परिचयोत्तर विवाह या संकल्पनेत तरुणाईने केलेले एक शांत, संयमी व विधायक बंड अनुस्यूत आहे. परंपरा व समाज त्याच्या यशाची नव्हे तर अपयशाची वाट ‘देव पाण्यात घालून’ पाहणार आहेत, हे बरे जाणून असावे !
मूढ परंपरावादी पिढीचा विरोध ‘न्यूट्रल’ करूनच परिचयोत्तर विवाह ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. म्हणून हे विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन परिचयोत्तर विवाह संकल्पनेचा अविभाज्य भाग आहे.
वैवाहिक जोडीदाराविषयीच्या कल्पना या दोन्ही बाजूंनी काही ‘अंतरात्म्याचा आवाज’ वगैरे नसतात. त्या रचित (कन्स्ट्रक्टिव्ह) असतात. मानव समाजाचे पूर्वसंचित व वर्तमानाचे त्यावर ओझे असते. त्या कल्पना अत्यांतिक प्राकृतिक नसण्याचे कारण लग्न ही संस्था नैसर्गिक नाही हेच आहे. आणि हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे.
जोडीदार या कल्पनेचे त्या त्या काळाचे काही ट्रेंड सेट झालेले असतात. सध्यकालीन ट्रेंड हा बहुतांश फिल्मी व जाहिरातींच्या दुनियेने सेट केलेला आहे.
या काळानेच कधी नव्हे तो स्त्रियांना उंबऱ्याबाहेरचा अभूतपूर्व अवकाश (स्पेस) उपलब्ध करून दिला आहे. पुरुष त्यामुळे गोंधळले? आहेत ! हा गोंधळ मानसिक असला तरी कुटुंबातील कामांची परंपरागत श्रमविभागणी व संस्कृती सांभाळण्याच्या कल्पना या थेट अंगावर येणाऱ्या बाबी त्यात आहेत.
मानव ज्ञातीच्या इतिहासातील सामाजिक उत्पादन क्षमतांचा परमोच्च विकास झालेला हा काळ आहे. नजिकच्या तीन दशकातील गतिमानता ही अभूतपूर्व अशीच आहे.
साहजिकच, सुपरवुमन व सुपरमॅन बनण्याचे कम्पल्शन कसे हाताळायचे व त्यातून मूलभूत मानवी संबंध कसे सुरक्षित करायचे, हा पेच जगभर आहे. भारतीय समाजात त्याला जातिव्यवस्थेने आणखी जटील बनविले आहे.
अशावेळी भ्रांत, भासमय जगात मूलभूत मानवी संबंधाची कोवळी, अनाघ्रात अनुभूती ही कुटुंबसंस्था नावाच्या रचितात उभयतांनी कशी जोपासायची. उभयतांच्या सर्जनशील उर्मींचा विकास परस्परांचा आदर राखून कसा साधायचा हे आव्हान पेलणारे एक सशक्त, निरामय मन घडविणे ही समुपदेशनाची संकल्पना आहे.
ती विवाहपूर्व पुरेशी नाही. विवाहोत्तरही सुरुवातीची किमान तीन वर्षे गरजेची का आहे, याचा संक्षिप्त आढावा पुढील लेखात.