• 27
  • 1 minute read

संघटन शक्ती, वज्जी लोकांचा संदेश…

संघटन शक्ती, वज्जी लोकांचा संदेश…

वैशाली गणराज्य वज्जी लोकांचे होते. शेजारचा दुसरा एक राजा अजातशत्रू अनेकदा प्रयत्न करून ही तो त्या वज्जी लोकांना जिंकू शकत नव्हता. वज्जी लोक प्रत्येक वेळी त्या अजातशत्रूचा हल्ला परतून लावत होते.

अजातशत्रू ला कोणत्याही परिस्थितीत वज्जी लोकांना जिंकायचे होते. त्याने आपल्या राज्यात काही तज्ञांचे मत जाणून घेतले. त्यात असा निर्णय झाला की; हे वज्जी लोक बुद्ध धम्माच्या विचारानुसार अनुसरण करणारे प्रामाणिक उपासक आहेत. ते भगवान बुद्धांच्या उपदेशाचे पालन करतात. म्हणून वैशाली येथे वर्षाकार ब्राह्मणाच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ भगवान बुद्धांकडे पाठवण्यात आले.

भगवान बुद्धांचे आवडते ठिकाण म्हणजे वैशाली. त्यांनी वैशालीत अनेकदा उपदेश केले होते. वर्षाकार ब्राह्मण भगवान बुद्धांची भेट घेण्यास गेला. तेथील भिक्खूस भेटून अजातशत्रू राजाच्या वतीने कुशलतेची चौकशी केली व भ. बुद्धास भेटण्याची विनंती केली. भ. बुद्धास भेटतांना अभिवादन केले व विनंती केली; की वज्जींचा पराभव कसा करता येईल? त्यांची एकजूट कशी तोडता येईल? कारण भगवान बुद्ध खोटे बोलत नसतात.

तथागत भगवान बुद्ध त्यांना उत्तर न देता भंते आनंद यांना प्रश्न विचारतात; “काय मी दिलेल्या संघ नियमांचे वज्जी लोक पालन करतात का?

1. काय वज्जी एका ठिकाणी नियमित एकत्र येतात?
आनंद- होय भगवंत !
2. काय वज्जी लोक एकत्र येऊन चर्चा करतात?
आनंद- होय भगवंत !
3. काय वज्जी वडीलधारी मंडळी व महिलांचा मान सन्मान करतात?
*आनंद- होय भगवंत !
4. काय वज्जी लोक एकमेकांच्या संपर्कात आनंदाने बंधुत्व मैत्री भावाने एकत्र राहतात?
आनंद- होय भगवंत !
5. काय वज्जी लोक एकमताने निर्णय घेतात?
आनंद- होय भगवंत !
6. काय वज्जी लोक बहुमताने घेतलेले निर्णय एकमताने अमलात आणतात?
आनंद- होय भगवंत !
7. काय वज्जी लोक धम्मानुसार आचरण करतात?
आनंद- होय भगवंत !
तथागत पुढे म्हणतात; “आनंद वज्जी लोक जोपर्यंत असे आचरण करतील तो पर्यंत ते अपराजित राहतील. त्यांची प्रगती होत राहील. त्यांचा पराभव होऊ शकत नाही.

हे रहस्य वर्षाकार ब्राह्मणाने जाणून घेतले व अभिवादन करून त्याने भगवान बुद्धाचा निरोप घेतला व अजातशत्रूला सर्व हकीकत सांगितली. त्या नंतर अजातशत्रू आणि वर्षाकार ब्राम्हण यांनी वज्जी लोकांची एक संघ एकता तोडण्यासाठी एक योजना बनवली. अजातशत्रू राज्याच्या दरबारात वज्जी लोकांबाबत चर्चा करतांना वर्षाकार ब्राह्मण हा वज्जी लोकांच्या बाजूने बोलत असल्याने दर्शवून अजातशत्रू राजाने त्या वर्षाकार ब्राह्मणाला आपल्या दरबारातून व आपल्या राज्यातून हद्दपार केले. ही बातमी वज्जी लोकांपर्यंत पोहोचली. यावर वज्जी लोकांच्या सभेत चर्चा झाली. तेव्हा कांहीनी सांगितले की; वर्षाकार ब्राह्मण हा कपटी आहे. त्याच्या नादी लागू नये. पण काहींनी सांगितले की; नाही तो आपल्या राज्याच्या बाजूने बोलत असल्याने त्याला त्याचा देश सोडावा लागला. म्हणून आपण आपल्या राज्यात त्याला आसरा दिला पाहिजे. परंतु वयस्क वडीलधाऱ्या मंडळींनी बजावले की; वर्षाकार ब्राह्मणाच्या कपटपणाला बळी पडू नका. पण तरूणांनी ठरवले की जर आपली बाजू घेण्यावर अन्याय होत असेल; तर आपण त्याला सहकार्य करावे. त्यामुळे जेष्ठ लोकांचा सल्ला डावलून त्याला वैशाली नगरात प्रवेश दिला गेला. इतकेच नाही तर त्याला थोड्या दिवसातच लोकप्रियता सुद्धा मिळाली आणि तो अजातशत्रू कडे सेनापती होता तर त्याच्या कामाचे स्वरूप व अनुभव पाहून वज्जी लोकांनी त्याला वैशाली नगरच्या प्रधान पदावर सेनापती म्हणून नियुक्त केले. परिपूर्ण विश्वास संपादन केल्यावर वर्षाकार ब्राम्हणाने आपले खरे काम सुरू केले. कसे ते बघा.

1. तो काही मित्रांमधून एकाला आपल्या बाजूला बोलावून त्याच्या कानात हळूच विचारायचा; “तू आज काय जेवलास?” त्यानंतर मित्र त्याला विचारत; वर्षाकार त्या ब्राह्मणाने काय सांगितले; काही नाही, काय जेवलास; ते विचारत होता. ते तो खरं सांगायचा; पण मित्रांना ते खरं वाटेना. त्यांना वाटे की; एवढेसे सांगण्यासाठी याला बाजूला कशासाठी नेणार? आणि कानात कशाला सांगेल? आपला मित्र आपल्या पासून काहीतरी लपवतोय; अशी दुसऱ्या मित्राला शंका यायची.

2. एखाद्याला सांगे की; अरे तो अमका तमका तुझ्याबद्दल तू भेकड आहेस; असं म्हणाला. झालं… अशा प्रकारे प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने बघू लागला. हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागला. त्यांची एकता तुटू लागली. कालांतराने वज्जी लोकांनी जेष्ठांचा आदर करणे बंद केले. परस्परावर विश्वास करणे, एकत्र येणे, चर्चा करणे, निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे,… वज्जी लोकांनी हळू हळू बंद केले. ही वेळ साधून वर्षाकार ब्राह्मणाने अजातशत्रू राजास निरोप पाठवला; हीच वेळ योग्य आहे वज्जी लोकांवर आक्रमण करण्याची.

अजातशत्रूने वैशालीवर आक्रमण केले. प्रसेनजित राजाने आक्रमणास प्रत्युत्तर देण्यासाठी वैशाली नगरमध्ये ढोल वाजवून आक्रमण झाल्याची व नगरावर संकट आल्याची सूचना देण्यात आली. पण कोणीही नगराचे मुख्य दरवाजे बंद केले नाही. कोणीही ही सूचना गांभीर्याने घेतली नाही. एकत्र आले नाही. लढाईसाठी सज्ज झाले नाही. शत्रूचा मुकाबला करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. परिणामत: अजातशत्रू चे सैन्य नगरात घुसले कत्तली केल्या व वज्जी चे राज्य बळकावले. पण त्या वेळी भगवान बुद्ध सुद्धा तेथे नव्हते. त्यांनी आधीच वज्जींचे वैशाली नगर सोडलेले होते.

इतिहासातील या घटनेचा संबंध आज आपल्या देशातील वर्तमान परिस्थितीशी जोडता येईल का? हा प्रसंग आता लागू पडेल का? असे राजकीय कपट कारस्थानं करणारा आज कोणता असा प्रधान आहे का? आज आपल्या देशात शांतता, सूव्यवस्था, समृद्धी, खुशहाली, बंधूभाव, मैत्री, प्रेम, आपलेपणा आहे का? याचा ज्याने त्याने विचार करावा व योग्य अयोग्य, सत्य असत्य जाणून घ्यावे. देशात एकता, समाजात समानता, शिलाचरण किंवा संघटन नसेल तर काय अवस्था होते; ते आज आपण पाहतो आहोत. जातीय व धार्मिक द्वेष मनात ठेवून आपला व देशाचा विकास होत नाही तर त्याने केवळ विनाश होतो. वज्जी लोकांपासून हा सामाजिक बोध घ्यायला हवा. ज्या समाजात आपसात स्पर्धा, चढाओढ आहे, स्वत:च्या प्रगतीसाठी प्रयत्न न करता दुसऱ्याचे पाय खेचण्यातच आपली वेळ आणि शक्ती खर्च केली तर आपलाही विकास थांबतो. म्हणूनच कपट कारस्थाने करून राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या मागे न लागता आपण आपल्या योग्यतेनुसार आपला मार्ग निवडावा; हेच योग्य होय.

विद्यावाचस्पती प्रा. भीमराव गोटे.
बी.लिब.एससी.,एम.ए.(अर्थ.,शिक्षणशास्र), एम.एड.,पीएच.डी.(मुंबई)

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *