संतोष देशमुख हत्याकांड : जातीचे समीकरणे डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित राजकारणातील नेते बोलत आहेत! – राहुल गायकवाड

संतोष देशमुख हत्याकांड : जातीचे समीकरणे डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित राजकारणातील नेते बोलत आहेत! – राहुल गायकवाड

संतोष देशमुख हत्याकांड : जातीचे समीकरणे डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित राजकारणातील नेते बोलत आहेत! – राहुल गायकवाड

     संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिस तपासात ज्यांची नावे समोर येतील, मग ते कुणी ही असले तरी त्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राज्यात दोन गंभीर हत्याकांडाची भेट पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राला देणारे मुख्यमंत्री नुकतेच म्हणाले. पण तपास इमानदारीने होईल, दबावाखाली होणार नाही, हे ते स्पष्टपणे बोलत नाहीत.  तसेच या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडे सर्व माहिती आहे. धस यांना या प्रकरणातील पोलिसाचे व संशयित आरोपीचे संबंध माहित आहेत, जिल्हा प्रशासन अन आरोपीचे संबंध ही माहित आहेत. इतकेच काय फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आरोपीशी असलेले संबंध ही माहित आहेत. याबाबत त्यांनी विधानसभेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला हे सर्व सांगितले आहे. या माहितीच्या आधाराने पुढील चौकशी होऊ शकते. पण तो धागा पकडून तपास होणार नाही. तसेच हत्येनंतर 20 दिवस फरार असलेला या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीतून प्रवास करीत पोलिसांना शरण आला. तो ताफ्यातील गाडीत कसा आला, याची साधी चौकशी ही पोलिस करणार नाहीत. हा प्रश्न असून या प्रश्नाचे उत्तर ” नाही ” असेच आहे.
         बीड अन परिसरातील गुन्हेगारी जगतातील बेताज बादशहा असलेल्या वाल्मिक कराडने काही एक – दोन वर्षात गुन्हेगारी जगतात आपले साम्राज्य उभे केलेले नाही. इतके मोठे साम्राज्य उभे करायला दोन – तीन दशक सहज लागतात. यात फडणवीसाच्या 2014 ते 2019 या अर्ध दशकाचा समावेश देखील आहेच.  या काळात त्याच्या गुन्हेगारीला संरक्षण कुणी दिले? फडणवीस प्रमुख असलेले पोलिस तेव्हा काय करीत होते ? 2019 ते 2024 या अर्ध दशकाच्या कालखंडात ही अडीच वर्ष फडणवीस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होतेच की.  कायदा सुव्यवस्थेच्या बाता मारणारे फडणवीस व त्यांचे पोलिस या ही वेळी काय करीत होते ? आज बीड प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस हेच ऐकटे आक्रमक आहेत. बाकी कुणी काही बोलत नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड बोलत आहेत? बाकी विरोधी खेम्यात शुकशुकाट आहे. एका मराठा तरुण सरपंचाची हत्या झाली आहे, तरी ” एक मराठा, लाख मराठा ” आरोळी देणारा मराठा समाज गप्प का आहे ? सरकारला जाब का विचारत नाही ? फडणवीस सरकारच्या विरोधात बोलण्यास दोन्ही बाजूकडील आमदार घाबरत का आहेत ? कसली अन कुणाची भिती आमदारांमध्ये आहे? इतके सारे प्रश्न आज राज्यातील जनतेसमोर उभे आहेत.  जातीचे समीकरणे डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित राजकारणातील नेते बोलत आहेत, हे कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक आहे. 
       वाल्मिक कराड हा प्रस्थापित राजकीय पक्ष व सत्तेने पोसलेला गुन्हेगार आहे. प्रस्थापितांच्या व सत्तेच्या वरदहस्ता शिवाय कोणी ही इतका मोठा गुन्हेगार होऊच शकत नाही. त्यामुळे वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधामुळे धनंजय मुंडे दोषी ठरत असतील, तर या काळातील शासन, प्रशासन व त्यांचे तत्कालीन प्रमुख ही तितकेच जबाबदार आहेत.गेल्या एक दशकात साडे सात वर्ष फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री राहिले आहेत. या दशकात अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या हातात पोलिस, सीआयडी, सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा आहेत. पण वाल्मिक कराड अन गँगने केलेले गुन्हे व केलेल्या कोट्यावधीच्या उलाढाली त्यांना कुणालाच दिसल्या नाहीत. छापे मारण्यात पटाईत असलेल्या ईडी, सीबीआयची साधी नजर ही या गँगकडे गेली नाही. हे आश्चर्य नाही, तर मिली भगत आहे. ” हमाम मे सब के सब नंगे है, ” त्यामुळे या तपासात चौकशीचा नुसता फार्श होईल. मोहरे गळाला लागतील. अन सूत्रधार उजळ माथ्याने मोकाट सुटतील. आजपर्यंत हे असेच होत आले आहे. या प्रकरणात ही तेच होईल.
          वरदहस्त कुणाचा का होईना पण सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात वाल्मिक कराडचा वावर होता, हे आता लपून राहिलेले नाही. फडणवीस असो, शिंदे अथवा अजित पवार की राष्ट्रवादीचे जयंत पाटील असो या सर्वांसोबत अगदी सहजपणे तो वावरत होता. धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतरच तो अजित पवाराच्या ताफ्यातील गाडीतून पोलिसांना शरण आला, ही गोष्ट फारच गंभीर आहे. राज्याला हादरवून सोडणाऱ्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आपल्या ताफ्यातील गाडीतून पोलिसांना शरण आल्याचा धस यांचा आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावला असला तरी वाल्मिक चा साथीदार मोराळेच्या गाडीचे लोकेशन ट्रेस झाले आहे. ते या आरोपाला दुजोरा देते. बरेच काही सांगून जाते. धस पुराव्यानिशी हा आरोप करीत असतील तर, अजित पवारांच्या ताफ्यातील पोलिस काय करीत होते ? याचा जबाब फडणवीस यांनी द्यायला हवा. अन हा आरोप खोटा असेल तर धस यांच्यावर कारवाई करायला हवी ? पण असे ही काही होणार नाही. याचे ही कारण आहे धस यांचा बोलविता धनी हे स्वतः फडणवीसच आहेत. त्यांना हवे तेच व तेवढेच धस बोलतील.
       संतोष देशमुख हत्याकांड व त्यातील संबंधित आरोपींचे आपल्या अन आपल्याच मित्र पक्षातील नेते / मंत्र्याशी असलेले संबंध स्पष्ट दिसताच फडणवीस अधिक सक्रिय झाले आहेत. पण तपासासाठी नव्हे, राज्यातील कायदा सुव्यवस्था ठीक करण्यासाठी ही नव्हेतर, तर स्वपक्षातील विरोधक पंकजा मुंडे, मित्र पक्षातील धनंजय मुंडे व अजित पवार यांना ठिकाणावर आणण्यासाठी सक्रिय झाले आहेत. अन त्यासाठीच स्वपक्षातील आमदार धस यांना त्यांनी कामाला लावले आहे. धस जे बोलत आहेत, त्या संदर्भातील पूर्ण माहिती त्यांना पुरविली जात आहे. नाहीतर आपल्या ताफ्यातील गाडीत वाल्मिक आहे, हे उपमुख्यमंत्री असून अजित पवारांना माहित नव्हते, तर धस यांना कसे माहित झाले ? थोडक्यात फडणवीस आपल्या स्वपक्षातील व मित्र पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या प्रकरणाचा वापर या पुढील काळातही करतील. तूर्त सर्वांच्या फाईली बनविल्या जातील. वेळ आली की भिती दाखवायला. या अशाच ब्लॅकमेलच्या राजकारणामुळे अजित पवार, शिंदे भाजपच्या गळाला लागले आहेत. 
            या अशाच प्रकारच्या राजकारणाला भाजपने आपले चारित्र्य बनविले आहे. आज अर्ध्या पेक्षा अधिक भरणा भाजपात याच ब्लॅकमेलिंगच्या राजकारणामुळे झालेला आहे.  या संदर्भातील उत्तम उदाहरण आपल्याच राज्यातील अजित पवार यांचे आहे.  म्हणजे 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी आटोपल्यावर केवळ 48 तासासाठी फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या 48 तासात स्वतःच केलेल्या आरोपातून त्यांनी अजित पवारांना  सिंचन घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट दिली. पण ते 48 तासाचे सरकार पडल्यावर त्याच प्रकरणी अजित पवारवर आरोप केले.  देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले मोदीने ही आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याने व सरकारने क्लीन चिट दिलेल्या अजित पवारावर टीका केली.  काहीही करून भाजपला महाराष्ट्र लुटण्यासाठी सत्ता हवी आहे, हे या मागचे मुख्य कारण असून ते आता लपून राहिलेले नाही.
       संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास अन खटला सुरु राहिल. पण सूत्रधार मोकाट राहतील. कारण ते सत्तेत आहेत. जातीचे पुढारी आपापल्या परीने याचा वापर करून घेतील. सरकार त्यांना झुलवत व खेळवत राहिल. लोक ही उद्या विसरून जातील. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल राज्यातील जनतेच्या पचनी पडत नव्हता. जनतेची मानसिकता भाजप व मित्र पक्षाच्या नेत्यांना कळली आहे. त्यामुळे ते कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवीत राजसकट चालवीत आहेत. हे समजून घेतले पाहिजे. त्याशिवाय या धर्मांध, जातीयवादी शक्तींचे हे उद्योग थांबणार नाहीत.  बाकी या हत्याकांड प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करून सूत्रधारांना पकडायचे असेल तर धस यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी करण्याची गरज आहे, अन मिडियात इतके बोलत बसण्यापेक्षा सुरेश धस यांनी ही स्वतःहून पोलिसांना आपल्याकडील सर्व माहिती पुराव्यानिशी जनतेच्या साक्षीने द्यावी. मग कळेल कोण कुणासोबत आहे व आरडाओरड का आहे.
 
……………….
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले जळगांव दि.२२(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी)       जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ रेल्वे…
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे !        महाराजा शहाजीराजे – जिजाऊ माँसाहेब यांच्या संकल्पनेतील आणि अथक…
अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकन व्हाइट हाऊस मध्ये भारतीय वंशाचा उष:काल !

अमेरिकी व्हाइट हाऊस मध्ये दक्षिण भारतीय महिलांचा उष:काल !       डोनाल्ड ट्रम्प 47 वे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *