• 171
  • 1 minute read

संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी महाराष्ट्र व शिव धर्मावरील हल्ला..!

संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी महाराष्ट्र व शिव धर्मावरील हल्ला..!
            शिवकालीन इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी करून महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात आपला ठसा उमटविणाऱ्या संभाजी ब्रिगेड आणि ब्रिगेडचे सर्वेसर्वा प्रविण गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची हिंमत यापुढील काळात आपापसातील संघर्षाची नांदी ठरणार आहे. हा हल्ला आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे , गौरी लंकेश व कलबर्गी यांच्या हत्या या सर्वांचा परस्पर संबंध आहे. हे पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे. ते न घेता या हल्ल्यावरील उपाय शोधताच येणार नाहीत. भिडे, एकबोटे यांनी घडवून आणलेल्या भीमा कोरेगावच्या दंगलीला ही या प्रकरणाशी जोडले पाहिजे. कारण ती ही याच मालिकेतील घटना असून या सर्व घटना फॅसिस्ट शक्तींनी एकाच उद्देशाने घडवून आणल्या आहेत. त्यामुळे या सर्व घटनांचा एकत्रित विचार करूनच त्या विरोधात मोर्चे बांधणी करण्याची गरज आहे. असे झाले नाही तर ऐकटे ऐकटे लढा व मरा. ते ही आपल्याच स्व जातीकडून. हे निश्चित आहे.
         हा हल्ला एका व्यक्तीवरील हल्ला नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर व शिव धर्मावरचा हल्ला आहे. राजे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू आहे. पण तो एक बहाणा आहे. या मागचा उद्देश आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी व शिव धर्मावर निष्ठा असलेल्या मराठी तरुणांना आपापसात लढविणे. जो दीपक काटे या हल्ल्याचा सूत्रधार आहे, त्याने संभाजी ब्रिगेड, छावा यासारख्या मराठा तरुणांच्या संघटीत शक्तीला आव्हान देण्यासाठीच शिवधर्म फाऊंडेशनची स्थापना केली आहे. तो फक्त नावासाठी छत्रपतींचे नाव वापरतोय. त्याच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महाराज नाहीत नाहीत. तर मराठ्यांना आपापसात लढवा व राज्य करा, हा ब्राह्मणी कावा आहे. इतकेच नाहीतर त्याचा करविता धनी ही संभाजी भिडेच आहे. त्याच्याच तालमीत तो तयार झालेला आहे. 
         राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी भिडे आणि गोपीचंद पडळकर हे संघी त्याचे मार्गदर्शक व आदर्श आहेत. या हल्ल्यानंतर गावागावात मराठा तरुणांमध्ये आपापसात संघर्ष उभा करण्याचा डाव या हल्ल्यामागचा आहे. तो दीपक काटेला माहित असेलच असे नाही. संघ त्याच्याकडून कळत नकळत हे करून घेत आहे. संभाजी ब्रिगेड व संभाजी भिडे गँग यांच्यात हा संघर्ष गेल्या काही वर्षात उभा राहिलेला दिसतो आहेच. संभाजी ब्रिगेडमधील अनेक तरुणांना भुरळ घालून भिडेने त्या तरुणांना ब्रिगेडच्या विरोधात उभे ही केले आहे. राज्यभर असे तरुण व उदाहरणे असून प्रविण गायकवाड व ब्रिगेडच्या नेत्यांना हे माहित ही आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे ही असाच संघर्ष गावागावात मराठा व ओबीसी समाजामध्ये उभा करण्यात संघ व भाजपला यश आले होते. त्या संघर्षाचा फायदा भाजपला निवडणुकीच्या मैदानात नक्कीच झालेला आहे. दीपक काटे हा इथल्या फॅसिस्ट सरकारचा एक मोहरा आहे. असे अनेक चेहरे संघ व भाजपने सर्व जाती जातीत उभे केले आहेत. जसा मनोज जरांगे आहे तसेच.
        संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख संभाजी ब्रिगेडच्या नावात असल्याने दीपक काटेच्या शिवधर्म फाउंडेशने हा हल्ला केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महाराज यांची बदनामी करणारे माफीवीर सावरकराचे सहा सोनेरी पान हे पुस्तक काटेने जाळायला हवे होते. राजमाता जिजाऊची बदनामीस मदत करणाऱ्या भंडारकर संस्थेस टाळे लावण्याचे काम त्याने करायला हवे होते. सावरकरांचा नीच वारसदार प्रशांत कोराटकराचे जेथे असेल तेथे जाऊन थोबाड फोडण्याचा जाहीर कार्यक्रम करायला हवा होता. पण त्याला ते करायचे नाही. त्याची तेवढी लायकी नाही. तो संघाच्या दावणीचे एक बांडगुळ आहे. भिडे आणि एकबोटेच्या तालमीत मराठा, ओबीसी व दलित ( महार व बौद्ध वगळून) तरुणांच्या मेंदूची नसबंदी करून त्यांच्या खांद्यावर धर्माचे ओझे टाकले जात आहे. आंबेडकरी समाजातील गुणरत्न सदावर्ते ही एखादे उदाहरण या प्रकारात बसू शकते.
        
            कांशीराम यांच्या आंबेडकरी मिशनची भिती नसल्याने ते फॅसिस्टांचे टार्गेट कधीच झाले नाहीत…..!
 
         संभाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख हे हल्ल्याच्या मागचे कारण पुढे येत असले तरी संभाजी ब्रिगेडची आक्रमकता आणि ताकद आजमावून घेण्यासाठी झालेला हा हल्ला आहे . तर हल्ल्याला मिळालेला संथ प्रतिसाद संघाची हिंमत वाढविणारा ठरणार आहे. हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रविण गायकवाड यांनी जे विधान केले, त्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणाले ही शेवटाची सुरुवात आहे. त्यांचे हे विधान अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असून यामध्ये खूप काही दडलेले आहे. संघाला ही घायाळ करणारे आहे. पण त्यांनी पुढे म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेड व बामसेफला संपवण्याचे हे कट कारस्थान आहे. यातील अर्धे वाक्य सत्य आहे, तर अर्धे असत्य. बामसेफ हे संघाचे टार्गेट कधीच नव्हते. नाही व नसणार ही. कांशीराम व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभे केलेले राजकारण व संघटना या भाजप व संघासाठी कधीच अडचणीच्या ठरल्या नाहीत. उलट भाजप देशभरातील सत्तेची द्वारे खटखटवत असताना कांशीराम, मायावती व कांशीराम यांनी उभा केलेल्या तथाकथित आंबेडकरवादी मिशनने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, संघ व भाजपच्या राजकारणाला मदतच केली आहे. भाजप व मोदींच्या विरोधात देशात पर्याय उभा करण्याचा प्रयत्न विरोधक करीत असताना वामन मेश्राम यांच्या बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व बसपाने मत विभाजनाचे राजकारण करीत भाजपला मदतच केली. 
        संविधान व लोकशाहीसमोर आव्हाने उभी असताना आपल्या राजकारणाची दिशा काय असली पाहिजे ? हेच जर वामन मेश्राम, मायावती या कांशीराम यांच्या अनुयायांना आज ही कळत नसेल, तर ते प्रतिगामी शक्तींच्या बाजूचे आहेत, असे समजणे आजच्या परिस्थित गैर नाही. त्यामुळेच प्रविण गायकवाड यांचे विधान पटत नाही. अन् त्यांनी का केले ते ही कळत नाही.
          प्रविण गायकवाड यांनी ” शेवटाची सुरुवात ” हा शब्द प्रयोग केला आहे. मात्र संघ सतत याच सूत्राप्रमाणे चालतो आहे. संविधान संपविणे, या देशातील धर्म निरपेक्ष व लोकशाही व्यवस्था नष्ट करणे, अन् या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करणे, हा संघाचा शेवटचा अजेंडा असून याची सुरुवात ते सतत करतात. त्यासाठी अनेक प्रयोग ही ते करतात. महात्मा गांधी यांच्या हत्येपासून खऱ्या अर्थाने या धर्माध शक्तींनी या शेवटाची सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये सत्ता मिळताच गोध्रात हा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे केला. त्यानंतर सतत हा प्रयोग ते करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबर्गी यांच्या हत्या ही याच प्रयोगातून झालेल्या असून यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काटेसारख्याच बहुजनातील तरुणांचा वापर करण्यात आलेला आहे.
          राज्यातील सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असे जाहीरपणे मुख्यमंत्री व अन्य मंत्री बोलत असल्याने भाजप व संघातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संघोट्यांची हिंमत वाढली आहे. ते अधिक आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोराटकरला सरकारचे संरक्षण आहे. त्यामुळे हत्येची शिक्षा भोगून आलेल्या दीपक काटेची हिंमत वाढली असून त्याने प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला केला आहे. विधानसभेच्या परिसरात ही सरकारने आतंक माजविला आहे. ख्रिचन समाजातील लोकांच्या हत्या करणाऱ्यांना पुरस्कार देण्याची घोषणा धर्म व्यवस्थेतील अतिशूद्र असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. इतकेच नाहीतर तो विधानभवनाच्या परिसरात गावगुंडासारख्या धमक्या आमदारांना देत आहे. हे चित्र पाहिल्यानंतर यापुढील काळात महाराष्टात यादवी सुरू होईल, हे स्पष्ट दिसत असून हा संघर्ष यादवी शासन व प्रशासन प्रायोजित असेल. 
           राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जाती जातीत संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न सतत झालेला आहे. आरक्षणावरून मराठा व ओबीसी समाजात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात अनेक नेते पैदा करण्यात आले असून त्यांच्यात ही आपापसात भांडणे लावली आहेत . हे धनगर नेते आता धनगर आरक्षणावर न बोलता रोज एकमेकांचे वस्त्रहरण करीत आहेत. अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी समिती स्थापन करून या ही जात समूहातील घटक जातींना एकमेकांच्या विरोधात उभे केले आहे. आता संभाजी ब्रिगेडच्या विरोधात शिवधर्म फाऊंडेशनच्या दीपक काटेला उभा करून मराठा समाजाला आपापसातच लढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या काळात जाती _जाती संघर्ष तर होईलच. पण स्वजातीमध्ये ही संघर्षाचे वातावरण निर्माण होऊ शकते. फडणवीस यांच्या सरकारचा हा कृती कार्यक्रम आहे. याची दखल वेळीच समस्त पुरोगामी पक्ष, संघटनांनी घेऊन त्याबाबत आपला ही कृती कार्यक्रम आखण्याची गरज आहे. काळ सोकावतोय . त्याचा वेळीच बंदोबस्त करणे, ही काळाची गरज ही आहे.
………………..
 
राहुल गायकवाड,
समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *