- 35
- 1 minute read
व्याख्यानमालाः
व्याख्यानमालाः
मघाशी मी आपणाला सांगत होतो, एकट्या ब्राह्मण समाजात नऊशे पोटजाती महाराष्ट्रात आहेत. ब्राह्मणानंतर मराठे, मराठ्यांच्या शहाण्णवकुळी, त्या शहाण्णव कुळीमध्ये पंचमकुळी, त्या पंचमकुळी पश्चिम महाराष्ट्रात जास्त, राजवंशी मराठे, मराठ्यामध्येही फरक! राजघराण्यामध्ये मराठे, मग दुसरे देशमुख मराठे, मग नंतर पाटील मराठे, मग नंतर अक्करमाशी मराठे ही मराठ्यामध्ये कॅटेगिरी. पण मराठ्यांचे बरे आहे. त्यांच्यामध्ये प्रमोशन आणि डिमोशन आहे. कुणब्याच्या खिशात पैसा खेळू लागला की तो ताबडतोब पाटील होतो. पाटलाकडे आणखी थोडे अतिरिक्त संपत्ती आली की ते देशमुखांशी नाती जोडतात. पण देशमुख काय म्हणतो, की पाटलाची मुलगी आम्ही करतो, पण आमची मुलगी पाटलाला देत नाही. श्रेष्ठत्वाचं आणि कनिष्ठत्वाच वार आमच्या डोक्यात आजही आहे.
चित्तपावन ब्राह्मण म्हणाले आम्ही श्रेष्ठ, आम्ही ईश्वराचे वंशज. मराठे म्हणाले आम्ही राजवंशीय मराठे. माळ्यामध्ये माझ्या एका शिक्षक मित्राच्या घरी मी जेवायला गेलो, तर मी विचारले तुम्ही कोणते माळी, ते म्हणाले आम्ही फुल माळी. फुलामाळी म्हणजे काय? तर ते म्हणाले आम्ही जिरे माळ्यापेक्षा मोठे जिरे माली म्हणजे काय? तर जे जिरे पिकवतात ते जिरे माळी. आम्ही फुल माळी. इतकेच म्हणून ती बाई थांबली नाही तर ती बाई म्हणाली की आम्ही मराठयांच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत. ‘कसं काय?’ आम्ही फुलमाळी आहोत ! आम्ही देवाच्या जवळ आहोत. देवाला काय आवडतं तर फूल आवडतं. देवाला फूल आवडतं म्हणून आम्ही देवाला आवडतो मराठ्यांच्या पेक्षा आम्ही मोठे. भांडणे आहेत. कोण मोठे कोण नाही !
माळ्याला विचारलं तर ते म्हणाले आम्ही तेल्यापेक्षा श्रेष्ठ, तेल्याला विचारलं ‘तुझं काय बाबा’, ते म्हणाले आम्ही कोळ्यापेक्षा श्रेष्ठ, कोळ्याला विचारलं तुझ काय? ते म्हणाले आम्ही चांभारापेक्षा श्रेष्ठ, चांभाराला विचारलं तुमचं काय? ते म्हणाले आम्ही महारापेक्षा श्रेष्ठ ! महाराला विचारलं तुमचं काय ! तर ते म्हणाले मांगापेक्षा श्रेष्ठ आहोत. मांगाला विचारलं तुम्ही ! तर ते म्हणाले, आम्ही उकलवारापेक्षा श्रेष्ठ आहोत. उकलवाराला विचारलं तर ते म्हणाले आम्ही भंग्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आणि भंग्याला विचारल! बापू तुझं काय? तो म्हणाला ‘माझ्या डोक्यावर राष्ट्रीय एकात्मता आहे ! किती स्तरावर, किती पातळ्यावर या समाजाच्या चिरफळ्या झाल्यात.
या समाजाचे तुकडे तुकडे झाले आणि परत या सगळ्या जातीमध्ये सगळ्या पुरुषांची एक जात महाभंयकर, ते स्त्रियांना आपल्यापेक्षा हीन मानतात. आता आमचे दलित मित्र जोरात लिहितात. चांगली गोष्ट आहे. पण दलित स्त्रियांबाबतीत त्यांची भूमिका काय? ती अशीच असली पाहिजे. सवर्णांच्या विरोधामध्ये आम्ही विद्रोही करु पण आमच्या बायकोने आमचं ऐकलं पाहिजे. बाकी इतर सपाटून काम. सपाटून झोप. राष्ट्र मजबूत होते. स्त्री म्हणजे पायाची दासी, स्त्री म्हणजे भोग्य वस्तू आणि इथे जोतिराव फुले स्त्री-पुरुष समानतेचा सिद्धांत मांडतात. स्त्री पुरुषांच्या स्वाभाविक स्वातंत्र्याचा विचार मांडतात. माणसामाणसामधील स्वाभाविक समतेचा विचार मांडतात. माणूस-माणूस एकमूल्य आहे म्हणून मानवी प्रतिष्ठेचा विचार मांडतात.
मी तुम्हाला काल जे बोललो होतो, जोतिराव फुल्यांचा आग्रह भ्रष्ट, टाकाऊ विषमतेच्या पायावर उभ्या असलेल्या समाजव्यवस्थेवर स्थान मिळवायचा नाही. तर नवी व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आणि नवी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे साधन म्हणून सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी सांगीतला. Truth आम्ही त्याला द्ररूथ म्हणतो. मग त्यानी सांगताना शिक्षणाचा अर्थ सांगीतला. ते म्हणाले, शिक्षण म्हणजे काय? आम्हाला अवघड व्याख्येमध्ये शिक्षणाचा अर्थ सांगीतला जातो. बी.एड् कॉलेज मध्ये आमचे जेव्हा शिक्षक शिकतात ते ज्ञानापेक्षा मेथडला फार महत्व देतात. ज्ञान मेलं तरी चालेल. मेथड जिंदाबाद राहिली पाहिजे. पण जोतिराव फुल्यांनी आमच्या बी. एडं कॉलेजेसना न समजलेल्या शिक्षणाचा अर्थ तेव्हा सांगीतला.
जोतिराव फुले असे म्हणाले की “ज्या शिक्षणामुळे माणसाला खरं काय खोटं काय कळतं ते शिक्षण.” “काळ्या शिवारात खपणारी, काळ्या शेतीत काम करणारी आमची लक्ष्मी. काळी माय म्हणजे माझी सरस्वती अशी म्हणणारी. जोतिराव फुल्यांनी शिक्षणासंबंधीची शेतकरी समाजाची दुरावस्था सांगीतली. भाकर, मिरच्यांचा चटणीचा त्याच्यावर लालबुंद गोळा, ती शिळी भाकर खाणारा शेतकरी, सायंकाळी कोरड्यास भाकर खाणारा शेतकरी, गरज पडल्यास मिठाच्या खड्यासोबत भाकर, खाणारा शेतकरी. मित्र हो. ‘शेतक-याच्या आसूड’ मध्ये शेतकरी समाजाचे जे वर्णन जोतिराव फुल्यांनी केलेलं आहे, तो शेतकरी माझ्या गांवात आजही आहे. माझ्या गावाकडे मी जेव्हा बघतो तेव्हा ते मला महारोग्याच्या हातावर पडलेल्या पांढ-या फटक चट्टयासारखं माझं गांव मला भेडसावू लागते.
साभार : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई