- 15
- 1 minute read
शेतकऱ्यांचा पहिला सेनापती आणि अपूर्ण राहिलेली कृषिक्रांती : डॉ. पंजाबराव देशमुख
शेतकऱ्यांचा पहिला सेनापती आणि अपूर्ण राहिलेली कृषिक्रांती : डॉ. पंजाबराव देशमुख
भारतीय लोकशाहीच्या पहाटेच्या काळात, जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय मुक्तता एवढाच मर्यादित होता, तेव्हा पंजाबराव देशमुख यांनी त्या स्वातंत्र्याला शेतकऱ्यांच्या शेतात, त्यांच्या कष्टात आणि त्यांच्या हक्कांत उतरवण्याचा ध्यास घेतला. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात अनेक मंत्री झाले, अनेक धोरणे आली; मात्र शेतकऱ्याच्या वेदनेला संसदेत नेऊन ती राष्ट्राची चिंता बनवणारा नेता विरळाच. अशा विरळ नेत्यांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाते ते नाव म्हणजे डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख. ते केवळ भारताचे पहिले कृषिमंत्री आणि राजकारणी नव्हते, तर शेतीला अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानणारे दूरदर्शी विचारवंतआणि शेती, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा त्रिवेणी संगम होते. विदर्भातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, सावकारशाहीचा विळखा, शासनाच्या उदासीन धोरणांमुळे पिचलेला शेतकरी, या सगळ्यांना आवाज देणारा एक लढाऊ, निर्भीड आणि अभ्यासू नेता आणि कृषी शिक्षणाचा दीपस्तंभ म्हणजेच पंजाबराव देशमुख.
आज ‘शेती हा उद्योग आहे’ असे म्हणणे सोपे वाटते; मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांत ही भूमिका मांडणे म्हणजे राजकीय धाडस होते. पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्याला दानाचा लाभार्थी नव्हे, तर अर्थव्यवस्थेचा कणा मानले. स्वातंत्र्याच्या पहिल्याच टप्प्यात पंजाबराव देशमुखांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. “शेती हा दयाभावाचा विषय नाही; तर तो राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.” शेतमालाला योग्य दर, हमीभाव, शेतमालाचे संरक्षण, साठवणूक व्यवस्था, कृषी शिक्षण आणि संशोधन आणि बाजारव्यवस्था या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत सातत्याने ठाम आणि अभ्यासपूर्ण मते मांडली व आवाज उठवला. केंद्र सरकारचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी भारतीय शेतीला धोरणात्मक दिशा दिली. त्या काळात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतीकडे दुय्यम नजरेने पाहिले जात असताना, पंजाबरावांनी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवणारी आर्थिक मांडणी केली. आज सरकार शेतकऱ्याला अनुदानाच्या जाळ्यात अडकवून त्याचा स्वाभिमान हिरावून घेत आहेत; पण पंजाबराव देशमुख शेतकऱ्याला अनुदानाचा नव्हे, तर हक्काचा लाभार्थी मानत होते.
आज कृषी अर्थसंकल्प वाढतो आहे, योजना जाहीर होतात; पण शेतकऱ्याच्या हातात काहीच टिकत नाही. बाजारपेठ दलालांच्या ताब्यात आहे, उत्पादन खर्च वाढतो आहे आणि जोखीम संपूर्णपणे शेतकऱ्यावर ढकलली जाते. पंजाबराव देशमुखांनी याच धोक्याची पूर्वसूचना दिली होती. शेतीला बाजाराच्या भरवशावर सोडले, तर शेतकरी उद्ध्वस्त होईल, हे त्यांनी केव्हाच ओळखले होते. आजचे अपयश धोरणे आहेत पण दिशा नाही. केवळ घोषणा नव्हे, तर संस्थात्मक बांधणी ही त्यांची खरी ओळख होती. अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्रे यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण तरुणांना ज्ञानाची शस्त्रे दिली. त्यांची ठाम भूमिका होती, “शेती सुधारायची असेल, तर शेतकऱ्याचा मुलगा शिक्षित झाला पाहिजे.” आज महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची पायाभरणी ज्या विचारांवर झाली, त्यामागे पंजाबराव देशमुखांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसते.
सामाजिक न्यायाचा लढवय्या, विदर्भाचा आक्रोश दिल्लीपर्यंत नेणारा आवाज आणि सत्तेत असूनही सत्तेला प्रश्न विचारणारा नेता पंजाबराव देशमुख हे काँग्रेसचे नेते होते; पण ते कुठल्याही पक्षाचे गुलाम नव्हते. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण समाज यांच्याशी अन्याय होत असेल, तर सत्तेला प्रश्न विचारण्याचे धैर्य त्यांनी कायम राखले. सत्तेतील असमतोल, शेतकऱ्यांवरील अन्याय आणि धोरणात्मक त्रुटींवर त्यांनी स्वतःच्या सरकारलाही जाब विचारला. त्यांचा राजकारणाचा पाया नीती, अभ्यास आणि लोकहित या तीन स्तंभांवर उभा होता. म्हणूनच ते सत्तेत असतानाही जनतेचेच राहिले. आजचे राजकारण पक्षनिष्ठेच्या बेडीत अडकलेले असताना, पंजाबराव देशमुखांचे राजकारण लोकनिष्ठेचे होते. म्हणूनच ते मंत्री असूनही जनतेपासून दुरावले नाहीत.
विदर्भातील कोरडवाहू शेती, सततची नापिकी, सावकारशाही आणि सरकारी उदासीनता या सगळ्यांचे जळजळीत वास्तव पंजाबराव देशमुखांनी जवळून पाहिले होते. त्यामुळेच त्यांचे राजकारण एअरकंडिशन्ड खोल्यांत बसून घडलेले नव्हते, तर मातीशी जोडलेले, शेतकऱ्याच्या घामाने ओले झालेले होते. आज विदर्भ शेतकरी आत्महत्यांचा केंद्रबिंदू ठरतो आहे, हे पाहता प्रश्न पडतो, पंजाबराव देशमुखांचे विचार अंमलात आले असते, तर आज ही दुर्दैवी स्थिती आली असती का? आजचा शेतकरी कर्जबाजारी आहे, शेती अनिश्चित आहे, बाजारव्यवस्था अस्थिर आहे. अशा वेळी पंजाबराव देशमुखांचे विचार केवळ स्मरणात ठेवण्याचे नव्हे, तर धोरणांमध्ये उतरवण्याचे आहेत. शेतकऱ्याला सन्मान, शेतीला शाश्वतता आणि ग्रामीण भागाला समृद्धी हे स्वप्न अजून अपूर्ण आहे. पंजाबराव देशमुख यांचा वारसा म्हणजे केवळ इतिहास नव्हे, तर आजच्या शासनासाठी जबाबदारीची जाणीव हाचा आजच्या धोरणकर्त्यांसाठी आरसा आहे.
पंजाबराव देशमुख हे नाव म्हणजे, शेतीला आणि शेतकऱ्याच्या घामाला प्रतिष्ठा देणारा विचार, शेतीला आणि शेतकऱ्याला स्वाभिमान राष्ट्रउभारणीच्या केंद्रस्थानी ठेवणारी दृष्टी आणि राजकारणाला मूल्यांची नैतिक धार देणारा आदर्श. आज जेव्हा शेतकरी पुन्हा एकदा संकटात आहे व आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, शेती तोट्यात गेली आहे आणि कृषी धोरणे कागदावरच अडकून पडली आहेत, तेव्हा पंजाबराव देशमुखांची आठवण ही केवळ इतिहासाची पाने उलटणे नसून, आजच्या अपयशी व्यवस्थेवर टाकलेला कठोर प्रश्नचिन्ह आहे. पंजाबराव देशमुखांची आठवण ही केवळ श्रद्धांजली नसून, नव्या लढ्याची प्रेरणा ठरली पाहिजे. आजच्या धोरणकर्त्यांनी जर खरोखरच शेतकऱ्याचे भले करायचे असेल, तर पंजाबराव देशमुखांचा अभ्यास करावा लागेल, फक्त इतिहास म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक म्हणून.
पंजाबराव देशमुखांचा वारसा फक्त स्मारकापुरता मर्यादित नको. आज त्यांच्या नावाने विद्यापीठे आहेत, पुतळे आहेत, जयंती-स्मृतिदिन आहेत; पण प्रश्न असा आहे, त्यांचे विचार धोरणांत आहेत का? शेतकऱ्याचा सन्मान, शेतीची शाश्वतता आणि ग्रामीण समृद्धी, हे त्रिसूत्री ध्येय अजूनही अपूर्ण आहे. केवळ श्रद्धांजली देऊन पंजाबराव देशमुखांचा वारसा जपला जाणार नाही; तर तो अंमलात आणावा लागेल. त्यांचा जन्मदिवस 27 डिसेंबर रोजी कृषि आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आदराने स्मरणार्थ साजरा केला जातो. संत गाडगेबाबांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाची आघाडी उघडली आणि आज प्रगत महाराष्ट्र घडविला आहे. अशा या थोर शिक्षणमहर्षीला 127 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
प्रविण बागडे