आहेत, असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे होय.
चातुवर्णाच्या नावाने ब्राम्हणी धर्माने केलेली समाज रचना, बुध्दांना नैसर्गिक वाटली नाही. तिच्यातील वर्गरचणा सक्तीची व जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या हिताकरिता ही समाज रचना तयार केली होती. बुध्दांना मुक्त आणि स्वतंत्र समाज रचना अभिप्रेत होती. कारण, वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून, तो अखंड कलाहाचे कारण होईल, असे बुध्दांना वाटत वाटले.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (३६) या ग्रंथातून)