• 214
  • 1 minute read

संविधान बदलण्यासाठी सत्तेवर आलेल्या बरोबर हात मिळवणी करून संविधान कसे वाचविणार…?

संविधान बदलण्यासाठी सत्तेवर आलेल्या बरोबर हात मिळवणी करून संविधान कसे वाचविणार…?

            ज्यांचे सरकार आहे, ज्यांच्या हातात संविधान आहे, ते जर संविधान बदलण्याच्या गप्पा करीत असतील तर आपण सत्तेत गेले पाहिजे, असे आवाहन आज रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात केले. हे खरेच आहे. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी सत्तेत गेले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न करून लोकशाही राज्य व्यवस्था त्यासाठी या देशाला दिली आहे. पण जे संविधान बदलण्यासाठी सत्तेत आले आहेत, त्याच्यासोबत जाऊन, त्यांनाच साथ देऊन, त्यांच्याच कोट्यातून सत्तेतील वाटा मिळवून संविधान वाचविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा आहे. जो व्यक्ती संविधानाला पायदळी तुडवित राज्याचा मुख्यमंत्री झाला, त्याच्या सोबत युती करून संविधान वाचविण्याची भाषा करणे म्हणजे संविधानवादी आंबेडकरी जनतेची फसवणूक नव्हेतर काय आहे ?
खर तर आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेना हा विषय अजिबात सिरियस घेण्याचा विषय नाही. या दोन्ही गोष्टींना राज्यातील आंबेडकरी विचाराच्या प्रवाहाने कधीच सिरियस घेतले नाही. युग प्रवर्तक ठरलेल्या आंबेडकरी विचार व प्रवाहाने सिरियस घ्यावे, असे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेत काहीच नाही. संविधानाच्या निर्मितीपासूनच संविधानाला विरोध करणाऱ्या शक्तींच्या वळचणीला जाऊन एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यासाठी त्यांनी संविधानाला पायदळी तुडविले. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ही हे मान्य केलेले आहे. शिंदेंचे सरकार हे बेकायदेशीर, घटनाबाह्य असल्याचा शेरा ही न्यायालयाने मारला आहे. त्यांच्याशी युती करून संविधान वाचविण्याची भाषा करणे हे अजिबात शोभत नाही. हिंदू राष्ट्र निर्मितीचा पुरस्कार करणाऱ्या, संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या शिंदेसोबत युती करून मिळणाऱ्या सत्तेवर आंबेडकरी विचाराची जनता थूकत आहे. ज्यांना ती हवी आहे त्यांना ती लखलाभ.
आंबेडकरी विचारांची, त्यांनी सुरू केलेली सामाजिक न्याय व समान संधीची, वर्ग आणि वर्णहीन भारताच्या निर्मितीसाठीची लढाई लढणे येऱ्यागैऱ्याचे काम नाही. ते कुणालाही पेलवत नाही. त्याग लागतो, बलिदानाची तयारी ठेवावी लागते. अविरत संघर्ष करावा लागतो. सत्तेच्या मार्गाचा ही विचार करावा लागतो, पण ती स्वाभिमानाची असली पाहिजे. केवळ सत्ताच हवी असते तर देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. आंबेडकर यांना कुठल्याही मतदारसंघातून काँग्रेसने सहज निवडून आणले असते, पण असली भिकेची सत्ता त्यांना नको होती. सत्तेचा मार्ग त्यांनी इतक्या स्पष्टपणे सांगितला असताना धर्मांध शक्तींच्या वळचणीला जावून सत्तेच्या टक्केवारीची मागणी करणे, हे आंबेडकरी विचारात बसत नाही. पण अशीच भिकेची सत्ता कुणाला हवी असेल तर त्यास कोण काय करणार.
गेली अनेक वर्ष रिपब्लिकन सेना राजकीय पक्ष म्हणून काम करीत आहे. पण इंदू मिलचे आंदोलन सोडले तर काही भरीव कार्य या सेनेच्या नावावर नाही. अधूनमधून छोट्या मोठ्या निवडणुका ही कधी वंचितच्या सोबत तर कधी वेगळे होऊन लढविल्या आहेत. पण यश आसपास ही नव्हते. कार्यच नाहीतर मतदारांनी मत तरी का द्यायची ? स्वतः आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. त्यांना केवळ १८७९३ मत मिळाली. विजयी उमेदवाराच्या तुलनेत ही नगण्य आहेत. त्याशिवाय ही निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेस पक्षाने हित संबंधाविषयी जे काही पुढे आणले, ते भयानक होते. काँग्रेस पक्षाने केलेला तो आरोप असेल की त्यात ही काही सत्यता असेल, पण भाजप उमेदवाराच्या मदतीसाठी ही निवडणूक ते लढत होते, असा तो आरोप पुराव्यानिशी केला आहे. तर हे असले राजकारण आंबेडकरी विचार व चळवळीच्या चौकटीत बसत नाही.
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यावर घटनाबाह्य धोरणे राबविण्याचा सपाटा सरकारने सुरू केला आहे. त्याबाबत कधी रस्त्यावर उतरून आंदोलन नाही. की त्याचा साधा विरोध ही नाही. भाजप सरकारने अनुसुचित जातींची आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचे हे धोरण आरक्षणाच्या मूळ गाभ्याला विरोध करणारे आहे. पण रिपब्लिकन सेनेची त्यावर भूमिका नाही. महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयक आणले, ते मंजूर झाले, त्याचे कायद्यात रूपांतर झाले, हे रिपब्लिकन सेनेच्या गावी ही नाही. अन् असे असताना स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घ्यायचे, हे ढोंग आहे.
महाराष्ट्राला गद्दार म्हणून परिचित असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर आंबेडकरी समाजातील एक घटक त्यांच्या नेतृत्वाखाली सामिल होताना दिसतो आहे. जो सामिल होतोय त्याला धर्मांध शक्तींशी लढायचे नाहीतर सत्तेचे लाभार्थी व्हायचे आहे. असे राज्यभरातील लाभार्थी त्यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत. काल परवापर्यंत रिपब्लिकन सेना व आनंदराज आंबेडकर यांना टाळणारे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर वंचितला राम राम ठोकून रिपब्लिकन सेनेत सामिल होत आहेत. हे सामिल होणारे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित होऊन सामिल होत नाहीत तर ते एकनाथ शिंदेसोबत गेल्यामुळे सामिल होत आहेत. याचा अर्थ असा असा आहे की, संविधान पायदळी तुडवित सत्तेचे राजकारण करणारे एकनाथ शिंदे या सामिल होणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे हिरो आहेत. वरवर ही बाब शुल्लक वाटत असली तरी ती अतिशय गंभीर असून साऱ्या आंबेडकरी प्रवाहाला विचार करायला लावणारी आहे.
…………

राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *