• 67
  • 1 minute read

शरद पाटील: सत्यशोधकी प्राच्याविद्यापंडित !

शरद पाटील: सत्यशोधकी प्राच्याविद्यापंडित !

शरद पाटील: सत्यशोधकी प्राच्याविद्यापंडित!
(17 सप्टेंबर 1925 ते 12 एप्रिल 2014)

शरद पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लेख…

शरद पाटील हे महान संस्कृत पंडित होते. केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झालेल्या शरद पाटील यांच्यावर सत्यशोधकी आणि वारकरी विचारांचा प्रभाव होता. पारंपारिक मार्क्सवाद्यांच्या मतभेदाने ते सखोल संस्कृत अध्ययनाकडे वळले. वयाच्या 42 व्या वर्षी बडोद्याला जाऊन त्यांनी संस्कृतवरती प्रभुत्व मिळवले. त्यांनी पाणिनी व्याकरण, वेद, महाकाव्ये, पुराण, उपनिषद, संस्कृत साहित्य मुळापासून वाचले. पाली, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञान त्यांनी अभ्यासले.

शरद पाटील हे केवळ पारंपारिक पुस्तकी संस्कृतपंडित नव्हते, तर इंडोलॉजी, पुरातत्वशास्त्र, स्त्रीवाद, राज्यशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, भाषाशास्त्र, मानवशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांचे व्यासंगी अभ्यासक होते, त्याला मार्क्सवादाची जोड असल्यामुळे ऐतिहासिक भौतिकवाद ते मांडू शकले. ते संशोधनशास्त्र विकसित करू शकले, पण ते पारंपारिक मार्क्सवादी नव्हते. मार्क्स कोठे चुकला, हे ते कॉ. बी. टी. रणदिवे यांना सप्रमाण सांगू शकले. मार्क्सचे चुकलेले गणित निदर्शनास आणून देणारा जगातला पहिला अभ्यासक म्हणजे शरद पाटील होत. ते मार्क्सवादी होते, पण ते मार्क्सचे अंधभक्त नव्हते. भारतीय समस्यांचे उत्तर युरोपिय तत्वज्ञानात नव्हे, तर भारतीय तत्वज्ञानातच त्यांनी शोधले. ते त्यांना प्राचीन स्त्रीसत्ताक व्यवस्था, महावीर, बुद्ध, महायानी तत्वज्ञामध्ये सापडले. यामुळे शरद पाटील हे नवमार्क्सवादी ठरतात. ते पारंपरिक किंवा आंधळे मार्क्सवादी नव्हते. भारतीय परिप्रेक्षात मार्क्सला मर्यादा आहेत, हे ओळखून त्यांनी सांस्कृतिक लढा मांडला. त्यांनी मार्क्सवादाला फुले-आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाची जोड दिली. यालाच ‘माफुआ’ म्हणतात. त्यानंतर त्यांनी मार्क्सला बुद्धाच्या तत्वज्ञानाची जोड दिली. यालाच सौत्रांतीक मार्क्सवाद म्हणतात. भारतीय मार्क्सवादाला पारंपारिक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी नवे तत्वज्ञान आणि सत्यशोधक कम्युनिस्ट हा नवा राजकीय पक्षही दिला.

शरद पाटील यांचा आवाका अँटोनिओ ग्रामचीपेक्षा पुढचा होता. ते प्रतिमाप्रेमात अडकले नाहीत, त्यामुळे ते बुद्ध, शिवाजीमहाराज ते डॉ.आंबेडकर मांडू शकले. त्यांना स्वतःला सर, साहेब म्हटलेले आणि पाया पडलेले बिलकुल आवडत नसे, त्यांनी अहंकाराचा त्याग केल्यामुळे हे घडले. त्यांच्या ज्ञानाचा परिप्रेक्ष जागतिक स्तरावरील होता, पण पाय कायम जमिनीवर होते. त्यांना भेटायला येणाऱ्याशी ते कधीही झोपून बोलले नाहीत, ते अगदी नव्वद वर्षाचे झाले तरी उठून बसायचे आणि नंतर बोलायला सुरूवात करायचे. ते परखड होते, पण त्यांनी वैचारिक विरोधकांचाही कधी अनादर केला नाही. ते कर्मठ नव्हते, त्यामुळेच ते बहुप्रवाही अन्वेषण करू शकले. पण ते आपल्या मतांशी ठाम होते. त्यांना प्रतिवाद आवडायचा, पण तो अभ्यासू, दर्जेदार, सुसंस्कृत आणि निकोप असायला हवा, हे त्यांचे मत होते.

शरद पाटील यांच्या संशोधनाची पद्धत एकप्रवाही नव्हती, तर ती बहुप्रवाही असल्यामुळे ते मूलभूत संशोधन करून दडपला गेलेल्या इतिहासाची उकल करू शकले. ते जाणीवनेणीव अन्वेषण पद्धतीचे जनक आहेत. त्यांनी सिग्मन फ्राईडच्या पुढचा टप्पा गाठला. शरद पाटील हे इंडोलॉजीबरोबर मानसशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांचे अभ्यासक होते. गणिताची मदत घेण्यासाठी त्यांनी कुलगुरू डॉ. नानासाहेब ठाकरे, डॉ. के. बी. पाटील या गणितज्ञाची मदत घेतली. त्यांचा आवाका जागतिक स्तरावरचा असल्यामुळे ते जागतिक तज्ञ ठरतात.

शरद पाटील हे पारंपारिक किंवा पुस्तकी पंडित नव्हते. ते दिवसा आदिवासी, कामगार, शेतकरी, महिला इत्यादींच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे होते आणि रात्री त्यांचा इतिहास लिहिणारे क्रान्तीकारक इंडोलॉजिस्ट होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात ते अग्रभागी होते, त्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. विद्वानांनी भूमिका घ्यायची नसते, रस्त्यावर उतरायचे नसते, या प्रतिमाप्रेमावर त्यांनी हातोडा मारला. धुळे येथील सन 2004 च्या शिवसन्मानाच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले. शुगर, बीपी असताना उन्हात चालून त्यांनी सहभाग घेतला. आपण जागतिक स्तरावरचे असताना लढ्यात रस्त्यावर उतरायचे कसे ? हा स्वार्थी विचार त्यांनी केला नाही. अनेक आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला, पण ते मागे हटले नाहीत. संकटसमयी ते लढणारे होते, रडणारे नव्हते. ते आपल्या जागतिक स्तरावरील पांडित्याला कुरवाळत बसणारे नव्हते, तर भूमिका घेणारे होते. प्रतिमा प्रेमात ते अडकले नाहीत.

शरद पाटील यांना कोणाचेही भक्त झालेले आवडत नव्हते. भक्त झालात तर विचार करायची क्षमता संपते. निःपक्षपाती भूमिका घेताना मर्यादा येतात, त्यामुळे नवनिर्मितीला अडथळा निर्माण होतो, असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळेच त्यांनी मेंडकाची कथा मांडली व बुद्ध कोणी ईश्वरी अवतार नव्हता, तर तोही मानवच होता, हे सिद्ध केले. एखाद्या व्यक्तिप्रेमात अडकलात की तो व्यक्ती चुकला तर त्याच्यामागे फरफटत जावे लागते, त्यामुळे ते स्वतःला सर, साहेब म्हणून घेत नसत. ते स्पष्ट सांगत “मला शरद पाटील किंवा कॉम्रेड(भाऊ)म्हणा”

शरद पाटील त्यांच्या मार्क्सवादी, सौत्रांतीक मार्क्सवादी, अब्राह्मणी, बहुप्रवाही, जाणीवनेणिव दृष्टिकोनामुळे ते निऋती, आंबपाली, शूर्पणखा इत्यादिंचा दडपलेला इतिहास मांडू शकले. जगात सुरुवातीला स्त्रीराज्ये होती. निऋती ही सप्तसिंधु खोऱ्यातील आद्य महाराणी होती, हे त्यांनी “दासशूद्राची गुलामगिरी” या जगप्रसिद्ध ग्रंथात मांडले. हा त्यांचा अभिजात ग्रंथ आहे. याबाबत संस्कृत पंडित डॉ. एम. ए. मेहंदळे यांचेशी त्यांचा डिबेट झाला. मेहंदळे हे महान संस्कृत पंडित व वेदाचे अभ्यासक होते, त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि डेक्कन कॉलेजने डी.लिट. दिलेली आहे. अशा महान विद्वान मेहंदळे यांचेशी शरद पाटील यांचा डिबेट झाला, परंतु त्यांनी त्यांच्याशी वैरभाव ठेवला नाही. डॉ.मेहंदळे यांच्याशी त्यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते. सुसंस्कृत, विद्वान व्यक्तीशी त्यांनी आनंदाने प्रदीर्घ वैचारिक वाद(डिबेट)केले; परंतु दर्जाहीन डिबेटकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही.

आंबपाली ही वेश्या नसून ती वैशालीच्या (बिहार) स्त्रीराज्याची महाराणी होती, हे मांडून शरद पाटील यांनी महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे खंडन केले. शूर्पणखा म्हणजे हाताच्या बोटाच्या सुंदर नखावरती लीलया सूप धरून धान्य पाकडणारी जनस्थान तथा नाशिक म्हणजे गोदावरी खोऱ्याची महाराणी होती, असे शरद पाटील “रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष” या ग्रंथात मांडतात. यासाठी ते अभिजात संदर्भ देतात. महान प्राच्यविद्यापंडित डी. डी. कोसंबी, आर. एस. शर्मा, राहुल सांकृत्यायन, आर. जी. भांडारकर, डॉ. रोमिला थापर जेथे थांबतात तेथून शरद पाटील सुरू होतात. दडपला गेलेल्या इतिहासाची त्यांनी उकल केली. ते म्हणायचे “सत्य लपवता येते, पण संपवता येत नाही, सत्य इतिहास असत्य इतिहासाबरोबर सावलीसारखा सोबत येत असतो.” त्याची उकल त्यांनी बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीने अनेक ज्ञानशाखांच्या आधारे केली. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातील अशक्य काम त्यांनी शक्य करून दाखवले, म्हणूनच शरद पाटील हे जागतिक स्तरावरचे प्राच्यविद्यापंडित ठरतात, पण तशी ओळख सांगायची गरज त्यांना भासली नाही. ते जागतिक स्तरावरील प्राच्यविद्यापंडित असून देखील, त्यांनी त्याचा कधी गर्व केला नाही.

शरद पाटील यांनी अनेक नामवंत पुरस्कार नाकारले. पैसा, प्रसिद्धी, प्रमोशन, प्रतिष्ठा, पुरस्कार याचा हव्यास न धरता त्यांनी हयातभर संशोधन, लेखन आणि प्रबोधन केले. त्यांचे साहित्य सामान्य कार्यकर्त्याला कळते, पण विद्वानांना का समजत नाही, याचे त्यांना आश्चर्य वाटायचे. प्रामाणिकपणे वाचले तर शरद पाटील यांचे साहित्य समजायला खूप सोपे आहे. त्यांचे साहित्य खूप कठीण आहे, हा अपप्रचार आहे, असे ते म्हणत असत.

शरद पाटील यांनी निऋतीचा शोध लावला. त्यांनी तथागत गौतम बुद्धाचे, शिवरायांचे, संभाजीराजांचे क्रान्तीकारक चरित्र लिहिले आहे. संभाजीराजांच्या सल्ल्यावरून शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक केला, इतकी मोठी योग्यता आणि विद्वता संभाजीराजांची होती, हे अन्वेषण शरद पाटील करू शकले.

शरद पाटील यांनी इतिहासपूर्वकाळापासून ते प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिक इतिहासकाळापर्यंतचे विपुल आणि मूलभूत लेखन केलेले आहे. शरद पाटील यांच्या संशोधनाबद्धल नामवंत विचारवंत आणि संतसाहित्याचे महान भाष्यकार डॉ. सदानंद मोरे म्हणतात “गेल्या पाच हजार वर्षांचा बहुजनांच्या ज्ञानाचा बॅकलॉक एकट्या शरद पाटील यांनी भरून काढला. शरद पवार यांनी राजकीय क्षेत्रात, शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेत आणि शरद पाटील यांनी संशोधन क्षेत्रात देदिप्यमान कार्य केले. ते समतावादी समाजरचनेचे पुरस्कर्ते होते.” असे डॉ. मोरे सांगतात.

शरद पाटील यांनी आजन्म खूप अनमोल कार्य केलेले आहे. त्यांनी कोणाचा द्वेष केला नाही. त्यांनी बुद्ध सांगितला आणि ते बुद्ध जगले. वैचारिक मतभेद असणारांशी त्यांनी कधीही वैरभाव ठेवला नाही. त्यांना वैचारिक वाद आवडायचा. त्यांनी डिबेट करणारांचाआदर केला. वैचारिक विरोधकांशीही आकस न ठेवता वैचारिक सुसंवाद ठेवला पाहिजे, अशी प्रगल्भ विचारधारा शरद पाटील यांच्याकडे होती.
त्यांना अतीव ज्ञानाचा गर्व-अहंकार नव्हता.

भारतीय तत्वज्ञानाच्या क्षेत्रात झालेला संघर्ष त्यांनी ‘जातिव्यवस्थाक सामंती सेवक्तव’ या ग्रंथात मांडला. महायान पंथातील अश्वघोष, असंग, वसुबंधू, दिग्नाग, धर्मकीर्ती इत्यादी तत्ववेत्यांनी दिलेला वैचारिक लढा शरद पाटील यांनी प्रस्तुत ग्रंथात मांडला आहे. दिग्नाग, धर्मकिर्ती यांनी निर्माण केलेल्या सौंदर्यशास्त्राचे विस्तृत विवेचन शरद पाटील यांनी केले आहे. भारतात देखील सौंदर्यशास्त्र होते. त्याचा उगम स्त्रीराज्यात होता, हे भारतात प्रथमतः शरद पाटील यांनी मांडले. भारतीय कला, साहित्य आणि तत्वज्ञानाचे सौंदर्यशास्त्र मांडणारा पहिला दार्शनिक म्हणजे शरद पाटील आहेत.

शरद पाटील यांचे मोठेपण जेवढे त्यांच्या विद्वतेत आहे, तेवढेच त्यांच्या रोखठोक भूमिकेत आहे. त्यांनी वेळच्या वेळी भूमिका घेतली. रिडल्स प्रकरणात त्यांनी भूमिका घेऊन डॉ.आंबेडकरांच्या पुष्ट्यर्थ वाल्मिकी रामायणातील पुरावे देऊन विरोधकांना पराभूत केले. त्यांनी नामांतराच्या लढ्यात भूमिका घेतली. जेम्स लेन प्रकरणात त्यांनी भूमिका घेतली. विद्वानांनी संशोधनाबरोबरच रस्त्यावरची लढाई लढायची असते, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला.

शरद पाटील हे एक रोखठोक, निर्भीड, प्रामाणिक, हिम्मतवान फिलॉसॉफर, इंडोलॉजिस्ट होते. त्यांचे साहित्य विचारशील, सृजनशील, निर्भीड, कृतिशील अभ्यासक तयार करते. त्यांचे साहित्य दीपस्तंभासारखे आहे. हे वर्ष (२०२४-२५) हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.त्यांना जन्मशताब्दी दिनानिमित्त विनम्र आदरांजली !

– डॉ.श्रीमंत कोकाटे

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *