• 64
  • 1 minute read

शूट द मेसेंजर

शूट द मेसेंजर

            विपरीत घटना, वाईट बातमी घेऊन येणाऱ्या शिपायाचा शिरच्छेद करण्याचा हुकूम देणाऱ्या राजांच्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात; आधुनिक जगातील महान लोकशाही देशात, अमेरिकेत, देखील असा राजा राज्य करत आहे.

त्या राजाचे नाव आहे डोनाल्ड ट्रम्प.
____

अमेरिकेत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी मागच्या महिन्यात अर्थव्यवस्थेत किती रोजगार तयार झाले याची आकडेवारी “ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स” या शासकीय संस्थेतर्फे नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.

तशी ती जुलै महिन्यासाठी एक ऑगस्टला प्रसिद्ध केली गेली. ती आकडेवारी अमेरिकेन अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती मंदावत असल्याचे दाखवत होती. आधीचे महिने देखील फार रोजगारनिर्मिती नव्हती

अमेरिकन अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था आणण्यासाठी आपण जी धोरणे आखत आहोत, एक मोठे महत्त्वकांक्षी “बिग ब्यूटीफुल बिल” आपण काँग्रेसमधून पास करून घेतले….. मला माहित आहे अर्थव्यवस्था चांगले काम करत आहे. आणि हा कोणता ब्युरो सांगत आहे की रोजगार निर्मिती वाढत नाहीये , आणि कमी होतेय ?

अधिकारी / मंत्र्यांच्या बैठकीत ट्रम्प यांनी विचारले ही आकडेवारी कोण प्रसिद्ध करते? त्यांना संस्थेचे नाव सांगितल्यावर कोण आहे त्या संस्थेचा प्रमुख….?

Erika McEntarfer या आहेत सर!

ट्रम्प यांच्या काही सल्लागारांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपण जे उपाय योजित आहोत त्याची फळे मिळायला अजून एक दोन महिने लागतील. थोडी सबुरी दाखवावी लागेल

तेव्हढ्यात अजून एक सल्लागार ट्रम्प यांच्या कानात पुटपुटला. सर त्या एरिका मॅडम बायडेन यांनी नेमलेल्या आहेत

झाले ! ट्रम्प यांचे पित्त खवळले. ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या कट कारस्थानाचा भाग आहे . तडकाफडकी ट्रम्प यांनी एरिका मॅडमना बडतर्फ करायचा आदेश काढण्याचा हुकूम केला. आणि सही सुद्धा केली.
_________

अमेरिकेत स्थूल अर्थव्यवस्था बाबत आकडेवारी गोळा करण्याचे काम जवळपास ऑटोमेटेड मोड वर नेले गेले आहे. मानवी हस्तक्षेपाला फारसा वाव नाही. हे ट्रम्प सकट सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संस्थेचा प्रमुख आकडेवारी औपचारिकरित्या जाहीर करतो एवढेच.

हा ट्रम्प आणि एरिका यांच्यातील मुद्दा नाहीये ; सिस्टीमचा मुद्दा आहे. आपल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा

ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या प्रमुख पदी जी कोणी नवीन व्यक्ती येईल त्याला ट्रम्प यांना पसंतीस उतरेल अशीच आकडेवारी जाहीर करण्याचे प्रचंड दडपण असेल. ती व्यक्ती पहिल्या दिवसापासून बदनाम झालेला असेल.

तो जी काही आकडेवारी जाहीर करेल ती, कितीही खरी असली तरी, ती शिजवलेलीच असणार असा ग्रह अनेकांच्या मनात तयार होणारच होणार. यामुळे ब्युरो ऑफ लेबल स्टॅटिस्टिक्स या अनेक दशके कार्यरत असणाऱ्या शासकीय संस्थेची विश्वासार्हताच धुळीस मिळणार आहे. पण आधुनिक राजांना त्याची फिकीर नाही.

अजून एक विरोधाभास. या सगळ्यात अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये हवी तशी रोजगार निर्मिती होत नाहीये आणि अमेरिकन अर्थव्यवस्था मंदावण्याची चिन्हे आहेत …. .या सत्यावर सार्वजनिक चर्चाच होत नाहीयेत.

सर्व हुकुमशहा नारसिस्ट असतात. हुकुमशाही प्रवृत्ती ही राजकीय विचारधारा नाही. मानसिक रोग आहे. ते राष्ट्रप्रेम वगैरे बोलतात. पण ते फक्त स्वतःच्या प्रेमात असतात. ट्रम्प बघा ना. त्यांना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा नको आहेत. कोणी आकडेवारी बनवली यावर जीव घेतील ते.

हुकूमशहा टीका करणाऱ्या व्यक्तींवर खुन्नस काढतो हे माहित होते. पण त्याची धोरणे त्याला अपेक्षित परिणाम दाखवत नाहीयेत हे दाखवून देणाऱ्या वस्तुनिष्ठ , नॉन ह्युमन आकडेवारीवर देखील खुन्नस काढतो.
________

ही पोस्ट अमेरिकेबद्दल असली तरी तिचा उद्देश अधिक मूलभूत गोष्टीकडे लक्ष वेधणे हा आहे. लोकशाही प्रणाली जिवंत ठेवण्यासाठी सच्ची आकडेवारी किती महत्वाची असते ? हुकूमशहा सच्या आकडेवारीला का घाबरत असतील? आणि आपल्या स्वतःच्या देशातील शासकीय आकडेवारी गोळा करणाऱ्या संस्था / जाहीर होणारी आकडेवारी याबद्दल वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हा आहे.

संजीव चांदोरकर (६ ऑगस्ट २०२५)

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *