लातूर : “गेल्या पाच वर्षांपासून निवडणुका न घेता भाजपने आपल्या मर्जीतले प्रशासक बसवून महापालिकेचा कारभार चालवला आहे. जनतेचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेणे आणि निवडणूक प्रक्रिया डावळणे हा संविधानाचा उघड अपमान आहे.
संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला आणि भ्रष्ट राष्ट्रवादीला सत्तेबाहेर फेकून देण्याची वेळ आली आहे,” अशा कडक शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापितांवर तोफ डागली.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बौद्ध नगर) येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. रात्री ८ वाजता झालेल्या या सभेला लातूरकरांनी मोठी गर्दी केली होती.
प्रस्थापित पक्षांकडून कार्यकर्त्यांचा ‘गेम’
कार्यकर्त्यांच्या अन्यायावर भाष्य करताना सुजात आंबेडकर म्हणाले, “भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांतील कार्यकर्त्यांनी आता डोळे उघडावे. तुमच्या पक्षांनी तुमचा गेम केला आहे. प्रस्थापित पक्षांत केवळ श्रीमंत, मटका-सट्टा चालवणारे आणि घराणेशाहीतील लोकांनाच तिकीट मिळते. मात्र, वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष असून, आम्ही केवळ एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देऊन सत्तेत नेण्याचे काम करतो.”
लातूरच्या विकासाचा ‘ब्लूप्रिंट’:
लातूरमधील नागरी समस्यांवर बोट ठेवत सुजात आंबेडकर यांनी ‘वंचित’चे व्हिजन मांडले:
१) महापालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय आहे. वंचितची सत्ता आल्यास शाळांचे पुनर्वसन करून खासगी शाळांप्रमाणे मोफत आणि जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाईल
२) प्रत्येक वॉर्डमध्ये सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल
३) बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहे बांधली जातील
४) बंद पडलेली एमआयडीसी पुन्हा कार्यान्वित करून ५,००० हून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल
“जे शिक्षणाविरोधात काम करतात त्यांना सत्तेतून हकला आणि ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते, त्या आंबेडकरवाद्यांना सत्तेत बसवा,” असे आवाहन सुजात आंबेडकरांनी यावेळी केले. या सभेमुळे लातूरमधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. यावेळी सभेत मोठ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.