• 126
  • 1 minute read

संविधानात्मक संरक्षक चौकटी तोडण्यात अपयश आल्याने संघ, भाजपकडून आंबेडकरी विचारवंत व नेत्यांना लाभार्थी बनवून तोडण्याचे कट कारस्थान….!

संविधानात्मक संरक्षक चौकटी तोडण्यात अपयश आल्याने संघ, भाजपकडून आंबेडकरी विचारवंत व नेत्यांना लाभार्थी बनवून तोडण्याचे कट कारस्थान….!

पदव्या व उच्च शिक्षण नव्हे, नैतिकता असणे हे आंबेडकरवादी असण्याचे पहिले लक्षण....!

                व्यवस्था परिवर्तन आणि बदलाच्या प्रक्रियेत देशभरात महत्त्वपूर्ण भुमिका बजावत असलेल्या आंबेडकरी विचार व चळवळीतील काहींना सत्तेचे, पण बिन अधिकाराचे तुकडे देवून लाभार्थी बनविण्याचे आणि लाचार करण्याचे कट कारस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. यामध्ये संघाला दिवसेंदिवस यश ही येताना दिसत आहे. जे लाभार्थी बनून लाचारी पत्करीत आहेत, ते सारे, आम्ही लोकनेते आहोत, आपण खूप बुद्धिमान, विचारवंत आहोत. विदेशातून शिकून आलो आहोत म्हणून सरकारला आमची गरज आहे,असा आव आणीत आहेत. पण भाजपची सरकारं मोदी व फडणवीस चालवित नाहीत. ती संविधान व लोकशाही मार्गाने ही चालत नाहीत, तर गोलवलकर यांनी लिहिलेल्या ” बंच ऑफ थॉट” मधील अजेंड्यावर चालत आहेत. तो अजेंड्याच या सरकारांच्या माध्यमातून राबविला जात आहे. हे सत्य ज्यांच्याकडे विवेकबुद्धी आहे, त्यांनाच पटते. सत्तेच्या तुकड्यांची व शासकीय पदाची लालसा आहे, त्यांना ते पटणार नाही. असे तथाकथित आंबेडकरवादी लोकनेते व बुद्धिमान, विचारवंत, अर्थशास्त्र तज्ञ शासकीय व प्रशासकीय यंत्रणेचा हिस्सा बनून काय करणार ? तर संघाला जे हवे तेच करणार, बंच ऑफ थॉट मधील संघी अजेंडाच राबविण्याचे काम करणार.हे स्पष्ट आहे.
          दलित, शूद्र, अतिशूद्र, अल्पसंख्यांक, इतर मागासवर्गीय जाती, कामगार, महिला, किसान आदी सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल करण्याचे हक्क, अधिकार देण्याचे ऐतिहासिक व युग प्रवर्तक कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. बहुजन वर्गाला सर्वच क्षेत्रात भागीदारी मिळवून देण्यासाठी ज्या ज्या व्यवस्था लोकशाही राज्य व्यवस्थेत आहेत, त्या त्या सर्व डॉ. आंबेडकर यांनीच संविधानाच्या चौकटीचे संरक्षण देवून उभ्या केल्या आहेत. अन या संरक्षक चौकटी इतक्या भक्कम आहेत की, संविधान निर्मितीपासून त्यास विरोध करणाऱ्या संघी व अन्य ब्राह्मणी व्यवस्था या चौकटींचा अभेद्य किल्ला सतत प्रयत्न करून ही भेदू शकल्या नाहीत, ना यापुढे भेदू शकत. त्यामुळे त्यांनी आंबेडकरी विचारांच्या चळवळीवरच हमला सुरु करून तिला तोडण्याचे काम सुरु केले आहे. अन ते उत्तम प्रकारे करीत आहेत. त्यात त्यांना यश ही मिळत आहे. या यशाला दुर्लक्ष करून चालणार नाही. संविधान निर्मिती , धम्म दीक्षा, लोकशाही राज्य व्यवस्था या साऱ्या गोष्टी क्रांतिकारक असतील तर हे यश म्हणजे प्रतिक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. संविधान, लोकशाही, धर्मनिरपक्षेता या साऱ्यांना अगदी जाहीर विरोध करून संघ, भाजपने दे दाखवून ही दिले आहे. 
 हे करीत असताना हिंदू राष्ट्र निर्मितीचा अजेंडा ही त्यांनी तयार केलेला आहे. हिंदू राष्ट्रात राष्ट्रपतींची काय औकात असेल ते रामनाथ कोविंद व द्रौपदी मुर्मू यांच्याशी व्यावहार करून सप्रमाण दाखविले ही आहे, हे असे चित्र डोळ्यापुढे असताना स्वतःला विचारवंत म्हणून घेणाऱ्या तथाकथित आंबेडकरवादी विचारवंतांमधील विवेकबुद्धी जागत नसेल तर त्यांच्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचे काय आचार घालायचे का ?
            देशाला स्वातंत्र्य मिळताच आपण लोकशाही राज्य व्यवस्था स्विकारली, धर्मनिरपेक्ष संविधान स्विकारले, अन धर्मांध शक्ती एकट्या पडल्या.पण त्यांची चिकाटी, त्याग त्यांनी सोडला नाही. सत्तेसाठी निरंतर संघर्ष चालू ठेवला व त्यातून सत्ता मिळताच या सर्व संविधानाच्या संरक्षक चौकटींना तोडण्याचे काम सुरु केले. अडचणी आल्या की थोडी माघार घेत पुढे जाण्याचे त्यांचे तंत्र ही चांगलेच यशस्वी होत आहे. केंद्रात पाशवी बहुमताच्या जोरावर सत्तेवर येण्याचा या शक्तींचा मार्ग आंबेडकरी मिशन चालविणाऱ्यामुळेच सुलभ झाला आहे. कांशीराम, मायावती, रामविलास पासवान, रामदास आठवले यांचे योगदान यासाठी मोठे राहिले आहे. स्वतःला आंबेडकरी विचारवंत म्हणवून घेणारे ही मागे नाहीत. यातील एक नाव आहे डॉ. नरेंद्र जाधव यांचे. अगदी हिंदू राष्ट्र निर्मितीचा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदींनी नरेंद्र जाधव यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना राज्यसभेवर पाठविले. आठवलेंना मंत्री केले. ही काही समान व सामाजिक न्यायचे सूत्र म्हणून केलेली कृती नाही. तर आंबेडकरी विचाराच्या चळवळीत संभ्रम निर्माण करण्याची चाल आहे. पण सत्तेसाठी लाचार झालेल्या व विवेकबुद्धी गहान टाकलेल्या विचारवंतांना 
          लोकशाही, संविधान व धर्मनिरपेक्ष व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी संघी सरकारने पावले उचलली असती तर त्या सरकारला सहाय्य करणे योग्य ठरले असते. पण मोदींनी आपल्या सत्ताकाळात संविधानात्मक संस्था आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ले केले आहेत. संवैधानिक परंपरा पायदळी तुडविल्या आहेत. बहुजन वर्गाला भागीदारी व हिस्सेदारी देणाऱ्या आरक्षण व अन्य व्यवस्थांना विरोध केला आहे. अशा परिस्थितीत संघाशी संग करणे हे संविधान व लोकशाहीशी द्रोह आहे. आपल्या अजेंड्याला कायम विरोध असणाऱ्या आंबेडकरी चळवळ व विचारधारेलाच लेचिपेची करून संविधान बदलण्याची लढाई अंतिम टप्प्यात आणून ठेवण्यात संघ, भाजपला यश आले आहे. अशा सर्व परिस्थितीत हे तथाकथित नेते, विचारवंत व अर्थतज्ञ सोबत असणे संघाची जमेची बाजू आहे. त्यामुळेच हे एकमेका सहाय्य करू, या न्यायाने संघी व तथाकथित आंबेडकरवादी विचारवंत व नेते वागत आहेत. ज्या ज्या राज्यांमध्ये आंबेडकरी विचार व चळवळीचा प्रभाव आहे, त्या त्या राज्यात संघ व भाजपने असेच आठवले व नरेंद्र जाधव उभे केले आहेत. बिहारमध्ये मांझी, पासवान, उत्तर प्रदेशात कांशीराम व त्यांच्या पश्चात त्यांच्या चेल्या मायावती, चंद्रशेखर आझाद आदींना उभे केले आहे.
       
