काही म्हणतात तो मुद्दा महत्त्वाचा नाही, आता त्यापेक्षा महत्वाचे मुद्दे आहेत. काही म्हणतात, तो प्रश्न खाजगी आहे. त्याची सार्वजनिक चर्चा करू नये. काही म्हणतात, देशात आता काय स्थिती आहे आणि तुम्ही काय सामाजिक मुद्दे घेवून बसलात. काही म्हणतात, आर्थिक मुद्दे, धार्मिक मुद्दे महत्वाचे, लैंगीक मुद्दे, कौटुंबिक मुद्दे आता महत्त्वाचे नाहीत. काही म्हणतात, राष्ट्रीय मुद्दे अत्यंत महत्त्वाचे, तुम्ही जातीची चर्चा करतात. – अशी ही यादी बरीच मोठी आहे. बरीच वाढवलीही जावू शकते.
काही मुद्द्यांना सोईस्करपणे दुर्लक्ष करायचे, आणि काही मुद्दे चर्चेला घ्यायचे हा अनेकांचा नित्यनियम असतो. प्राधान्याचा मुद्दा कशाला बनवले पाहिजे हे अनेकांच्या विचारसरणी, जात, वर्ग, लिंगभाव, शहरी ग्रामीण अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून कळते. ज्या कशाला प्राधान्य दिले जाते, त्यामागे काहीतरी मुद्दे आणि स्पष्टीकरणही असते.
वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा करतांना, गप्पा मारताना, काम करतांना अशा अनेक गोष्टी अनुभवयास येतात. त्यावेळी, मला नेहमी वाटते की, सगळ्याचं गोष्टी महत्त्वाच्या आहे. एका प्राधान्य देवून दुसरीला की अगदीच वेगळ्या गोष्टीला दुर्लक्ष करणे किंवा दुय्यम ठरवणे हे समाज, राष्ट्र आणि व्यक्ती म्हणुनही योग्य नाही.
लोकशाही मग ती समाजातील असो किंवा घरातील असो, नात्यातील असो किंवा मग एका संस्थेतील असो – सगळीकडेच महत्त्वाची आहे. आर्थिक आणि राष्ट्रीय प्रश्न महत्वाचे आहेत, तेवढेच लोकांचे सामाजिक आणि लैंगिक प्रश्नही महत्त्वाचे आहे. चंद्रयान यशस्वी होणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढे सेप्टिक टँक साफ करतांना करणाऱ्या लोकांचा प्रश्नही महत्वाचा आहे.