- 441
- 1 minute read
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
✍️📘📚📗✍️
मी कोल्हापूर जिल्ह्याचा , हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील मांगाचा पोरगा !
माझ्या गावात मातंग समाजाची दीड-दोनशे घरे आहेत. तर आमच्या गावात मांगांची एक संतुबाई नावाची देवी आहे,तिचं फार मोठं मंदिर आहे.खरेतर ही देवी कर्नाटकातील कागवाडची. *यात्रेच्या दिवशी संतुबाईची पालखी कागवाडला जायची तिथे यात्रा व्हायची,खर्च खूप व्हायचा.
माझे गाव वडगाव मतदारसंघात येते,त्या मतदार संघांचे तत्कालीन आमदार जयवंतराव आवळे हे होते.आमदार आवाळेंनी सामाजासमोर असा प्रस्ताव मांडला कि,कागवाडला कशाला यात्रा करायला जाता ? मीच तुम्हाला दोन -चार बकरं देतो, इथेच यात्रा करा. समाजाला पटलं. *यात्रा गावातच चालू झाली. एक -दोन वर्षे बकरी दिली. पुन्हा आवाळेंनी लक्ष काढून घेतलं. त्यानंतर सगळा खर्च समाजाला करावा लागला.
आमच्या मातंग *समाजामध्ये एक प्रथा अशी आहे कि,कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला कि त्याला शेंडी राखा. *म्हणजे केस कापताना डोक्याचे सगळे केस कापायचे, पण शेंडी म्हणून राखलेल्या केसांना कातर लावायची नाही. मीही माझ्या कुटुंबात जन्मलेला पहिला मुलगा, माझीही शेंडी राखली. इयत्ता ४थी पर्यंत मला शेंडीचे काय वाटले नाही. पण त्यानंतर मला शेंडीचा त्रास होऊ लागला. *लहानपणापासून शेंडी खूप वाढलेली, अभ्यासाला बसलो कि माझे सवंगडी शिवाजी म्हणायचे व शेंडी ओढायचे. अभ्यासात अडथळा आला कि मला राग यायचा मग मी त्याला हातात जे सापडेल ते फेकून मारायचो. त्याला जास्त कळ आली कि ते घरी रडत जायचं. मग त्याचे नातलग माझ्या घरी शिव्या देत यायचे. *त्यावेळी माझी आई मला धरायची, सगळ्या गावाची कळ काढतोस म्हणून मला मारायची. असे सतत सुरु होते.मी एक दिवस आईला म्हणालो , *तुला माझा त्रास होत असेल तर माझी शेंडी काप.त्यावर आई म्हणाली कि,*शेंडी कापणं येवढ सोपं नाही. एक बकरं व सर्व समाजाला जेवण दिल्याशिवाय शेंडी काढायला परवानगी नाही. हे न करता शेंडी काढली तर संतुबाई देवी कोपते.मी आईला म्हणालो, एक का दहा बकरी काप पण शेंडी काप.त्यावर आई म्हणाली, एक बकरं मिळेना म्हणून शेंडी राहिल्या.
कुठलं बकरं ? माझे वडील टी.बी रोगाने बिछान्यावर पडून असायचे,आम्ही दोन भाऊ व तीन बहिणी. एकटी आई कमावती. मांग समाजाचा धंदा फड्याचा.*फड्या पासून वाक,आणि वाका पासून दोरखंड बनवायचा. माझी आई फडे चिरायला जायची.पाच पेंड्या चिरल्या नंतर एक रुपया मिळायचा,माझी आई दिवसा पाच पांचोंदे(पाच पेंड्याचा एक पांचोदा)चिरायची त्याचे काही रुपये मिळायचे. त्यावर आमचं दोन टायमाचं पोट चालायचं.
पण पैसं साठत नव्हतं, त्यामुळं बकरं मिळत नव्हतं. शेंडी मात्र वाढतच होती.त्यावेळी मी इयत्ता सातवीत होतो. मी विचार केला, संतुबाईची शेंडी माझ्या डोक्यात म्हणजे संतुबाई देवी माझ्या डोक्यात ! एवढेच नव्हे तर *घरात अनेक देवांचा देव्हारा असताना आमच्या वाटयाला हे दारिद्र्य,गरिबी का ? असा विचार करत रस्त्याने जाताना मला *रस्त्यावर पडलेलं ब्लेडच अर्ध पान दिसलं. मी ते हळूच उचललं *व एका बाजूला अंधारात जाऊन त्या ब्लेडच्या पानाने हळूच शेंडी उडवली.हा प्रकार आठ दिवसानंतर माझ्या आईच्या लक्षात आला. त्या वेळी आईने घाबरून मला धरला, आत्ता तुझं कसं व्हायचं म्हणून आई मला मारू लागली.वडिलांनी तिच्या तावडीतून मला सोडवलं जवळ घेतलं,अंगावरून प्रेमाने हात फिरवत मला म्हणाले, “तू तिच्या देवाची कळ काढलीयंस, तुला तिने खूप मारलं. तू असं कर , मी तुला इचलकरंजीला इयत्ता आठवीला बोर्डिंगला घालतो. त्या ठिकाणी चांगलं,चांगलं खायला मिळतंय,चांगली,चांगली कपडे मिळत्यात. जा, तिथं जाऊन शिक.” चांगल,चांगलं खायला मिळतंय , हे मला भावलं आणि मी बोर्डिंगला जायला तयार झालो.घरात चांगलं खायला मिळायचं नाही,कुठलं मिळणार ? एकटी आई कमावणार, आई कामावरून येईपर्यंत आम्ही भावंड आईची वाट बघत बसायचो. *संध्याकाळी आई कामावरून आल्यानंतर वेळानं जेवण मिळायचं. कधी कधी पिठ कमी असायचं. अशा वेळी माझी आई कुर्डूची भाजी गरगरीत शिजवायची,*ती भाजी थोडं मीट टाकून पिटात मळायची त्यामुळे चार तिथं आठ भाकऱ्या व्हायच्या. मग आम्ही पोट भरून जेवायचो.
तर वडिलांचं ऐकून मी शेवटी रत्नदीप हायस्कुल,गंगानगर (इचलकरंजी)येथे इ.आठवीला गेलो. जाताना माझी आई खूप रडत होती. तू जाऊ नको म्हणून प्रेमाने जवळ घेत होती. *पण वडिलांनी तिचे काही एक ऐकलं नाही.त्या शाळेच्याच बोर्डिंग मध्ये मी प्रवेश घेतला. शिकलो.
शिकत असताना शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार कळाले. ती प्रेरणा घेऊन मी शिकलो.
आज मी प्राध्यापक म्हणून दीड लाख पगार घेत नोकरीतून निवृत्त झालो.
*आता पन्नास हजार पेन्शन घेतोय. बायको शिक्षिका आहे, मुलगी डॉक्टर तर मुलगा ऍक्टर आहे.css
आई सुखात आहे.बकरं न कापता मी शेंडी उडवल्यामुळे माझं माझ्या कुटुंबाचं काहीही वाईट झालं नाही.
उलट या सांस्कृतिक दहशतीतून व प्रचलीत समाज व्यवस्थेच्या गुलामीतून मी मुक्त झालो.
प्रा.सुकुमार कांबळे,
कोल्हापूर
📚 जय शिक्षण
📓 जय संविधान