  पदव्या व उच्च शिक्षण नव्हे, नैतिकता असणे हे आंबेडकरवादी असण्याचे पहिले लक्षण….!
 
           हिंदी भाषा सक्ती प्रकरणी महाराष्ट्र सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्यामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. हिंदीची सक्तीने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर मराठी माणूस एकत्र येवू लागला असून एकत्र आलेल्या या मराठी माणसांनी या समितीला विरोध केला आहे. तसेच नरेंद्र जाधव यांच्या नैतिकतेवर ही प्रश्न उपस्थित केले आहेत. नरेंद्र जाधव म्हणजे ” सत्तेचे बगलबच्चे” , सत्तेचा लाभासाठी लाचार, अशी ही चर्चा आता मराठी माणूस करू लागला आहे. मोदीच्या काळात त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती, त्याच वेळी हे सिद्ध ही झाले होते. पण मराठी माणूस त्या वेळी काही बोलला नाही. आता त्याच्या अस्मितेशी खेळणारा अहवाल ते देणार आहेत, म्हणून तो बोलू लागला आहे.
           या सर्व वातावरणात नरेंद्र जाधव यांनी ही आपली भुमिका मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न विविध माध्यमातून सुरू केला आहे. माझा संघाशी काही संबंध नाही, असे म्हणत असताना आपण डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केल्याचे ही ते सांगत आहेत. पण संघ, भाजप व काँग्रेसमध्ये फरक आहे. काँग्रेसचा अजेंडा नाही, या देशाला हिंदू, ब्राह्मणी राष्ट्र बनविण्याचा. संघ, भाजपचा आहे. याचे भान आपली भुमिका मांडताना असले पाहिजे. काँग्रेसने लोकशाही, संविधान व धर्मनिरपेक्ष व्यवस्थेला विरोध कधीच नव्हता. संघ, भाजपचा अगदी देश स्वातंत्र्य झाल्यापासून आहे. त्यामुळे आपण कुठल्या बाजूचे आहोत ? आपली नैतिक जबाबदारी काय आहे ? याचे भान असणे हे विचारवंत, अर्थशास्त्री असणे याचे पहिले लक्षण आहे. बाकी सर्व फालतुगिरी आहे. 
      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली बाजू माहित होती. आपले कर्तव्य व त्याबद्दलच्या जाणीवा होत्या. त्यांच्याकडे स्वाभिमान होता. नैतिकता होती. जगभरातील विद्यापीठांच्या पदव्या या त्यानंतर होत्या. उच्च शिक्षण घेतल्यामुळे माझा दरारा नाही, तर माझ्यात नैतिकता आहे म्हणून माझा दरारा आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणतात. अंगी नैतिकता असणे, स्वाभिमान असणे हे आंबेडकरवादी असण्याचे पहिले लक्षण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विदेशात शिकून अर्थशास्त्रात पदवी घेतली. मी ही त्यांच्यासारखीच पदवी घेतली असून त्यांच्यानंतर मीच आहे, असे म्हणताना थोडी लाज ही वाटली पाहिजे. आपण कुणाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा ही विचार या तथाकथित विचारवंतांनी केला पाहिजे..
………………..
 
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *